Thursday, September 18, 2025

शेअर बाजारातील गुंतवणूकदार...

शेअर बाजारातील गुंतवणूकदार...

डॉ. सर्वेश :सुहास सोमण

विदेशी गुंतवणूकदार : शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्रीची संधी असते. फॉरीन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (FII), नॉन रेसिडेंट इंडियन्स (NRIs) आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन (PIO) यांना विदेशी गुंतवणूकदार म्हणून संबोधलं जातं.

भारतीय रिझर्व्ह बँक विदेशी गुंतवणूकदारांवर नियंत्रण ठेवते. विदेशी गुंतवणूकदार थेट आपल्या एक्स्चेंजमार्फत शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतात. फॉरीन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर भारतीय कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त २४% भांडवली हिस्सा गुंतवू शकतात. हेच प्रमाण नॉन रेसिडेंट इंडियन आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन यांच्यासाठी १०% आहे. बाजारातील चढ उतार या गुंतवणूकदारांमुळे अधिक प्रमाणात होत असतो.

विदेशी गुंतवणूक भारतीय बाजारपेठेत लाखो कोटी रुपयांमध्ये आहे. जर बाजारातील हिस्सा मोठ्या प्रमाणात या गुंतवणूकदारांनी काढून घेतला तर बाजार खाली पडतो. तसेच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली तर बाजार मोठ्या प्रमाणात वर जातो. यांची गुंतवणूक ही थेट भारतीय कंपन्यांमध्ये असते आणि तसेच इंडेक्स फंडमध्ये असते. कंपन्यांच्या तिमाही आणि वार्षिक कामगिरीवरून या कंपन्यांमधील विदेशी गुंतवणूक कमी-अधिक होत राहते. तसेच जागतिक शेअर बाजारांचा कल कोणत्या दिशेने आहे, यावरही विदेशी गुंतवणूकदार खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घेत असतात.

२. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स : भारतीय संस्था ज्या थेट भांडवली बाजारात विविध कंपन्यांमध्ये थेट आणि इंडेक्स फंड्समध्ये पैसे गुंतवतात अशा संस्थांना डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स म्हणतात. म्युचुअल फंड हे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्समधील उत्तम उदाहरण होय. राकेश झुनझुनवाला, राधाकृष्ण दमाणी, रामदेव अग्रवाल ही नावे आपल्या कानावर कधी ना कधी आलीच असतील. यांच्या स्वतंत्र संस्था आहेत, ज्या भारतीय भांडवली बाजारात थेट गुंतवणूक करीत असतात.

कंपन्यांच्या कामगिरीनुसार डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स त्यातील हिस्सा कमी-अधिक करत असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर कंपनीची विक्री, उलाढाल आणि नफा वाढतो आहे असे तिच्या तिमाही किंवा वार्षिक निकालानंतर दिसून आले, तर त्या कंपनीचा शेअरचा भाव खरेदी वाढल्याने वृद्धिंगत होत राहतो. या उलट कामगिरी खराब दिसून आली तर शेअरची विक्री होऊन भाव उतरतो. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्समार्फत मोठ्या प्रमाणात खरेदी अथवा विक्री झाली, तर त्यानुसार त्या शेअरचा भाव वाढतो किंवा कमी होतो. भारतीय आयुर्विमा ही संस्था एक मोठी डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहे.

३. म्युच्युअल फंड्स : सर्वसामान्य गुंतवणूकदारास थेट शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला भीती वाटते किंवा शेअर बाजाराची सखोल माहिती नसल्याने थेट गुंतवणूक करण्यास काचकूच करतो. अशा वेळेस म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून ते पैसे शेअर बाजारात गुंतविले जातात. म्युच्युअल फंड्सचे अनेक प्रकार आहेत. यात इक्विटी फंड आणि बॅलन्स फंड हे दोन प्रमुख आहेत. इक्विटी फंडमध्ये लार्ज कॅप / ब्लु चिप / मिडकॅप / स्मॉल कॅप असे उपप्रकार आहेत, तर बॅलन्स फंडमध्ये इक्विटी आणि कर्जरोखे यात विशिष्ट प्रमाणात रक्कम गुंतविली जाते. सर्वसामान्य गुंतवणूकदार एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड्समध्ये रक्कम गुंतवू शकतो.

४. रिटेल इन्व्हेस्टर : पॅन कार्ड धारक ज्याचे डिमॅट अकाउंट आहे असा सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणजेच रिटेल इन्व्हेस्टर. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी शेअर ब्रोकरकडे डिमॅट अकाउंट सुरू करून स्वतः अभ्यास करून शेअर बाजारात गुंतवणूक करणारा प्रत्येक जण रिटेल इन्व्हेस्टर म्हणून ओळखला जातो. (सुचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही) samrajyainvestments@gmail.com

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >