Tuesday, August 5, 2025

समोसा-जिलेबी आवडीने खाणा-यांसाठी विशेष बातमी!

समोसा-जिलेबी आवडीने खाणा-यांसाठी विशेष बातमी!

नवी दिल्ली: फास्ट फूड आरोग्यासाठी घातक आहे, हे तज्ज्ञ नेहमीच सांगतात. पण आता आपल्या आवडत्या समोसा आणि जिलेबीचा समावेश थेट आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करणाऱ्या पदार्थांच्या यादीत होणार आहे. यावर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच मोठं पाऊल उचललं आहे.



नागपुरात 'धोक्याचा इशारा' बोर्ड लागले!


समोसा, जिलेबी आणि 'चाय-बिस्कीट' म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण या पदार्थांमुळे गंभीर आजार होऊ शकतात, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. ज्याप्रमाणे तंबाखू आणि सिगारेटच्या पाकिटांवर धोक्याचा इशारा दिला जातो, त्याचप्रमाणे आता समोसा आणि जिलेबीबाबतही असेच केले जाणार आहे. याच नियमाचे पालन करत नागपूरमध्ये समोसा आणि जिलेबीच्या दुकानांबाहेर 'सावधानता बाळगून खा, तुमचं भविष्य तुमचे आभार मानेल' अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले आहेत.




'तंबाखूपेक्षाही घातक' साखर आणि ट्रान्स फॅट!


आरोग्य मंत्रालयाने एम्स नागपूरसह सर्व केंद्रीय संस्थांना असे पोस्टर त्यांच्या आवारात लावण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून लोकांना त्यांच्या दररोजच्या नाश्त्यामध्ये किती प्रमाणात फॅट आणि साखर आहे, जी शरीरासाठी हानिकारक आहे, हे स्पष्टपणे कळेल. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, स्नॅक्समधून शरीरात जाणारी साखर आणि ट्रान्स फॅट हे तंबाखूइतकेच हानिकारक असू शकतात. त्यामुळे लोक काय खात आहेत, याची त्यांना माहिती असणे गरजेचे आहे.




लठ्ठपणाचा धोका: २०५० पर्यंत भारत अमेरिकेच्या पंक्तीत?


एम्स नागपूरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाडू, वडापाव, भजी या सर्व स्नॅक्सची सध्या तपासणी केली जात आहे. लवकरच कॅफेटेरिया आणि सार्वजनिक ठिकाणी याबाबत बोर्ड लावले जातील. मधुमेह तज्ञांनी स्पष्ट केले की, सरकार या पदार्थांवर बंदी आणत नसून, लोकांना त्यांच्या आरोग्याविषयी सतर्क करत आहे. आजच्या परिस्थितीत सर्वाधिक आजार चुकीच्या आहारातून होत असल्याने, सरकारला हे करणे गरजेचे आहे.


सरकारने लठ्ठपणाबाबतही गंभीर इशारा दिला आहे. २०५० पर्यंत ४० कोटींहून अधिक लोक लठ्ठपणाचे आणि अतिरिक्त वजनाचे शिकार होऊ शकतात, ज्यामुळे अमेरिकेनंतर भारताचा नंबर लागू शकतो. सध्या देशात दर दहापैकी दोन लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत आणि लहान मुलांमध्येही हे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे, आपल्या आहाराबाबत आता अधिक जागरूक होण्याची गरज आहे.

Comments
Add Comment