
कोण होत्या बी. सरोजा देवी ?
कानडी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सरोजा देवी त्यांच्या काळातील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रथितयश कलाकार होत्या. त्यांनी निवडक हिंदी चित्रपटांतूनही काम केले होते. महाकवी कालिदास या कानडी चित्रपटातून १९५५ मध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीला 'अभिनय सरस्वती' आणि 'कन्नडथु पैंगिली' या नावांनी ओळखले जात असे.
दिग्गज अभिनेते एमजी रामचंद्रन (एमजीआर) यांच्यासोबत बी. सरोजा देवी यांनी १९५८ मध्ये 'नादोदी मन्नन' या तमिळ चित्रपटाच्या निमित्ताने काम केले होते. बी. सरोजा देवी यांनी शिवाजी गणेशन, एनटी रामा राव आणि शम्मी कपूर यांच्यासोबत काम केले होते. चित्रपटसृष्टीतील कार्यासाठी बी. सरोजा देवी यांना सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित केले होते.

कोण होते कोटा श्रीनिवास राव ?
कोटा श्रीनिवास राव यांचा जन्म १० जुलै १९४२ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कांकीपाडू येथे झाला. त्यांनी १९७८ मध्ये 'प्रणम खरेधू' या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. आपल्या चार दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत त्यांनी ७५० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले. त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका जास्त गाजल्या. तेलुगू चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. निवडक चित्रपटांतून त्यांनी सकारात्मक आणि विनोदी भूमिकाही साकारल्या.
चित्रपटसृष्टीत यश मिळवणाऱ्या कोटा श्रीनिवास राव यांनी १९९० च्या दशकात भाजपात प्रवेश केला. ते १९९९ मध्ये विजयवाडा पूर्व विधानसभा मतदारसंघातून आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून आले. सिनेविश्वात येण्याआधी काही काळ बँकेत नोकरी केलेल्या कोटा श्रीनिवास राव यांनी पुढे अभिनय क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली.
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी कोटा श्रीनिवास राव यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोटा श्रीनिवास राव यांना आधी डॉक्टर व्हायचे होते, परंतु अभिनयाच्या त्यांच्या आवडीमुळे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आर. चंद्रू यांचा 'कबजा' हा कोटा श्रीनिवास राव यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात उपेंद्र राव, शिवा राजकुमार, किचा सुदीप, श्रिया सरन आणि मुरली शर्मा सारखे कलाकार होते.