Tuesday, August 5, 2025

हरियाणा आणि गोव्यासाठी नव्या राज्यपालांची तसेच लडाखसाठी नव्या नायब राज्यपालांची नियुक्ती

हरियाणा आणि गोव्यासाठी नव्या राज्यपालांची तसेच लडाखसाठी नव्या नायब राज्यपालांची नियुक्ती
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवार १४ जुलै रोजी हरियाणा आणि गोव्यासाठी नव्या राज्यपालांची तसेच लडाखसाठी नव्या नायब राज्यपालांची नियुक्ती केली. प्रोफेसर असीम कुमार घोष यांना हरियाणाच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले. पुष्पपति अशोक गजपति राजू यांना गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले. राष्ट्रपतींनी लडाखचे सध्याचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर (डॉ.) बी.डी. मिश्रा (निवृत्त) यांचा राजीनामा स्वीकारत त्यांना जबाबदारीतून मुक्त केले. तसेच भाजपाच्या कविंद्र गुप्ता यांना लडाख या केंद्रशिसातित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदी नियुक्त केले.



सध्या बंडारू दत्तात्रेय हरियाणाचे आणि पीएस श्रीधरन पिल्लई गोव्याचे राज्यपाल आहेत. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशपत्रामुळे प्रोफेसर असीम कुमार घोष हे बंडारू दत्तात्रेय यांच्याकडून हरियाणाच्या राज्यपालपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तसेच पुष्पपति अशोक गजपति राजू हे पीएस श्रीधरन पिल्लई यांच्याकडून गोव्याच्या राज्यपालपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

याआधी रविवार १३ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार सदस्यांना राज्यसभेत खासदार म्हून नामनिर्देशित केले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रश्न समजून घेण्यास मदत व्हावी या उद्देशाने राष्ट्रपतींकडून विविध क्षेत्रातील निवडक मान्यवरांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले जाते. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम, केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मस्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे.
Comments
Add Comment