 
                            गल्वेनाईज्ड स्टील लावून दिला तात्पुरता दिलासा
पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटामध्ये उभ्या कापलेल्या डोंगरातून लाल मातीचे ढिगारे कोसळतात. यासाठी गल्वेनाईज्ड स्टील जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. यामुळे घाटातील वाहतूकीच्यावेळी अचानक दरडी कोसळून ठप्प होणार नाही असा तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
कशेडी घाटामध्ये २००५पासून दरडी कोसळण्याचे सातत्य कायम आहे. तीन वर्षांपूर्वी एका फार्महाऊसकडे जाण्यासाठी चोळई येथील डोंगरावर रस्ता तयार केल्यानंतर डोंगरातून लालमातीचा ढिगारा दरडींसह महामार्ग व्यापून दरीकडील बाजूच्या लोकवस्तीतील घरांना धोका निर्माण झाला होता. चौपदरीकरणाचे काम सुरू असताना महामार्गालगतचे डोंगर उभे कापण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना झाल्या. यामुळे महामार्ग बांधकाम विभागामार्फत रस्ता आणि डोंगराच्या पायथ्याशी काँक्रीटच्या संरक्षक भिंती उभारल्या. २० ते ३५ फूट उंच उभ्या कापलेल्या डोंगरातून सुटणारे दगड आणि लालमातीचे ढिगारे साधारणपणे ३ ते ९ फूट उंचीच्या या काँक्रीटच्या संरक्षक भितीमुळे महामार्गावर कोसळण्यास प्रतिबंध होतो नसल्याने काँक्रीटच्या संरक्षक भिंती निरुपयोगी ठरून वाहतुकीला असलेला दरडींचा धोका कायम राहिला असल्याचे स्पष्ट झाले. काँक्रीटच्या संरक्षक भिंतींवर अनेक ठिकाणी मोठमोठ्या आकाराच्या दरडी कोसळून स्थिरावल्याचे तरीही त्या दरडी कोसळतील की काय अशी धडकी भरवणारे दृश्य दिसून येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील चोळई व धामणदेवी भोगाव या दरडग्रस्त क्षेत्रावर महामार्ग बांधकाम विभागामार्फत उभ्या कापलेल्या डोंगरातून कोसळू पाहणाऱ्या धोकादायक दरडींवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून गल्वेनाईज्ड स्टीलच्या ३०-३५ फूट उंच जाळ्या टाकण्यात येत आहेत.
चोळई गावठाणापासून धामणदिवीपर्यंत उभ्या कापलेल्या डोंगरातून कोसळणाऱ्या दरडींना काही प्रमाणात प्रतिबंध करण्यात आला आहे. दरडग्रस्त भागात धोकादायक दरडींवर गल्वेनाईज्ड स्टीलच्या जाळीचे सुरक्षा कवच टाकण्यात येत असल्याने वाहनचालक व प्रवासी जनतेला तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी डोंगरातून महाकाय दरडी अथवा लाल मातीचे ढिगारे मोठ्या प्रमाणात कोसळल्यास गल्वेनाईज्ड स्टीलच्या जाळ्या तकलादू उपाययोजना ठरणार आहे.

 
     
    




