Friday, August 15, 2025

Hisar Express : मोठी बातमी! हिसार एक्सप्रेस-रायलसीमा एक्सप्रेसच्या डब्यांना लागली आग, सर्वत्र धूर अन् ज्वाळा

Hisar Express : मोठी बातमी! हिसार एक्सप्रेस-रायलसीमा एक्सप्रेसच्या डब्यांना लागली आग, सर्वत्र धूर अन् ज्वाळा

तिरुपती : तिरुपतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वे स्टेशन यार्डमध्ये उभ्या असलेल्या हिसार एक्सप्रेस आणि रायलसीमा एक्सप्रेसच्या डब्यांना आग लागल्याचं समोर आले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. या डब्याना आग लागल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित उर्वरित डबे वेगळे केले त्यामुळे पूर्ण नुकसान टळले आहे. या घटनेत कोणत्याही जीवितहानीचे वृत्त समोर आलेले नाही.

हिसार एक्सप्रेसला आग

राजस्थानहून आंध्र प्रदेशातील तिरुपतीला जाणाऱ्या हिसार एक्सप्रेसला आग लागल्यामुळे तिरुपती रेल्वे स्थानकाजवळ पूर्णपाने गोंधळ झाला आहे. आग लागलेल्या रेल्वेच्या डब्यांमध्ये धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर निघत होत्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले, त्यामुळे मोठी हानी टळली आहे. रेल्वेच्या डब्यांना आग लागल्यानंतर हिसार एक्सप्रेसजवळून जाणारी वंदे भारत ट्रेन थांबवण्यात आली, त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

तिरुपतीतील या अपघातामुळे रेल्वेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. रविवारी चेन्नई-अरक्कोनम रेल्वे मार्गावर एका कच्च्या तेलाच्या टँकर ट्रेनला आग लागली होती, त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आज डब्यांना आग लागल्याने रेल्वेच्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रेल्वेला ही आग का लागली याच्या कारणाचा शोध घेतला जाणार आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग पसरू नये म्हणून बाधित डबे ट्रेनपासून वेगळे करण्यात आले आहेत, त्यामुळे मोठा अपघात टळला आहे.

Comments
Add Comment