युनेस्कोच्या समितीकडून महाराष्ट्रातील १२ गड किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे आणि यासंबंधींची घोषणा नुकतीच राज्य सरकारकडून करण्यात आली. ही घोषणा समस्त मराठी जनांच्या आणि महाराष्ट्रीय यांची छाती गर्वाने भरून टाकणारी आहे यात काही शंका नाही. कारण महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी आपल्या दूरदर्शी धोरणाने आणि व्यापक हित लक्षात घेऊन महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापले. त्यांचे जतन आता होणार आहे आणि यामुळे ही बाब निश्चितच प्रत्येक महाराष्ट्राभिमानी मनाला रोमांचित करणारी आहे. महाराष्ट्रातील ११ किल्ले ज्यात रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग तसेच खांदेरी यासह तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
या १२ किल्ल्यांना जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. हे सर्व किल्ले छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहेत पण या किल्ल्यांचे एक ऐतिहासिक महत्त्वही आहे. कारण ते प्रत्येक स्वराज्यातील महत्त्वपूर्ण घटनेचे साक्षीदार आहेत. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मिती आणि रक्षणासाठी ज्या अनेक किल्ल्यांची उभारणी केली आणि त्यांच्या जोरावर मुघल साम्राज्याला टक्कर दिली आणि बलदंड मुघल साम्राज्याला पाणी पाजले त्या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होणे ही प्रत्येक भारतीयासाठी निश्चितच गौरवास्पद बाब आहे. यात तामिळनाडूतील जिंजी हे एक ठिकाण आहे हे तामिळनाडूतील असले तरीही शिवरायांशी जवळून संबंधित आहे. त्यामुळे त्याचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील किल्ले हे स्थापत्य कलेसाठी ओळखले जातात आणि राजकीय, लष्करी आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही हे किल्ले एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. शत्रूच्या नजरेस न येता त्यांचे स्थापत्य असे विलक्षण आहे की, त्यामुळे भल्याभल्यांची मती गुंग व्हावी. शिवरायांच्या राजकीय चातुर्यास ज्याला अॅक्युमेन म्हटले जाते त्याला दाद द्यावी की, स्थापत्यकलेच्या आविष्कारास दाद द्यावी असा प्रश्न पडतो. यातील प्रत्येक किल्ला हा मराठा दुर्ग शास्त्रातील अभूतपूर्व चमत्कार आहे आणि त्याची माची, तटबंदी, बुरूज, दरवाजे आणि खंदकानी सुरक्षित केले आहेत. त्यातच शिवरायांच्या युद्धकौशल्याचा आणि राजकीय डावपेचांचा प्रचंड आविष्कार दिसून येतो.
अर्थात हे होण्यासाठी राज्यसरकारने काटेकोर नियोजन केले यात काही शंका नाही. कारण राज्यसरकारने अत्यंत काटेकोरपणे अभ्यास करून प्रस्ताव युनेस्कोच्या आणि भारतीय पुरातत्त्व खात्याच्या वस्तुसंग्रहालय संचालयाकडे पाठवला आणि त्यानंतर युनेस्कोच्या तज्ज्ञांनी या किल्ल्यांची पाहणी केली आणि काळजीपूर्वक तपासणी केल्याअंती या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले.
अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील अभ्यासकांशी सातत्यपूर्ण असलेला संवाद आणि महाराष्ट्रातील या किल्ल्यांना नामांकन मिळावे म्हणून त्यानी केलेला पाठपुरावा याला अखेर यश मिळाले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी युनेस्कोकडे सातत्याने जाऊन पाठपुरावा केला. त्यामुळे हे यश मिळाले. नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा राज्यासाठी अभिमानाचा गौरवशाली क्षण आहे असे जे म्हटले ते कुणीच अनाठायी नाही असे कुणीच म्हणू शकणार नाही. कारण शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले यात संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव झाला आहे. रायगड हा तर महाराष्ट्रीयांचा मानबिंदू आहे तर राजगड, प्रतापगड हेही किल्ले शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. शिवनेरी तर शिवरायांचे जन्मस्थान आहे.
त्यामुळे हे प्रत्येक किल्ले शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांचे साक्षीदार आहेत, त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहेच, पण आता तर ते जागतिक वारसायादीत समाविष्ट झाले असल्याने त्यांचा गौरव वाढला आहे. आपलाही गौरव वाढला आहे. मुख्यमंत्री फडणवीस त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसायादीत आल्याबद्दल प्रत्येक नागरिकाचे अभिनंदन केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो क्षण जितका महत्त्वाचा होता तितकाच आजचा आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन करू तितके कमी आहे. आता या किल्ल्यांची जपणूक आणि जतन करायला हवे आणि तेथील ऐतिहासिक वारशांचे जतन करायला हवे. हे तितके सोपे नाही. कारण खरी जबाबदारी जतन करण्याचीच असते.
आता खरी जबाबदारी आहे ती आपली. कारण आपल्याकडे लोक ऐतिहासिक स्थळी पर्यटनाला जातात ते निव्वळ मजा करण्यासाठी. तेथे अनेक नको असलेल्या गोष्टी पडून असतात आणि ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी कसे वागावे आणि कशी वर्तणूक असावी याचे शिक्षण आपल्याला दिले जात नाही. त्यामुळे आपण जातो तेथे त्या स्थळाला अवकळा आणतो. अगदी रायगडावरही अस्वच्छता पसरलेली असते आणि दरवर्षी आपल्याकडे काही संस्था तिथे जाऊन स्वच्छता करतात. त्याना असे करण्याची वेळ येऊ नये. इंग्लंडने आपल्यावर राज्य केले म्हणून त्यांना आपण शत्रू मानतो, पण त्यांनी आपल्याकडील ऐतिहासिक स्थळांसाठी काय काय केले, तर आपण त्याच्या जवळही नाही हे खरे आहे. कारण इंग्लंडचा विंडसर कॅसलला अद्याप वारसा स्थळाचा दर्जा मिळाला नाही तरीही त्यांची प्रजा त्याचे जतन करण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांचे कौतुक करायला हवे. तीच प्रवृत्ती आपल्यातही अंगी बाणवायला हवी.
इतिहास हा केवळ त्याचा गौरव करून टिकत नाही, तर त्याचे प्रजाजन किती इतिहासातील वस्तूंचे जतन करतात आणि पालन करतात यावर टिकत असतो. त्याबाबतीत राज ठाकरे यांनी कालच एक इशारा दिला आहे. राज यांचे म्हणणे आहे की, युनेस्कोने दर्जा दिला म्हणून वास्तूचे जतन करण्याची जबाबदारी संपते असे नाही, तर ओमानमधल्या आयरीस अभयारण्य या स्थळाचा जागतिक दर्जा युनेस्कोने काढून घेतला. तसे होऊ नये म्हणून युनेस्कोच्या दर्जाबद्दल जल्लोष साजरा करतानाच आपण आपल्याकडून या स्थळाचे पावित्र्य भंग पावणार नाही याची दक्षता प्रत्येक पर्यटकाने घेतली पाहिजे. ही जबाबदारी आपल्यावर मोठी आली आहे.