अमरावती : जयस्तंभ चौकातील मणपुरम गोल्ड लोन बँकेतून रविवारी सकाळी अचानक धूर बाहेर पडताना दिसताच नागरिकांनी तातडीने पोलीस आणि अग्निशमन विभागाला कळवले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
सकाळी ८ वाजताच्या सुमारास बँकेतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच बँकेचे व्यवस्थापक मनीष माहुरे यांनी त्वरित बँकेत धाव घेतली आणि पोलीस व अग्निशमन विभागाला माहिती दिली. मनपाच्या अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून बँकेचा वीजपुरवठा खंडित केला आणि पाण्याचा मारा केला, त्यामुळे काही वेळातच आग आटोक्यात आली. त्यानंतर जवानांनी बँकेत प्रवेश केल्यावर सर्वत्र धूर पसरल्याने गोंधळ उडाला. तत्काळ स्मोक डिटेक्टर मागवण्यात आले.
कर्मचाऱ्यांनी आत जाऊन पाहणी केली असता, सीसीटीव्ही प्रणालीमध्ये विद्युत प्रवाह संचारल्यामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्याना बोलावण्यात आले. त्यांनी त्वरित बँकेत पोहोचून वीजपुरवठा खंडित केला.
बँकेच्या पाहणीनंतर सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेत फायरमन अमोल साळुंखे, निशांत राठोड, रोशन अलुडे, राहुल घोडे आणि वाहन चालक नितीन इंगोले व रोशन आरवडे यांनी अत्यंत धाडसी आणि दक्षतेने कार्य केले.
या आगीत बँकेचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले, परंतु अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे बाजूला असलेल्या श्री बालाजी रिअल इस्टेट, आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड आणि मणपुरम गोल्ड लोन या तीन कार्यालयांचे सुमारे ५० लाखांचे संभाव्य नुकसान टळले, असे बँकेच्या व्यवस्थापकाने सांगितले.






