Saturday, August 16, 2025

अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आता फडणवीसांचे लक्ष! स्वबळावर लढणार की काय? अमृता फडणवीस नेमक्या काय म्हणाल्या?

अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आता फडणवीसांचे लक्ष! स्वबळावर लढणार की काय? अमृता फडणवीस नेमक्या काय म्हणाल्या?

पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी महायुतीत रस्सीखेच वाढताना दिसत आहे. शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी जोरदार पक्षप्रवेश सुरू केले असून, कार्यकर्त्यांनाही कामाला लावले आहे. यातच, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी करणार असल्याचं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी पुण्यामध्येच केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.



पुण्याशी माझं खास नातं, कमतरतांची तक्रार करणार!


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला आल्या होत्या. यावेळी भाषणात बोलताना त्यांनी पुणे शहराशी आपलं खास नातं असल्याचं सांगितलं. "या शहरात माझी आजी राहते, त्यामुळे मला इथे आल्यावर माहेरी आल्यासारखं वाटतं. येथील लोक आणि वातावरणाविषयी मला खूप आपुलकी वाटते. त्यामुळे मी दरवेळी इथे आल्यानंतर देवेंद्रजींना येथील कमतरतांबद्दल सांगत असते, काय सुधारणा करणे गरजेचे आहे? तसेच फडणवीस देखील पुण्याकडे तेवढंच लक्ष देतात," अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली.



अजितदादा स्वबळावर लढणार?


दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार कामाला लागले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती होईल की नाही, हे अजून स्पष्ट नाही, पण तुम्ही तयारीला लागा." पुणे महानगरपालिकेत हे आदेश देण्यात आल्याने, पुण्यात अजित पवारांचा पक्ष स्वबळावर लढणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.


या पार्श्वभूमीवर, अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यास, येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणखी रंगत येणार हे निश्चित!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा