नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
गुलाम अलींमुळे भारतातल्या खूप मोठ्या वर्गाला गझलेची खरी मजा कळली. काही काळ तर ८० च्या दशकातील तमाम तरुण वर्गाला गझलेची चटकच लागली होती. गझलेच्या चेहऱ्यावरचा उर्दू लिपीचा नकाब सरकावून अलींनी गझलेला आधीच्या काहीशा उदास वातावरणातून बाहेर काढले. तिला रोमांसच्या मुख्य दालनात आणले. संयतपणेच पण तिच्या चेहऱ्यावरचा पडदा ‘आहिस्ता आहिस्ता’ बाजूला केला.
तिचे झगमगते सौंदर्य आपल्या आगळ्या संगीताने प्रकाशमान केले. हे त्यांचे योगदान अद्वितीय आहे.
तत्पूर्वी बेगम अख्तर, मेहंदी हसन, फरीदा खानम, इक्बाल बानो, उस्ताद अमानत अली खान, उस्ताद बडे फतेह अली खान हे गातच होते आणि त्यांच्याही गझलांचा मोठा चाहतावर्ग होता पण अलींनी गझलेला ‘दिवान-ए-खास’ मधून ‘दिवान-ए-आम’मध्ये आणून लोकप्रिय केले. गुलामसाहेबांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायन शैलीमुळे अनेक गझलकारांनाही प्रथमच लोकप्रियता मिळवून दिली. त्यात एक होते पाकिस्तानी शायर मसरुर अन्वर. शिमल्यात १९४४ साली जन्मलेल्या अन्वर यांचे कुटुंब फाळणीनंतर पाकिस्तानात गेले. त्यांनी गझला आणि कवितांबरोबरच अनेक सिनेमांसाठी गाणी लिहिली.
‘बदनाम’ या १९६६ साली आलेल्या सिनेमासाठी मसरूर अन्वर यांनी लिहिलेले ‘बडे बेमुरव्वत हैं ये हुस्नवाले’ हे सुरय्या मुलतानीकर यांनी गायलेले गाणे आजही पाकिस्तानात लोकप्रिय आहे. या गाण्याला संगीत कुणी दिले होते? ते होते बंगालमधून काही पाकिस्तानी सिनेमांना संगीत द्यायला लाहोरला गेलेले दिबो भट्टाचार्य! त्यावेळचे वातावरण कसे असेल पाहा. दिबोजी परत येणार होते ते उलट तिथेच स्थायिक झाले. त्यांनी अनेक सिनेमांना संगीत दिले. बांगलादेशाची निर्मिती झाल्यावर १९७१ ला ते बांगलादेशात गेले आणि तिथले नागरिक झाले. जेव्हा धर्मांधता इतकी टोकाला पोहोचून पाशवी झाली नव्हती तेव्हाच्या या गोष्टी.
शायर मसरूर अन्वर यांना त्यांच्या लेखणीने १९६८ आणि १९७० साली पाकिस्तानचे ‘निगार’ पारितोषिक मिळवून दिले, तर १९९७ साली त्यांना पाकिस्तानने मरणोत्तर
‘प्राईड ऑफ परफोर्मंस’ पुरस्कार दिला.
गुलाम अलींची शैली आगळीच होती. ते गझलेच्या आशयाला अनुरूप असा दुसरा शेर शोधून काढत. त्यांच्या कसलेल्या आवाजात तो सादर करत आणि हार्मोनियमवर एखादी लकेर घेऊन गझलेची सुरुवात करीत. मसरूर अन्वर यांच्या संपूर्ण भारतीय उपखंडात लोकप्रिय झालेल्या एका गझलेआधी त्यांनी दोन शेर म्हटले होते-
‘दिल की चोटों ने कभी
चैन से रहने न दिया,
जब चली सर्द हवा,
मैंने तुझे याद किया.’
असे म्हणून महफिलीचा आगाझ झाल्यावर लगेच दुसरा शेर येई -
‘इसका रोना नही क्यो
किया तुमने दिल बरबाद,
इसका गम हैं के बहुत
देर मे बरबाद किया.’
यावेळी ते ‘देर’चा उच्चार असा काही करायचे की प्रेयसीच्या प्रदीर्घ उपेक्षेची, तिच्या निष्ठुरपणाची झळ श्रोत्यांच्याही लक्षात यायची. यानंतर सुरू होणाऱ्या गझलेचे
शब्द होते -
‘हमको किसके गमने मारा,
ये कहानी फिर सही|
किसने तोडा दिल हमारा,
ये कहानी फिर सही|’
आपले दु:ख ‘पुन्हा कधीतरी सांगेन’ असे म्हणणारा शायर म्हणतोय, माझे हृदय कुणी जखमी केले ते आता नको विचारूस! ते पुन्हा कधीतरी.
खरेतर समोर बसलेल्या प्रेयसीला ते सांगणार तरी कसे? कारण तीच या दु:खाचे मूळ कारण आहे. तिचा नकारच कवीला दु:खात लोटून गेलाय. आता ती निदान समोर आहे, बोलते आहे यातच कविवर्यांची स्वारी खूश आहे. त्यामुळे हा दिलदार शायर भोळेपणाने प्रेयसीलाही हळूच सांगतो, ‘सगळ्यांसमोर माझ्या दु:खाचे कारण विचारू नकोस.’ चुकून मी तुझेच नाव घेतले तर कसे होईल! तू समोर आहेस, ऐकते आहेस हेच मला पुरेसे आहे.
‘दिल के लुटने का सबब
पुछो ना सबके सामने,
नाम आयेगा तुम्हारा
ये कहानी फिर सही!’खरेतर माझ्या झालेल्या उपेक्षेचे, सहन कराव्या लागलेल्या तिरस्काराचे दु:ख पचवत ते जवळच्या मित्रांना तरी सांगायची माझी किती इच्छा असायची पण कुणीच लक्ष दिले नाही.
अनेकदा असे होते की, अशा गहऱ्या दु:खाचा अनुभव घेतलेल्या व्यक्तीला दुसरे काही नको असते. त्याने आपला पराभव स्वीकारलेला असतो. त्याला एवढाच दिलासा हवा असतो की, कुणीतरी माझी बाजू ऐकून घेतली. माझे दु:ख समजावून घेतले. परिस्थितीत काहीही बदल होणार नसतो. पण कुणाला तरी आपली बाजू ऐकण्याची इच्छा आहे, एवढाही दिलासा माणसाचे दु:ख कमी करू शकतो; परंतु कवीच्या बाबतीत मात्र सगळेच प्रतिकूल! त्याची बाजू ऐकायला मित्रही तयार झाले नाहीत. त्याच्या हाकेला कुणीच प्रतिसाद दिला नाही. म्हणून तो प्रेयसीला म्हणतो, ‘जाऊ दे. गेले ते दिवस. त्या गोष्टीवर पुन्हा कधीतरी बोलू -
नफरतों के तीर खाकर,
दोस्तों के शहर में
हमने किस किसको पुकारा,
ये कहानी फिर सही
हमको किसके ग़मने मारा
माझ्या प्रेमाची कथा तुला कशी सांगायची? ते तुला कधी कळालेच नाही.
असेही अनेकदा घडते की प्रेम एकतर्फीच असते आणि दोघातल्या एकाला वाटत असते की, समोरच्या व्यक्तीला आपले प्रेम आपल्या संकेतामधून कळले आहे, त्या व्यक्तीने ते स्वीकारले आहे. फक्त प्रेम स्पष्टपणे दोघांनीही व्यक्त केलेले नाही. त्यामुळे एक जण जेव्हा फक्त मैत्रीच्या नात्यातून सहानुभूतीने याचे दु:ख समजावून घ्यायला तयार असतो तेव्हा दुसऱ्याची कोंडी होते. त्याच प्रिय व्यक्तीची तक्रार तिच्यासमोरच केली, तर उरला-सुरला धागाही तुटेल या भीतीने प्रियकराची आणखी घालमेल होते. त्यामुळे त्याला वाटते, या अशा अव्यक्त राहून गेलेल्या नात्यात ‘कोण जिंकले आणि कोण हरले हे तिला सांगून तरी काय उपयोग? तो फक्त म्हणतो, ‘बोलू त्या विषयावर पुन्हा कधीतरी.’ तो म्हणतो, आता तो वेदनादायक विषय बाजूलाच राहू दे.
क्या बताएँ प्यारकी बाजी,
वफ़ाकी राह में
कौन जीता कौन हारा,
ये कहानी फिर सही
हमको किसके ग़मने मारा ये कहानी...
गझला अशा अगणित दु:खितांना मोठा दिलासा देतात. मनात खोल पुरलेल्या दु:खाच्या कबरेवर फुले वाहतात. यासाठी त्या ऐकणे खूप सुखद असते.
दुर्दैवाने अनेक शायर फाळणीनंतर पाकिस्तानात गेले. पण भारतात जन्मून भारतातच राहिलेले शायर काझी सय्यद जाफरी ऊर्फ ‘कैसर उल जाफरी’ यांचे गझल लेखनातील योगदानही असेच खूप मोठे आहे. लेकीन वो कहानी फिर कभी!