उज्ज्वल देवराव निकम हे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. मुंबईत झालेल्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केले होते. तसेच त्यांनी दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध सरकारी वकील म्हणून सरकारची बाजू मांडली होती. काही महिन्यांपूर्वी उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला होता. निवडणुकीतील पराभवानंतर उज्ज्वल निकम राजकारणातून संन्यास घेणार का असा प्रश्न विचारला जात होता. या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम राज्यसभेसाठी नामनिर्देशित झाले आहेत.

कोण आहेत उज्ज्वल निकम ?
उज्ज्वल निकम यांचा जन्म जळगाव येथे झाला. त्यांचे वडील देवराव माधवराव निकम हे देखील बॅरिस्टर होते. त्यांनी विज्ञान विषयात बॅचलर पदवी प्राप्त केली आणि नंतर जळगाव येथील एस.एस. मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. उज्ज्वल निकम यांनी टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची हत्या, भाजप नेते प्रमोद महाजन यांची हत्या आणि मुंबई सामूहिक बलात्कार यासारख्या अनेक हायप्रोफाइल खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून तपास संस्थेची बाजू मांडली होती.