Sunday, August 3, 2025

लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांचा वाढला आकडा!

लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांचा वाढला आकडा!

मतदारांची संख्या २४ लाखांच्या जवळ 


पालघर (गणेश पाटील): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत १ जुलै २०२५ रोजी मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना मतदान करता येणार असल्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे १ जुलै २०२५ ची पालघर जिल्ह्यातील मतदार संख्या पाहता, जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजेच अवघ्या १३ महिन्यांच्या कालावधीत तब्बल २ लाख ४० हजार ९१५ मतदारांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांचा वाढलेला टक्का आगामी निवडणुकीत कोणाला फायदा देणारा तर कोणाला झटका देणारा ठरणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यापासून वर्षभरात सर्वच दिवसांमध्ये ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात येते. त्यामुळे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी शासनाकडून कोणताही कार्यक्रम राबविण्यात आला नाही तरीदेखील सर्वच विधानसभा मतदार संघांमध्ये मतदारांची संख्या ही वाढत जात आहे. मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारांची संख्या ही २१ लाख ४८ हजार ८५० एवढी होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी लोकसभा क्षेत्रात २२ लक्ष १९ हजार ३३ मतदारांची नोंद होती. तसेच १ जुलै २०२५ पर्यंत जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या २३ लक्ष ८९ हजार ७६५ इतकी झाली आहे.



विधानसभा निवडणुकीनंतर ९७ हजार मतदार वाढले 


पालघर जिल्ह्यात मतदार संख्येच्या तुलनेत सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ असलेल्या नालासोपारा या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीनंतर ते १ जुलैपर्यंत ४५ हजार ०६९ मतदारांची वाढ झाली आहे. त्या खालोखाल जास्त मतदारांची वाढ बोईसर विधानसभा मतदारसंघात झाली आहे. या मतदारसंघात १ जुलै पर्यंत २४ हजार ६३५ मतदार वाढलेले आहेत. तसेच वसई मतदारसंघात ८ हजार ३८६, पालघर मतदार संघात ५ हजार ९०३ , विक्रमगड मतदारसंघात ५ हजार ४७३, आणि डहाणू विधानसभा मतदारसंघात ८ हजार २३३ मतदारांची वाढ १ जुलै २०२५ पर्यंत झालेली आहे.



१ जुलै २०२५ रोजी मतदारांची संख्या


विधानसभा मतदारसंघ        एकूण मतदार संख्या
डहाणू                                 ३ लाख ९ हजार ४७२
विक्रमगड                           ३ लाख २३ हजार २१४
पालघर                               ३ लाख ४ हजार ४८२
बोईसर                               ४ लाख ३५ हजार ९६४
नालासोपारा                        ६ लाख ५३ हजार ५९५
वसई                                   ३ लाख ६३ हजार ०३८
एकूण                                 २३ लाख ८९ हजार ७६५


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा