सांगा... कसं जगायचं?

  29

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर

स्वातंत्र्य लढ्यात क्रियाशील असलेल्या स्वामी भवानी दयाल संन्यासी यांनी त्यांच्या आत्मकथेमध्ये एक किस्सा लिहून ठेवलाय तो सांगतो. स्वामीजी हिमालयाच्या यात्रेवर गेले होते. उंच उंच पर्वतरांगा. एका बाजूला पहाडाची भिंत आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी अशा अवघड पायवाटेवरून स्वामीजींचा प्रवास सुरू होता. भर दुपारची वेळ. माथ्यावर सूर्य तळपत होता. दिवसही उन्हाळ्याचे होते. ऊन आणि चढणीच्या प्रवासामुळे अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. त्यातही खांद्यावर लटकवलेली एक थैली... जीव कासावीस झाला होता. चालताना धाप लागली होती.

त्याचवेळी दहा-बारा वर्षांची एक मुलगी एका सहा-आठ वर्षांच्या मुलाला खांद्यावर घेऊन पहाड चढताना स्वामीजींनी पाहिलं. ती मुलगी देखील दमली होती. धापा टाकत होती. तिच्या खांद्यावर बसलेल्या त्या मुलाला रिझवण्याकरिता ती तशाही अवस्थेत गाणं गुणगुणत होती. त्या मुलाशी त्यांच्या पहाडी भाषेत काहीतरी बोलत होती. स्वामीजींना आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या मुलीला थांबवून विचारलं. ‌‘या मुलाला खाली उतरवून थोडं थोडं चालायला का नाही सांगत?‌’ ‌‘त्याच्या पायांना इजा झालीये. त्याला चालताना त्रास होतो.‌’ मुलीनं धापा टाकतच उत्तर दिलं.

‌‘अगं, पण तू स्वतः दमली आहेस. त्यातून हे एवढं ओझं घेऊन चालताना तुला त्रास नाही का होत?‌’‌ ‘कसला त्रास? आणि कसलं ओझं? हा भाऊ आहे माझा. ओझं नाहीये.‌’ त्या मुलीनं शांतपणे उत्तर दिलं आणि धापा टाकत पुन्हा गाणं गुणगुणत चालायला लागली.

स्वामी भवानी दयाल म्हणतात... ‘त्या दिवशी मला स्वतःला आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन सापडला.‌’ जे काम आपल्याला आपलं स्वतःचं आहे असं वाटतं ते काम केवळ काम राहत नाही. ते काम करताना जे काही केलं जातं त्याला इतर काहीही म्हणा, पण ‌‘कष्ट‌’ असं मुळीच म्हणता येणार नाही. कष्ट तिथे असतात जिथे कामाचा कंटाळा असतो. कष्ट तिथे वाटतात जिथे काम हे कुणाच्या तरी परक्या व्यक्तीसाठी केलं जातं. कष्ट तिथे जाणवतात जिथे ते काम करण्यामागे इतर काहीतरी मोबदला मिळवण्याची प्रेरणा मनात असते.

अशा प्रकारे कष्ट उपसून केलेल्या कामातून श्रम जाणवतात. पण त्याच्याच नेमकं विरुद्ध म्हणजे ज्या कामाला आपण आपलं मानतो, त्यात अडचणी आल्या तरीही त्या अडचणींचा त्रास होत नाही.

स्वतःहून स्वीकारलेली जबाबदारी पूर्ण करताना दमछाक झाली तरी त्याचं ओझं होत नाही. म्हणूनच तर... आणखी एक छोटा प्रसंग सांगतो. ही घटना आहे २००५ सालची. त्यावेळी रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळणारी ऑस्ट्रेलियाची टीम ‌‘जगज्जेता‌’ म्हणून मिरवत होती. भारत, पाकिस्तान, न्यूझिलंड, वेस्ट इंडिज... इंग्लंड... जगातल्या सगळ्या सगळ्या देशांच्या क्रिकेट टीमचा ऑस्ट्रेलियाने अक्षरशः फडशा पाडला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेट खेळायचं म्हणजे हार निश्चितच...

आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला देखील अशा या सगळ्या सहज हरणाऱ्या टीमसोबत लढण्यात फारसं स्वारस्य उरलं नव्हतं. त्यांनी आयसीसीला सांगितलं की, तुम्ही जगातले सगळ्यात उत्तमोत्तम खेळाडू निवडा आणि त्यांची टीम बनवा. आम्ही त्यांच्याविरुद्ध लढायला तयार आहोत.

आयसीसीने जगातल्या काही नामांकित माजी खेळाडूंची एक निवड समिती स्थापन केली आणि त्या निवड समितीला उत्तमातील उत्तम खेळाडू निवडून क्रिकेट टीम बनवायला सांगितलं. समितीने निवडलेल्या त्या टीममध्ये कोण कोण खेळाडू होते ते जाणून घ्यायचंय? त्या टीममध्ये होते भारतातील सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग... पाकिस्तानमधून शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर... ज्याच्या गोलंदाजीचा वेग ताशी नव्वद मैलाहून अधिक असायचा तो इंग्लंडच्या संघातला अँड्रयु फ्लिनटॉफ, स्टिव्ह हर्मिसन, सहा चेंडूंवर सहा षटकार मारणारा पहिला खेळाडू साऊथ आफ्रिकेचा गिब्ज... गोलंदाज मखाया नितनी, तसंच वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, श्रीलंकेच्या टीममधले दिग्गज मुथय्या मुरलीधरन आणि कुमार संगकारा... न्यूझिलंडचा डॅनिअल व्हेटोरी अशा अनेक उत्तमोत्तम खेळाडूंना भरमसाट पैसे देऊन त्यांची टीम बनवली आणि ती टीम ऑस्ट्रेलियन संघाच्या विरुद्ध खेळण्यासाठी नव्हे, तर लढण्यासाठी तयार करण्यात आली. त्यांना योग्य प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्या संघाचं नामकरण करण्यात आलं ‌‘वल्ड इलेव्हन.‌’ ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरुद्ध सज्ज असलेला जगातील दिग्गज खेळाडूंचा वल्ड इलेव्हन हा संघ समोरासमोर येण्यासाठी सज्ज झाले.

पन्नास ओव्हर्सचे एक दिवसाचे तीन सामने आणि सहा दिवसांची एक टेस्ट मॅच असा सामना होणार होता. जगातील सगळ्या क्रिकेटप्रेमी शौकिनांचं लक्ष या सामन्यांवर केंद्रित झालं होतं. हे सामने झाले आणि... आता तुम्हाला मी या सामन्यांचा निर्णय सांगतो.

पहिला एक दिवसाचा सामना ऑस्ट्रेलिया ८ विकेट, २५५ रन्स... वल्ड इलेव्हन सगळा संघ केवळ १६२ रन्समध्ये आऊट. दुसरा एक दिवसाचा सामना ऑस्ट्रेलिया ४ विकेट, ३२८ रन्स... वल्ड इलेव्हन सगळा संघ केवळ २७३ रन्समध्ये आऊट. तिसरा एक दिवसाचा सामना ऑस्ट्रेलिया ५ विकेट, २९३ रन्स... वल्ड इलेव्हन सगळा संघ केवळ १३७ रन्समध्ये आऊट.

एक दिवसाच्या तीनही मॅच ऑस्ट्रेलियाने सहज जिंकल्या. दिग्गज खेळाडू असलेल्या ‌‘वल्ड इलेव्हन‌’ संघाला तीनही मॅचमध्ये पन्नास ओव्हर देखील पूर्ण खेळता आल्या नाहीत. चौथा सामना होता सहा दिवसांची टेस्ट मॅच. त्या टेस्ट मॅचमध्ये देखील ऑस्ट्रेलियाने वल्ड इलेव्हन संघाचा फडशा पाडला. एक दोन नव्हे तब्बल २०१ धावांनी टेस्ट मॅच जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. वास्तविक वल्ड इलेव्हन हा संघ बलाढ्य होता. त्यातला प्रत्येक खेळाडू एकेका संघाला टक्कर देणारा होता. पण... पण त्यांच्याकडे जिद्द नव्हती. त्यांच्याकडे अभाव होता तो संघभावनेचा. त्यांच्याकडे अभाव होता तो जबाबदारीच्या जाणिवेचा.

‌‘हे काम माझं स्वतःचं आहे.‌’ या भावनेने ऑस्ट्रेलियन संघ एकवटला आणि म्हणूनच जिंकला... पैशासाठी खेळणं आणि देशासाठी खेळणं यात हाच मोठा फरक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात देखील आपण ज्यावेळी एखादं काम ‌‘आपलं स्वतःचं आहे‌’ या भावनेनं स्वीकारून त्यात स्वतःला झोकून देतो त्यावेळी ते काम हे केवळ काम राहत नाही. तो जगण्याचा एक भाग होतो. तो आपला नैसर्गिक श्वासोच्छाेवास होतो. त्यावेळी त्याचं ओझं वाटत नाही. विद्यार्थी दशेतला अभ्यास ज्यावेळी केवळ परीक्षेसाठी आणि परीक्षेपुरताच केला जातो, त्यावेळी थकवा येतो. कंटाळा येतो. एखादी गृहिणी मुलांचं संगोपन करताना, घरच्यांची काळजी घेताना आपुलकीच्या भावनेनं करते. त्यामुळे तिला कधीही कामाचं ओझं वाटत नाही. कोणतीही क्रिया ज्यावेळी जीव ओतून केली जाते त्यावेळी त्या क्रियेची क्रीडा होते. तो प्रवास खूप मौजेचा आणि आनंदाचा होतो. त्यावेळी होणारे श्रम हे कष्ट न वाटता सुखकारक वाटतात... काम तेच. पण त्या कामाकडे आपण कोणत्या दृष्टीनं पाहतो हे महत्त्वाचं... म्हणूनच तर कविवर्य मंगेश पाडगावकर त्यांच्या एका कवितेत म्हणतात. सांगा कसं जगायचं...? कण्हत कण्हत? की गाणं म्हणत...? तुम्हीच ठरवा... ठरलं तर... आजपासूनच हाती घेतलेल्या प्रत्येक कामात स्वतःला झोकून द्यायचं. प्रत्येक काम ‌‘एन्जॉय‌’ करायचं. जमेल ना...?

Comments
Add Comment

शहाणपण

जीवनगंध : पूनम राणे दिनेश शाळेतून घरी आल्यापासूनच खूपच नाराज दिसत होता. आई त्याला खोदून खोदून विचारण्याचा

पसायदान

काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा : श्रद्धा बेलसरे खारकर आळंदीच्या ‘पसायदान गुरुकुला’तून बाहेर पडताना खूप

सृष्टीची निर्मिती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ह्मदेवाने आपल्या विविध अंगापासून ऋषींची (मानसपुत्रांची) उत्पत्ती केली.

प्रथा...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर लंडनमध्ये घडलेली एक घटना... मार्गारेट थेंचरबाई पंतप्रधान असताना त्यांनी देशाच्या

‘वो भारत देश है मेरा...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ए न. सी. फिल्म्सचा केदार कपूर दिग्दर्शित ‘सिकंदर-ए-आझम’ हा सिनेमा १९६५ साली आला.

पालकत्व आणि वैवाहिक आयुष्यातील समतोल

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू नवीन पालक होणे हा आनंद, प्रेम आणि नवीन अनुभवांनी भरलेला एक रोमांचक प्रवास असतो. हा