सूर्याचा वर्णपट

  8

कथा : प्रा. देवबा पाटील


आदित्य हा अतिशय तल्लख बुद्धीचा अभ्यासू व ज्ञानपिपासू विद्यार्थी होता. आधीच शाळेत मधल्या सुट्टीत त्याची सुभाष नावाच्या लाह्या, लाडू व फुटाणे विकणाऱ्या गरीब मुलासोबत ओळख झाली होती. आज तो शाळा भरण्याच्या वेळेआधीच नेहमीपेक्षा जरा थोडा लवकरच आणि जास्त उत्साहाने आपल्या शाळेत गेला. कारण त्याला त्या मुलाकडून सूर्याची बरीच माहिती मिळत होती. त्याने शाळेत जाताच काल शाळेत आलेल्या त्या सुभाषला शोधले, पण तो काही त्याला दिसला नाही. दुपारच्या मधल्या सुट्टीत जसे ते आपापले डबे घेऊन त्या निंबाच्या झाडाखाली डबे खायला बसले तेवढ्यात सुभाष पुन्हा तेथे आला.


डबे खाता-खाता त्यांच्या सूर्याविषयीच्या ज्ञानवर्धक गप्पाटप्पांना ऊत आला.


“त्रिकोनी लोलकात सूर्याचा वर्णपट कसा निर्माण होतो दोस्ता?” पिंटूने प्रश्न केला.


सुभाष म्हणाला, “प्रकाश हा एका पदार्थातून दुस­ऱ्या पदार्थात जात असताना प्रकाशकिरणांचे वक्रीभवन होते.”


“वक्रीभवन म्हणजे काय?” मध्येच बंटूने प्रश्न केला.


“वक्रीभवन म्हणजे एका दिशेने जाणारा किरण दुस­ऱ्या पदार्थात शिरताना म्हणजे एका माध्यमातून दुस­ऱ्या माध्यमात जाताना तो किंचितसा वाकून आपली दिशा बदलतो.” तो मुलगा सांगू लागला, “वेगवेगळ्या पदार्थांत प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असतो. तसेच एका पदार्थातसुद्धा वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशकिरणांचा वेग हा वेगवेगळा असतो. हवेतून त्रिकोनी लोलकात (काचेच्या पार्श्वामध्ये) प्रकाशकिरण जात असताना, लोलकामध्ये निरनिराळ्या रंगांच्या किरणांचा वेग निरनिराळा असल्यामुळे या किरणांचे वक्रीभवन सारखे होत नाही म्हणजेच प्रत्येक रंगाचे वक्रीभवन निरनिराळे होते. अर्थातच वेगवेगळ्या रंगांची किरणे अपवर्तनानंतर निरनिराळ्या कोनात विचलित होतात. म्हणूनच ती रंगकिरणे एकमेकांपासून किंचितसे वेगवेगळे होतात. त्यामुळेच रंगपट दिसतो. त्यालाच वर्णपट किंवा वर्णपंक्ती असेही म्हणतात.” सुभाषने खुलासेवार सांगितले.


“शुद्ध व अशुद्ध वर्णपट कसे असतात?” चिंटूने विचारले.


“ज्यावेळी सूर्यप्रकाश लोलकावर पडतो त्यावेळी सूर्यप्रकाशातील प्रत्येक किरणांचे अपस्करण म्हणजे कंप्रतेनुसार विभाजन होऊन प्रत्येकाचा एक वर्णपट वा वर्णपंक्ती तयार होते. एका किरणाच्या वर्णपंक्तीचा काही भाग दुस­ऱ्या किरणाच्या वर्णपटावर पडल्यास वर्णपंक्तीचे रंग काही अंशी एक दुस­ऱ्यात मिसळतात. अशा वर्णपंक्तीस अशुद्ध वर्णपंक्ती म्हणतात, जर वर्णपंक्तीतील सर्व रंग संपूर्णपणे वेगळे झालेले असतील आणि थोड्या प्रमाणात देखील रंग एक दुसऱ्यात मिसळलेले नसतील, तर अशा वर्णपंक्तीस शुद्ध वर्णपंक्ती म्हणतात.” सुभाष म्हणाला.


“सूर्याच्या रथाला सात घोडे का असतात? सांग बरे?” अंतूने प्रश्न केला.


“सूर्याजवळ ना रथ, ना त्या रथाला सात घोडे. सूर्याच्या वर्णपटामध्ये सात रंगांची प्रकाशकिरणे आहेत. त्या वर्णपटाला सूर्याचा रथ व सात किरणांनाच रथाच्या सात घोड्यांची उपमा दिली आहे.” सुभाषने उत्तर दिले.


“प्रकाशात मूळ रंगकिरण कोणते आहेत सांग बरे?” मोंटूने माहिती विचारली.


“सूर्यप्रकाशात सात रंगकिरणे आहेत हे तर आता तुम्हा सर्वांना माहीतच आहे.” सुभाषने सहज विचारले.


“हो. सूर्यप्रकाशात ता, ना, पि, हि, नि, पा, जा म्हणजे तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा व जांभळा असे सात प्रकाशकिरणे आहेत.” अंतूने सांगितले. सुभाष म्हणाला, “बरोबर; परंतु लाल, निळा व हिरवा हे खरे तीनच प्रकाशातील मूळ रंगकिरण आहेत. त्यांच्या समप्रमाण मिश्रणाने पांढरा रंग बनतो. तांबडा व हिरवा प्रकाश मिळून पिवळा रंग, तांबडा व निळा मिसळल्याने किरमिजी आणि निळा व हिरव्याच्या मिश्रणाने गडद निळा प्रकाश बनतो.”


“सूर्यात विविध रंगकिरणे कशी निर्माण होतात मग?” बंटूने प्रश्न विचारला.


“कोणत्याही तप्त पदार्थाच्या प्रकाशात विविध रंगांचे तरंग निर्माण होण्यास त्या पदार्थातील अणूंची आंदोलने वा स्पंदने किंवा कंपने कारणीभूत असतात. सूर्यातील अणूंच्या आंदोलनांमुळे म्हणजे कंपनांमुळे सूर्यप्रकाशात विविध रंगांचे तरंग निर्माण होत असतात. सूर्यातील वेगवेगळ्या अणूंच्या आंदोलनांची कंपनसंख्या वा स्पंदनांक म्हणजे कंप्रता वा वारंवारिता ही वेगवेगळी असल्यामुळे वेगवेगळे तरंग निर्माण होऊन ते चोहीकडे पसरतात व आपणास सर्व तऱ्हेचा प्रकाश मिळतो.” सुभाषने उत्तर दिले.


नेहमीप्रमाणे त्यांची शाळेची मधली सुट्टी संपली व ते सारे मित्र आपापल्या वर्गाकडे जाण्यासाठी निघाले.

Comments
Add Comment

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक

बोल, बोल, बोल, जागेवाले की जय...

साक्षी माने  येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा

गौरवशाली भारतीय शिल्पकला

विशेष : लता गुठे बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या

सृष्टी निर्माता

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले