
प्रासंगिक : चंदू बोर्डे, माजी क्रिकेटपटू
भारतीय क्रिकेटविश्वात खास स्थान मिळवणाऱ्या सुनील गावसकरला १० जुलैला वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभकामना! क्रिकेटप्रेमींच्या मनात आपली जागा राखून ठेवणाऱ्या या थोर क्रिकेटपटूने स्वत:मधील लहान मूलही जिवंत ठेवले आहे, याची प्रचिती अलीकडेच भारतीय संघाच्या विजयानंतर त्याने मैदानावर केलेल्या मनमोकळ्या नृत्याद्वारे मिळाली. आजही क्रिकेटचे नाव निघते तेव्हा सुनील गावसकर अर्थात ‘सनी’चा उल्लेख अनिवार्य ठरतो. केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील क्रिकेटप्रेमी, समीक्षक, अभ्यासक यांच्या तोंडी आपसूकच त्याचे नाव येते. म्हणूनच वाढते वय हा केवळ एक आकडा असून यापुढेही सुनील गावसकरकडून क्रिकेटसंबंधी बरेच काम होईल, अशी अपेक्षाच नव्हे तर खात्रीही आहे.
मी निवड समितीचा अध्यक्ष असतानाचा एक प्रसंग आता स्मरतो आहे. तेव्हा सुनील गावसकरच्या नेतृत्वाखाली कानपूरला एक मॅच सुरू होती. आम्ही ती जिंकली आणि सगळे खेळाडू हॉटेलमध्ये परतले. त्या दिवशी सायंकाळी मी सुनीलला भेटायला गेलो आणि म्हटले की, ‘सनी, आम्ही ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून तुला पाठवत आहोत. ‘बेन्सन ॲड हेजेस’ स्पर्धेसाठी कर्णधारपदी तुझी निवड होत आहे.’ यावर त्याने हसून धन्यवाद दिले.
पण नंतर मी त्याला हेदेखील सांगितले की, तू या स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर करण्याचा विचार करू नकोस. आणखी बरेच दिवस तू आम्हाला हवा आहेस... यावर तो काहीही न बोलता केवळ गालातल्या गालात हसला... विषय तेवढ्यावरच संपला. पण तो निवृत्तीचा विचार करत असल्याची कुणकुण मला लागली होती. अर्थात त्याच्या या मन:स्थितीचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कोणताही परिणाम दिसला नाही. आपण ती स्पर्धा जिंकली.
रवी शास्त्रीला सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाल्याबद्दल ऑडी कार भेट मिळाल्याचा आणि सर्व संघाने जल्लोश करत आनंद व्यक्त करण्याचा तो प्रसंग आजही क्रिकेटरसिकांच्या स्मरणात असेल. हा सगळा सोहळा पूर्ण झाला आणि त्यानंतर सुनीलने आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. यावरून हेच दिसते की, त्याने प्रत्येक महत्त्वाचा निर्णय योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी घेतला होता. त्याने आयुष्यात घेतलेल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या निर्णयाबाबत हेच म्हणता येईल. त्यामुळेच उत्तम कसे खेळायचे याचे मापदंड घालून देण्याबरोबर अन्य निर्णयांमध्येही अचूकता आणि वेळेचे महत्त्व कसे राखायचे हे त्याच्याकडे बघून शिकण्याजोगे आहे. जणू त्याने सर्व खेळाडूंपुढे हादेखील आदर्श ठेवला आहे. कारण प्रत्येक खेळाडूने चांगले खेळण्याबरोबरच योग्य वेळी, आपली शारीरिक-मानसिक ताकद ओळखून, खेळ ओळखून निवृत्ती जाहीर करण्यासदेखील बरेच महत्त्व आहे.
अर्थात प्रत्यक्ष मैदानात उतरत नसला तरी सुनीलने क्रिकेटशी असणारे नाते कधीच तुटू दिले नाही. तो या खेळापासून कधीच लांब राहू शकत नाही. निवृत्तीनंतर क्रिकेट विश्लेषक, समालोचक या नात्याने तो कायम मैदानाशी जोडलेला राहिला. त्याची सामन्याचे समालोचक करण्याची पद्धतही प्रभावी आहे. त्याचे विश्लेषण आणि समालोचन क्रिकेटपटूच्या खेळामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीनेच असते. हे महत्त्वाचे वाटते कारण त्याचे स्वत:चे निरीक्षण आणि खेळातील ज्ञान खरोखरच खेळाडूंना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणारे ठरते. त्याच्याकडे उत्तम खेळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणारी सखोल माहिती आहे.
निवड समितीचा अध्यक्ष असताना मी त्याची ही हुशारी अगदी जवळून पाहिली आहे. त्याच्याशी बोलताना हे स्पष्ट जाणवत असे. असे असले तरी हा खेळाडू आपल्या मतांचा दुराग्रह धरणारा नाही. एखाद्याने त्याचे मत नाकारून वेगळे मत मांडले आणि त्याला ते पटले तर मोकळेपणाने स्वीकारण्यात त्याने कधीच कमीपणा मानला नाही. त्याची ही मनोवृत्ती कौतुकास्पद म्हणायला हवी.
एकदा आम्ही कोलकात्यामध्ये एक सामना खेळत होतो. त्यावेळी सुनीलच कर्णधार होता. खेळादरम्यान एक खेळाडू आजारी पडल्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड करायची होती. त्यानुसार मैदानावर जायचे, तपासणी करायची आणि खेळाडूची निवड करायची असे ठरले. मी सुनीलबरोबर ग्राऊंडवर गेलो आणि तुला टीममध्ये कोणता खेळाडू हवा आहे, असे विचारले. त्यावर त्याने चंद्रकांत पंडितचे नाव घेतले.
उत्तम फलंदाज आणि यष्टीरक्षक असणारा पंडित हवा आहे, असे उत्तर मिळाले. हे नाव चांगलेच होते, पण एक नवा आणि चांगली क्षमता असणारा खेळाडू निवडला तर टीम अधिक मजबूत बनेल, असे मला वाटत होते. म्हणून मी मोहम्मद अझरुद्दीनचे नाव समोर ठेवले. त्याला टीममध्ये घ्यावे असे मला वाटत होते, कारण आधीच्या सामन्यात त्याचा खेळ, फिल्डिंग, नेटमधील प्रॅक्टिस मी पाहिली होती. मला ती आवडली होती. सुनीलने माझे म्हणणे शांतपणे ऐकले आणि तुम्ही सांगत असाल तर माझा नकार नाही, असे म्हटले. त्यानुसार अझरुद्दीन मैदानात उतरला आणि पहिल्याच दिवशी शतक झळकावले. खेळ संपल्यानंतर गावसकर माझ्याकडे आला आणि ‘सर, तुम्ही बरोबर होतात’ असे म्हणत योग्य सल्ला दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. हा प्रसंग अगदी छोटासा आहे, पण यातूनही त्याच्या स्वभावातील विनम्रता, दुसऱ्याचे ऐकून प्रतिसाद देण्याची वृत्ती दिसून आली.
कोणत्याही खेळामध्ये महत्त्वाचे स्थान मिळाल्यानंतर, कर्णधारपद मिळाल्यानंतर मी सांगेल तेच व्हायला हवे, हा दुराग्रह येण्याचा मोठा धोका असतो. लोक स्वत:ला सर्वश्रेष्ठ आणि सर्वज्ञानी समजू लागतात. पण सुनीलचे वर्तन कधीच या पद्धतीचे राहिले नाही. तो प्रत्येक गोष्टीचा विचार करतो आणि नंतरच निर्णय घेतो. त्याच्यापेक्षा दुसऱ्या कोणाचे निरीक्षण, परीक्षण अधिक चांगले असेल तर ते मान्य करण्यात स्वत:चा कमीपणा समजत नाही.
खेरीज सूचना अमान्य असेल तर सौम्य शब्दांमध्ये नकार देण्यासही तो फार वेळ घेत नाही. त्याचा हा स्वभाव नेहमीच खेळाडू आणि संघाच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आला आहे. आजही आपण त्याचे समालोचन ऐकतो. हसत-खेळत, खुसखुशीत भाषेमध्ये त्याने केलेले सामन्याचे वर्णन आपल्याला आवडते, ऐकावेसे वाटते. यातूनही त्याच्यातील खिलाडू वृत्तीचे दर्शन घडते. त्याच्या वागण्या-बोलण्यामध्ये एक प्रकारची सहजता आहे. विचारांची देवाण-घेवाण करताही त्याची शैली समोरच्या व्यक्तीला दुखावणारी, क्लेष पोहोचवणारी, कमीपणा दाखवून देणारी दिसत नाही. त्याचे बोलणे मार्गदर्शक असते. म्हणूनच ते समोरच्या व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते.
आजचे क्रिकेट बदलले आहे. त्यात वेगवेगळे प्रकार मिसळले आहेत. प्रचंड पैसा, प्रसिद्धी आली आहे. स्वाभाविकच या खेळात कारकीर्द घडवू पाहणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. या सगळ्यांनीच सुनील गावसकरसारख्या ज्येष्ठ खेळाडूकडून अनेक गुण घ्यायला हवेत, असे वाटते. नवोदितांनी त्याचा खेळ बघावाच, पण तो करत असलेले विश्लेषणही काळजीपूर्वक, अभ्यासपूर्वक ऐकावे. खरे तर आजच्या पिढीतील खेळाडूंना लाभलेली ही फार मोठी संधी आहे. त्यानुसार आपल्या खेळात सुधारणा केली, तर निश्चितच चांगले क्रिकेट खेळता येईल. आमच्या वेळी कोणाचेही मार्गदर्शन नसायचे. आम्ही स्वत:च पाहून शिकायचो.
पण आज गावसकरसारख्या ज्येष्ठ क्रिकेटपटूकडून त्यांना उत्कृष्ट सल्ला मिळत आहे. खेळाडूच्या प्रगतीसाठी तो मार्गदर्शक ठरणारा आहे. तेव्हा याचा लाभ घ्यायलाच हवा. शेवटी ही बाब खेळाडूंबरोबरच भारतीय क्रिकेट संघासाठीदेखील महत्त्वपूर्ण आहे. आता सुनील गावसकर यांची वयाची ७५ वर्षे पूर्ण पूर्ण झाली आहेत. अर्थात तो या वयाचा अजिबात वाटत नाही. आधी उल्लेख केल्याप्रमाणे आजही त्याच्यात दडलेले लहान मूल वारंवार दिसते. तो कधीच थकलेला दिसत नाही. सुनील गावसकर या नावाचा करिश्मा असाच कायम राहो आणि त्याला उदंड आयुष्य मिळो हीच प्रार्थना.