पापक्षालन

  55

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर


अनेक इंग्रजी शाळा या महाराष्ट्रात अशा फोफावल्या की, जिथे अभ्यासक्रमात मराठी ही भाषाच नव्हती, तेव्हा ती तिथे का नाही? हा प्रश्न त्या शाळांच्या संस्थापकांना कुणी विचारला नाही.


‘माहिती तंत्रज्ञान’ या विषयामुळे मराठीवर गंडांतर आले तेव्हा मराठीचे राजकीय कैवारी मराठीच्या मागे किती उभे राहिले?


भल्या भल्या राजकीय नेत्यांना इंग्रजी शाळा उभ्या कराव्याशा वाटल्या. आदर्श मराठी शाळा उभी करावीशी वाटली नाही. ज्या महानगरपालिकेने मराठी शाळांच्या मागे उभे राहायचे, तिने इंग्रजी पब्लिक स्कूल सुरू केल्या.
आता तर काय, ‘विजयी वीर’ भाषणातून सांगताहेत की अमुक इंग्रजी शिकले, तमुक इंग्रजीत शिकले पण त्यांच्या मराठी विषयीच्या अभिमानाबद्दल कुणी शंका घेईल का? (टाळ्यांचा प्रचंड कडकडाट)
या टाळ्या विजयीवीरांचे हे महान विचार मान्य करत होत्या की, “तुम्ही इंग्रजीत शिका, पण मराठीचा कट्टर अभिमान बाळगा.’’


हे सगळे प्रचंड धोक्याचे वाटते मला. पहिलीपासून हिंदी सक्ती नको, हे संपूर्ण मान्य पण हा मुद्दा मांडत असताना इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची भलामण करायची, हे न्याय्य वाटत नाही आणि याचा अहंकार मिरवायचा हे तर अजिबातच पटणारे नाही.


इंग्रजीशी माझे कधीही वैर नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर जग जोडणारी भाषा म्हणून तिचे महत्त्व आहे पण म्हणून महाराष्ट्रातल्या एकेक मराठी शाळा बंद पडत असताना समाज जर आपल्या नेत्यांच्या दाखल्यांना दाद देऊन इंग्रजी शाळांचे समर्थन करू लागला, तर ही निश्चित धोक्याची घंटा आहे. इंग्रजी भाषा चांगली येणे ही ज्ञानाच्या विविध क्षेत्रांतील आवश्यक गोष्ट आहेच, पण ती भाषा म्हणून शिकणे आणि इंग्रजी माध्यमातून शिकणे या दोन स्वतंत्र
गोष्टी आहेत.


मराठी शाळा संपवण्याच्या पापाचे धनी वेगवेगळ्या काळात वेगवेगळे पक्ष झालेले आहेत. आता मराठीची बाजू घ्यायची असेल तर मराठीसाठी या पक्षांनी काम उभे करून दाखवावे. राज्याचे भाषाधोरण मराठीसाठी राबवून प्रत्यक्षात आणण्यासाठी झटावे. मराठीतून पाट्यांचा ‘आट्यापाट्या’ खेळ पुरे झाला. मराठीचा आवाज कामातून बुलंद करणे ही काळाची गरज आहे.त्यासाठी कोण कोण काय करणार आहेत?


पावसापाण्यातून दूरवरच्या मराठी शाळांच्या दिशेने चालणाऱ्या चिमुकल्या मुलांचा त्रास कमी करणार आहेत? मराठी शाळा वाचवण्याकरिता, त्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता महाराष्ट्रीय समाजाला आर्थिक बळ उभे करण्याचे आवाहन करणार आहेत का? महाराष्ट्रातील अमराठी भाषकांसाठी मराठी शिक्षणाची व्यवस्था करायला हवी असे यांना वाटते आहे का? मराठी ग्रंथालये, वाचन संस्कृती, मराठी शाळांतून शिकलेल्या मुलांना नोकऱ्या, महाविद्यालये आणि विद्यापीठांतील मराठीचे शिक्षण याबाबत यांना किती काळजी वाटते? मराठीच्या विकासासाठी कोण किती निधी उभा करणार आहेत?


हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मराठीचे वारे जोरात वाहू लागले आहेत हे खरे आहे, पण याच वळणावर महाराष्ट्रीय समाजाची खरी परीक्षा आहे. ही परीक्षा सर्वसामान्य मराठी माणसांची आहे तितकीच शासनाची आहे. ती राज्यकर्त्यांची आहे, तितकीच विरोधकांची आहे. कुणाचीच यातून सुटका नाही. पापाचे धनी सगळेच आहेत. आता वेळ पापक्षालनाची!

Comments
Add Comment

ध्यास मराठीतून शिकण्याचा

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर मी १३ वीत असताना आमच्या कोकजे सरांनी नेरळ येथील वेगवेगळ्या शाळांची ओळख करून दिली.

हरवलेलं माणूसपण

मोरपीस: पूजा काळे स्वामी तुम्ही पाहताय ना! काळ सोकावलायं, माणसातील माणूसपण हरवत चाललयं! देवळाबाहेरच्या परिसरात

शेतकरी बांधवांना वरदान ठरणारी 'सब्जी कोठी'

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे रक्षाबंधन हा बहीण-भावांच्या नात्याचा उत्सव. भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणून ती त्यास

सण आयलाय गो...

उदय खोत नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा जिव्हाळ्याचा सण. दरवर्षी दर्याराजाची पूजा करून नारळ अर्पण करून

हसरी शंभरी...

चारुहास पंडित : प्रसिद्ध व्यंगचित्रकार आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून शब्देवीण संवाद साधणारे ज्येष्ठ

सुखावणारा ऋतुगंध

तुझी माझी पहिली भेट म्हणजे मृद्गंधाचे अनमोल दरवळते अत्तर नाते तुझे नी माझे हृदयस्थ सुंदर बहरत राहते माझ्या मनी