श्रद्धा

  40

माेरपीस : पूजा काळे


तू श्रद्धा, तू भक्ती, तू निस्सीम प्रेम आहेस, खरं सांगू देवा तू माझ्यासाठी देव आहेस. आपल्यामध्ये परमेश्वर आहे अशा भावनांची जागृती म्हणजे श्रद्धा. देव होणं सोपं नसतं, माणसातलं माणूसपण ज्याला ओळखता येतं, तो देवत्वाच्या नजीक जातो. श्रद्धा दाखवण्याची गोष्ट नसल्याने तिचा विषय नाजूक, गुंतागुंतीचा ठरतो. श्रद्धा अंतर्मनातील अनुभूतीने साध्य होते. जसे की, तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीतून वर येण्याचा प्रसंग. श्रद्धेचं घोटभर पाणी मानवाला प्राप्त झालं की, त्याची वाढ वटवृक्षासारखी होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा मानवी जीवनात भाकरी एवढीचं श्रद्धाही आवश्यक असल्याचे मानते. आपल्या आयुष्यात श्रद्धेला अपार महत्त्व आहे. देव-देवतांवर, माणसाच्या जगण्यावर, जीवनातल्या प्रत्येक कृती आणि कर्मावर विराजमान झालेली श्रद्धा मानवनिर्मित अनुभूतीतून जन्मते. एखाद्या समस्येचं निराकरण करताना आपण परमेश्वराची करुणा भागतो. आपल्यावरील नैराश्याचं मळभ दूर सारण्याचे अभिवचन घेतो, हा असतो श्रुद्धेचा भाग. एका अभंगात संत नामदेव म्हणतात, सुख देवाशी मागावे, दुःख देवाला सांगावे. म्हणजे प्रत्यक्ष नामदेवांच्या श्रद्धेतून प्रकटलेला अभंग श्रद्धेविषयी अपार श्रद्धा दर्शवतो. श्रद्धा म्हणजे संशयरहित विश्वास. हा विश्वास ठेवूनच मनातल्या गुजगोष्टी, एखादी घटना विचारविनिमय करून आपण जवळच्या व्यक्तीला सांगतो. कर्मावर आपला विश्वास असल्याने, कृती घडत असतात. कृतीतून अवतरलेल्या श्रद्धा निराशेत आशा प्रज्वलित करतात. तर सफलतेत विनम्र व्हायला शिकवतात. अशावेळी कर्मफळाच्या श्रुतीतून सकारात्मक बाबींचा विकास घडवून आणणारी श्रद्धा श्रेष्ठ ठरते.


श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन बाजूंचा विचार करता, धर्माच्या नावाखाली कोंबड्या, बकऱ्यांचे बळी देणं ही झाली अंधश्रद्धा. तिच्या वाटेने जाणारे आळशी, स्वप्नाळू, निरक्षर असतात किंवा आपण असे म्हणू शकतो की, सदसदविवेक बुद्धीचा विचार करण्याची क्षमता जिथं संपते, तिथून अंधश्रद्धेची पायवाट सुरू होते जी मानवाला असहाय्य करते. याउलट बुद्धीच्या बरोबरीने जाणारी श्रद्धा डोळस असल्याने इच्छाशक्ती प्रबळ करून निराशेला दूर सारते.


उदाहरणार्थ आजारातून बरं होण्याची नैसर्गिक शक्ती प्राणीमात्रात असली, तरी तिला प्रकट करण्याची जादू श्रद्धेतून येते. श्रद्धेवाचून जीवनाचा विचार होऊ शकत नाही, तिच्या जोरावर प्रचिती आणि तिच्या बळावर साध्य करण्याची क्षमता निर्माण होते. आशावादाची सनई असलेली श्रद्धा विचारांनी जागवता येते. षडरिपूंवर विजय मिळवण्यासाठी गुरू-सद्गुरू, ग्रंथ-पुस्तके, नीतिमूल्य, त्याग-दया यांच्या जोडीने चांदणरूपी श्रद्धा आली की जीवनातील काळोख दूर सरतो. राग-लोभ, सुख-दुःख, आचार-विचार बदलण्याचं सामर्थ्य श्रद्धेत असतं. ध्यासापायी निर्माण होणाऱ्या श्रद्धेत कामाचा त्रास होण्याचं कारण उरत नाही. संसाराच्या रिंगणात एकमेकांच्या शारीरिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक सफलतेसाठी मनाच्या शक्तीचा वापर करून योजलेल्या कल्पना ध्येयवादाला सफल करतात. पावलांना शक्ती आणि गती प्रदान करणारी ध्येय महत्त्वाकांक्षेला किल्ली देऊ लागली की, पराक्रमाचे काटे आपोआप फिरू लागतात. श्रद्धेतून दिव्यत्वाची स्वप्न साक्षात उतरविणाऱ्या स्त्रिया खुल्या हाताने ऊबदार अंतकरणाने महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालतात.


दुसरं म्हणजे अंधश्रद्धेचा त्याग करणं हे तत्त्वज्ञानातील पहिलं पाऊल आहे. मनाच्या समाधानासाठी मंदिराच्या दिशेने टाकलेली पावलं तमोगुणांचा नाश करत आत्मानंद देतात. सत्य प्राप्त करणारी श्रद्धा प्रिय होताच दृढविश्वास निर्माण होतो. तुम्ही विश्वास ठेवा वा नका ठेवू, पण प्रत्येकात कुठे ना कुठेतरी श्रद्धेची पाळमुळं रोवलेली असतात. गरज असते ती त्यावरील विश्वासाची.


विश्वास वृद्धिंगत झाला की, श्रद्धा भरून वाहू लागते. कधी भजनात तल्लीन होते. कधी कीर्तनात दंग होते. कधी मदतीला धावते तर कधी कर्तव्याला पावते. श्रद्धा आपापली असते. अंतरंगातून जाणली तर परमेश्वरालाही पाझर फुटतो एवढं तिचं महत्त्व आहे. शक्ती, विवेक, चांगुलपणाचा ती पाया आहे. मानवाला क्रियाशील बनवणाऱ्या श्रद्धेवर माझा विश्वास आहे. चांगले विचार पेरावे‌ या अानुषंगाने आज या लेखाचा प्रपंच, हा देखील माझा माझ्यावर असलेल्या श्रद्धेचाच भाग आहे.

Comments
Add Comment

मातृत्वातून उद्योजकतेकडे झेप

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती. त्यामुळे लहान बाळाला काहीही झाले की, घरातील

सर्प साक्षरता हवी!

डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक)  शहरीकरणामुळे आणि मानवाच्या अतिक्रमणामुळे सापांचे अस्तित्व धोक्यात आले

जगाचा तोल सावरणारी माणसे

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर व्यक्तिचित्रे हा मराठी साहित्यातील साहित्यप्रकार पु. ल. देशपांडे यांनी उभ्या केलेल्या

श्रावणधून

माेरपीस : पूजा काळे  तूहवासं, तरीही नकोसा असलेल्या या नात्यामध्ये चिंब भिजताना, मन रमवताना लाडे लाडे करत तुला

मुलांच्या आकलन क्षमतेवर मोबाइलचा घाव

अमोल हुमे आजच्या डिजिटल युगात मोबाइल आणि सोशल मीडिया हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. माहिती

अमेरिकेच्या नवीन कायद्याची डोकेदुखी

आरिफ शेख  अमेरिकेच्या ‌‘वन बिग ब्यूटीफुल‌’ विधेयकामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात तात्पुरती तेजी येईल; परंतु