Friday, October 24, 2025
Happy Diwali

सांगली पोलिसांची धडाकेबाज कारवाई: २० लाखांच्या दरोड्यातील आरोपी अवघ्या ३ तासांत अटक केली

सांगली पोलिसांची धडाकेबाज कारवाई: २० लाखांच्या दरोड्यातील आरोपी अवघ्या ३ तासांत अटक केली

सांगली: सांगली पोलिसांनी एका धाडसी दरोड्याचा छडा लावत अवघ्या तीन तासांत एका आरोपीला अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. सांगली-सातारा जिल्ह्याच्या सीमेवर, भुईज पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ जुलै रोजी पहाटे २:४३ ते ३:४५ दरम्यान घडलेल्या या घटनेत एका सराफ व्यापाऱ्याकडून २० लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल पोपट हासबे (रा. हिवरे, ता. खानापूर, जि. सांगली) हे सराफ व्यापारी आपल्या साथीदारांसह जात असताना, ८ ते १० जणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला चढवला आणि २० लाखांची रोकड लुटली. सातारा कंट्रोल रूमकडून माहिती मिळताच, सांगली पोलिसांनी तात्काळ हालचाल केली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला. पोहेकॉं उदय साळुंखे आणि सागर टिंगरे यांना तासगावजवळ आरोपींच्या गाडीचा अपघात झाल्याची गोपनीय माहिती मिळाली. अपघातानंतर दरोडेखोर डोंगराळ भागात पळून गेले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने डोंगरात शोधमोहीम राबवली आणि विनीत राधाकृष्णन (वय ३०, रा. पलाकाठ, केरळ) नावाच्या एका आरोपीला लपलेल्या अवस्थेत पकडले.

आरोपी विनीत राधाकृष्णन याने आपला गुन्हा कबूल केला असून, त्याचे साथीदार पळून गेल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याच्यावर हायवेवर दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. पुढील तपास भुईज पोलीस करत आहेत. सांगली पोलिसांनी दाखवलेल्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सांगलीत २४ वर्षीय तरुणाची हत्या, परिसरात भीतीचे वातावरण सांगली, १२ जुलै २०२५: शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र असून, वाल्मिकी आवास परिसरात एका २४ वर्षीय तरुणाची धारदार हत्याराने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ कांबळे असे या मृत तरुणाचे नाव असून, अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >