Sunday, August 3, 2025

Russian Women Rescued: गोकर्णच्या किर्र जंगलात आढळली रशियन महिला, गुहेत काढले दिवस, व्हिसा ८ वर्षांपूर्वीच संपला

Russian Women Rescued: गोकर्णच्या किर्र जंगलात आढळली रशियन महिला, गुहेत काढले दिवस, व्हिसा ८ वर्षांपूर्वीच संपला

कर्नाटक: कारवार जिल्ह्यातील कुमठा तालुक्यातील रामतीर्थ टेकड्यांमध्ये घनदाट किर्र जंगलातील एका दुर्गम गुहेत गस्तीला असणाऱ्या पोलिसांना एक रशियन महिला आपल्या दोन लहान मुलींसोबत राहत असलेली आढळून आली. आध्यात्मिक प्रवृत्तीच्या या रशियन महिलेला अशा धोकादायक जागेत राहताना पाहून पोलीस देखील चक्रावले.


यासंदर्भात मिळलेल्या अधिक माहितीनुसार,  संबंधित रशियन महिलेचे नाव नीना कुटीना ऊर्फ मोही (वय ४०) असे असून,  सुमारे दोन आठवड्यांपासून रामतीर्थ टेकड्यांमधील एका नैसर्गिक गुहेत ती राहत होती. जी उत्तर कन्नड जिल्ह्यात आहे. त्या महिलेसोबत तिच्या दोन मुली प्रेया (६) आणि अमा (४) होत्या. ही महिला बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. ज्याची वैधता ८ वर्षांपूर्वी संपली आहे. तेव्हापासून ही महिला भारतातच अडकली होती, हिंदू धर्म आणि अध्यात्माने प्रभावित होऊन हि महिला गोव्याहून गोकर्ण येथे आली असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दाट जंगलांनी वेढलेल्या गुहेत महिलेने एक साधे घर बांधले होते. महिलेने सांगितले की ती तिचा बहुतेक वेळ पूजा आणि ध्यानात घालवत होती.


या प्रकरणाची माहिती देताना उत्तर कन्नडचे एसपी एम. नारायण यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या भूस्खलनानंतर नियमित गस्त घालत असताना मंडळ पोलिस निरीक्षक श्रीधर आणि त्यांच्या पथकाला गुहेबाहेर कपडे लटकलेले दिसले. रामतीर्थ टेकडीच्या दाट झुडुपांमधून पोलिस अधिकारी जेव्हा गुहेत पोहोचले, तेव्हा त्यांना मोही आणि तिची दोन मुले गुहेत आढळली. अतिशय धोकादायक भाग आणि जंगली प्राण्यांनी वेढलेल्या या भागांत हे कुटुंब इतके दिवस कसे टिकून राहिले आणि त्यांनी यादरम्यान काय खाल्ले? हे सर्व आश्चर्यकारकच आहे. शिवाय या घटनेने स्वतः पोलीसही चक्रावले आहेत.


सध्या मोही आणि तिच्या दोन्ही मुलींना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून. साध्वी चालवत असलेल्या आश्रमात त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली  आहे. पोलिसांनी सांगितले कि, "आम्ही त्यांना गोकर्णहून बंगळुरूला नेण्याची आणि त्यानंतर परत पाठवण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने, रशियन दूतावासाशी या संबंधित संपर्क साधण्यात आला आहे."


ही महिला भारतात किती काळापासून राहत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी बेंगळुरूमधील परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाशी (FRRO) संपर्क साधला आहे. महिलेला आणि तिच्या दोन्ही मुलींना रशियाला परत पाठवण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.

Comments
Add Comment