
प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
खूपदा आपण सोशल मीडियावर जायचे नाही, असे मनापासून ठरवतो; परंतु तसे आपल्याला निश्चितपणे करता येत नाही. मला अजूनही आठवतंय फेसबुक सुरू होऊन सात-आठ वर्षे झाली असतील. मी जाणीवपूर्वक फेसबुकवर आपले अकाऊंट उघडायचे नाही असे ठरवले होते. कोणत्याही गोष्टीची जाहिरात करणे चुकीचे आहे असे माझे मन मला सांगत होते. त्यात फेसबुक म्हणजे तर सरळ सरळ चेहरा दाखवणे!
दिवस जात होते. सर्व मित्र-मैत्रिणींच्या बोलण्यामध्ये ‘फेसबुक’विषयी काहीतरी असायचे. कोणीतरी मला येऊन तुझा फोटो फेसबुकवर पाहिला, असे सांगायचे पण तो फोटो मी पाहू शकायचे नाही. कधी कोणी मुद्दामून आपल्या मोबाईलमधून दाखवायचे कधी ते शक्यही होत नव्हते. काही दिवसांनंतर असे झाले की एखाद्या संस्था मला कार्यक्रमासाठी बोलवायचे आणि अगदी आदला दिवस आला तरी त्यांची पत्रिका आलेली नसायची. मग विचारावे किंवा कसे विचारावे, अशा संभ्रमात मी त्या संस्थेला फोन करायचे तेव्हा आयोजकांपैकी कोणीतरी सांगायचे की कार्यक्रम तर आहे, तुम्हाला यायचेच आहे, कारण पत्रिकेवर तुमचे नाव आहे. महिनाभर आधीच माहिती दिलेली आहे आणि तुम्ही येणार असल्याची ग्वाही आम्हाला दिली आहे. मग मी त्यांना म्हणायचे, “पत्रिका नाही आली म्हणून विचारलं.” पत्रिका तर टाकली आहे फेसबुकवर.
विषय संपला. त्यानंतर एखादा कार्यक्रम झाल्यावर किंवा मित्र-मैत्रिणींच्या भेटी झाल्यावर त्यांना कौतुकाने, “अजून मला पाठवले फोटो का नाहीत?” असे विचारले तर ते सांगायचे की सर्व फोटो फेसबुकवर टाकलेले आहेत. असे होता होता असे झाले की आठवड्याला एक दोन कार्यक्रम करणारी मी सहा महिन्यात एकही कार्यक्रम केला नाही म्हणजे कार्यक्रम करणारी मी कोण? हो, मला कार्यक्रमालाच कोणी बोलवलं नाही आणि माझ्या लक्षात आले की जर आपला चेहरा फेसबुकवर दिसला नाही तर लोक आपल्याला विसरतात. लोकांना आपण कवी, लेखक, वक्ता असल्याचे खरोखर विसरायला होते आणि आपण हळूहळू विस्मृतीत जातो. हे एक वेळ चालू नाही गेले असते; परंतु मुंबईत अगदी घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कार्यक्रमाविषयी माहिती मिळणे बंद झाले. कार्यक्रमाला रसिक म्हणून जाण्यासाठी तुम्हाला फेसबुक अकाऊंट असण्याची गरज निर्माण झाली नाही तर कार्यक्रम करणेच मुश्कील होते. मग मी जाणीवपूर्वक माझ्या, कॉलेज शिक्षण संपवून बाहेर पडलेल्या एका विद्यार्थिनीला घरी बोलवून फेसबुक अकाऊंट उघडून घेतले. तिने सर्व प्रकारच्या सिक्युरिटी सेटिंग करून दिल्या आणि अनेक जणांना माझे फ्रेंड बनवून दिले. त्यानंतर खूप दिवस तीच माझे अकाऊंट ऑपरेट करत होती पण एक गंमत म्हणून किस्सा सांगते की, माझे अकाऊंट उघडल्यावर साधारण त्या महिन्यात मी एकंदरीत अठरा कार्यक्रम केले. म्हणजे अठरा जणांनी मला कार्यक्रमाला बोलावले. आता आले ना तुमच्या लक्षात...? म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडी, तुमचे आनंद, तुमचे अस्तित्व जपण्यासाठी किंवा प्रगतीसाठी कुठेतरी ‘फेसबुक’सारखे सोशल मीडिया लागते. ही कदाचित खूप चुकीची गोष्ट आहे, हे मलाही आतून नेहमी जाणवते पण कधीकधी काही गोष्टींना उपाय नसतो त्याप्रमाणेच ही गोष्ट आहे. आता आज ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मला तुम्हा सर्वांचे लक्ष वळवायचे आहे ती गोष्ट अशी आहे की, एकदा एका मुलाने (चेहऱ्यावरून तो तरुण दिसत होता) एक पोस्ट टाकली की तो आयुष्याला कंटाळलेला आहे. अगदी आत्महत्या करावीशी वाटत आहे. मी त्यावर कमेंट टाकली की तुम्ही कोणत्या तरी कामांमध्ये स्वतःचे मन गुंतवा म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही. चांगली पुस्तके वाचा. चांगल्या कार्यक्रमांना जा. चांगल्या माणसांना भेटा म्हणजे तुमच्या मनातून आत्महत्येचे विचार निघून जातील.त्याच्या मनातून आत्महत्येचे विचार निघून गेले की नाही याची मला कल्पना नाही; परंतु त्याच्या मनातून त्याने स्वतःहूनच मला काढून टाकले म्हणजे मला अनफ्रेंड केले. इथे माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि त्यांना वेगळ्याच गोष्टीकडे वळवणे असे काही वेगळे उद्देश या लोकांचे असतात.
एका तरुण मुलीने स्वतःचा एक फोटो ‘फेसबुक’वर टाकला. तिने खूप कमी कपडे घातलेले होते आणि तिने त्यावर विचारले की, ‘मी कशी दिसते?’ यावर अनेकांनी अनेक कमेंट टाकल्या की, ‘तू छान दिसतेस’ आणखीही काही अनपार्लमेंटरी शब्दात कमेंट टाकलेल्या होत्या. त्या वाचणे म्हणजे मनाला त्रासदायक होत्या. आणखी एका मुलीने अशाच स्वरूपाचा फोटो टाकून, ‘माझे वय काय?’ असे विचारले होते. तर त्यावर लोकांनी ‘तुझे वय काहीही असले तरी तू छान दिसतेस’ किंवा ‘आम्हाला तुला कोणत्याही वयात जवळ घ्यायला आवडेल’ वगैरे घाणेरड्या कमेंट टाकलेल्या होत्या. मुख्य म्हणजे या सगळ्या कमेंट्सवर तिने लाईक टाकलेले होते. लाईक आणि कमेंट्स मिळवण्यासाठी आजकाल माणसे कोणत्या थराला जातात, हे मी काय आपण सर्वच पाहत आहोत!
अलीकडे एका माणसाने ‘आपले बायको सोबतचे संबंध चांगले नाहीत तर मी तिच्या सोबतच राहायचे की आणखी कोणाचा शोध घ्यायचा?’, असे विचारले होते. त्यावर अनेक बायकांनी ‘आम्ही तुझ्याबरोबर राहायला तयार आहोत. तिला काडीमोड दे’, अशा काही कमेंट्स टाकल्या होत्या आता यावर आपण काय बोलणार?
यावर्षीचे ‘जागतिक शांतीसाठी’चे नोबेल पारितोषक कोणाला मिळाले आहे, या प्रश्नाचे उत्तर नेमके किती जणांना माहीत असेल मला शंका आहे; परंतु यावर्षी एखाद्या अभिनेत्याने व अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली आहे?, ती का झाली आहे? त्याला जबाबदार कोण? याविषयीची माहिती विचाराल तर ती माहिती ९०% पेक्षा जास्त लोकांना व्यवस्थित माहीत असते. अशा पोस्टकडे अनेकांचे व्यवस्थित लक्ष जाते आणि साहजिकच मग त्या पोस्टला भरपूर लाईक्स, कमेंट्स मिळतात.
अलीकडे आपला स्वतःचा, आपल्या पत्नीचा, आपल्या मुलांचा, आपल्या आई-वडिलांचा, आजी- आजोबांचा, नात्यागोत्यातील आणि मित्र-मैत्रिणींच्या वाढदिवसाचा, स्वतःच्या आणि त्यांच्या लग्न वाढदिवसाचे फोटो टाकून त्यांना शुभेच्छा देण्याची पद्धत वाढत चालली आहे. त्यामुळे धावपळीच्या आयुष्यात माणसे एक लाईक करून किंवा शुभेच्छा देऊन पुढे पळत असतात. या पळापळीत कधीकधी एखादा माणूस मेल्याची पोस्ट असते आणि तरी तो सुंदर, हसरा फोटो पाहून एक लाईक आणि ‘अभिनंदन’ अशी कमेंट टाकून पुढे जातो. गंमत म्हणजे महिना दोन महिन्यानंतरही या पोस्टवर त्याने त्याची कमेंट डिलीट केलेली नसते. यावर उपाय काय? म्हणूनच मला वाटतं की आपल्याकडे जी पोस्ट पूर्णपणे वाचण्यासाठी वेळ आहे ती वाचून त्यानंतर आपण त्यावर लाईक किंवा कमेंट दिल्या तर जास्त संयुक्तिक होईल, असे मला वाटते!