विशेष : डॉ. दीपक शिकारपूर
आजघडीला देश एका संक्रमणावस्थेतून जातो आहे. सध्या विविध आघाड्यांवरच्या विकासाचा वेग किंचित मंदावल्यासारखा दिसतो आहे खरा. मंदीचे ढग अजूनही क्षितिजावर रेंगाळत आहेत, पण सगळे चित्र निराशाजनक नक्कीच नाही. विकासाचा, वाढीचा, उत्पादनाचा वेग मंदावला आहे; परंतु थांबलेला नाही. ही अवस्था लवकरच जाईल.
जगात अशा रीतीने चिरंतन किंवा शाश्वत काहीही नसते आणि म्हणूनच या मंदीचा जास्त बाऊ करू नये. कारण या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि देदीप्यमान यश मिळवण्यासाठी आपल्याकडे विविध कौशल्ये आत्मसात केलेली माणसे ऊर्फ स्किल्ड मॅनपॉवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. इथे महिलाशक्ती अतिशय महत्त्वाची आहेत. एकविसाव्या शतकाची सुरुवात होऊन आता २५ वर्षे झाली आहेत. तरीही, गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये ज्या प्रकारे बदल झाले तितके त्या आधीच्या ५० वर्षांमध्येही झाले नव्हते असे म्हणता येईल.
स्मार्टफोनच्या रूपाने संगणकीय क्रांतीचे मानवी जीवनाच्या विविध पैलूंवर झालेले परिणाम आपण पाहतो आणि अनुभवत आहोतच. नवतंत्रज्ञान आणि महिला या दोन घटकांचा आजच्या समाजात अत्यंत महत्त्वपूर्ण संबंध आहे. नवतंत्रज्ञानाच्या वापरामुळे महिलांना विविध क्षेत्रांमध्ये आपली क्षमता सिद्ध करण्याचे, नव्या आव्हानांना सामोरे जाण्याचे आणि आपल्या जीवनातील समस्या सोडवण्याचे अद्वितीय मार्ग मिळाले आहेत. आज महिलांसाठी इंटरनेट, स्मार्टफोन आणि डिजिटल उपकरणे यांचा वापर अत्यंत सोपा आणि उपयुक्त झाला आहे. विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर शिक्षण घेणे, ऑनलाइन व्यापार सुरू करणे आणि सामाजिक नेटवर्किंग करणे यामुळे महिलांना आपला व्यवसाय किंवा करिअर वाढवण्याची संधी मिळाली आहे.
महिलांना घराबाहेर काम करण्यासाठी, सुरक्षित पर्यावरण मिळवण्यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वपूर्ण ठरला आहे. आपल्या देशात महिलांनी अनेक स्टार्ट अप्स सुरू केले असून त्यात पहिल्या पिढीच्या युवा मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. महिला या त्या तंत्रज्ञानाच्या फक्त ग्राहक नाहीत, तर सध्याच्या आणि भविष्यातल्या डिजिटल विश्वाच्या शिल्पकारही आहेत. म्हणूनच हे सगळे महिलांच्या सहभागाबद्दलचे महत्त्वाचे घटक आहेत.
विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये महिलांनी आतापर्यंत नेहमीच महत्त्वाचं योगदान दिलं आहे. ‘द हिडन फिगर्स’ हे पुस्तक आणि नंतर त्यावर बनलेल्या चित्रपटामुळे ही बाब आणखी चांगल्या प्रकारे अधोरेखित झाली आणि समाजाच्या सर्व घटकापर्यंत व्यापक रितीने पोहोचली. ‘चूल आणि मूल’ हे झाले मागील शतक. आता महिला ‘मोबाईल आणि माऊस’ वापरून कर्त्या तर झाल्याच पण आत्मनिर्भरही झाल्या. काही दशकांपूर्वी हा बदल मोठ्या शहरापुरता होता, आता तसे नाही. कोविडनंतरच्या ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धतीमुळे महिलांना घरबसल्या काम करायची संधी मिळाली.
इतर जबाबदाऱ्या सांभाळून आता अनेक महिला कार्यरत आहेत. भारत हा वेगाने विकसित होणारा देश असून या विकासात महिलांचा सहभाग, विशेषतः उद्योजकतेच्या माध्यमातून, अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. पूर्वी महिलांचा सहभाग घरगुती कामांपुरता मर्यादित होता; परंतु आता त्या विविध क्षेत्रांमध्ये व्यावसायिक आणि यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. या बदलामुळे केवळ महिलांचेच सक्षमीकरण होत नाही, तर देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीलाही हातभार लागतो.
इंटरनेट आणि डिजिटल साधनांमुळे महिलांना शिक्षणाच्या नवीन संधी मिळाल्या आहेत. दुरस्थ शिक्षण आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांमुळे ग्रामीण भागातील महिलाही उच्च शिक्षण घेऊ शकतात. डिजिटल साक्षरता वाढल्यामुळे महिलांना माहिती मिळवणे, कौशल्ये विकसित करणे आणि स्वतःचा विकास करणे सोपे झाले आहे. ऑनलाइन व्यवसाय आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. यामुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळून त्या कुटुंबाच्या आर्थिक विकासाला हातभार लावू शकतात. आज डिजिटल बँकिंग आणि ऑनलाइन पेमेंटमुळे आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले आहे.
परिणामी, महिलांना आर्थिक निर्णय घेणे अधिक सोपे झाले आहे. सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे महिलांना आपले विचार मांडण्याची आणि सामाजिक मुद्द्यांवर आवाज उठवण्याची संधी मिळाली आहे. यामुळे महिलांसाठी सुरक्षित ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स तयार करून सायबर गुन्ह्यांना आळा घालणे गरजेचे बनले आहे. महिला उद्योजक अनेकदा आपल्या व्यवसायात नावीन्यपूर्ण कल्पना आणि दृष्टिकोन आणतात. त्या समाजातील गरजा ओळखून उत्पादने आणि सेवा विकसित करतात. उदाहरणार्थ, तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक महिलांनी स्टार्ट-अप्स सुरू केले आहेत, जे नवीन ॲप्स, सॉफ्टवेअर आणि तांत्रिक सोल्यूशन्स प्रदान करतात. पर्यावरणपूरक उत्पादने, सामाजिक उद्योजकता आणि आरोग्य सेवांसारख्या क्षेत्रांमध्येही महिलांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे व्यवसायात विविधता येते आणि ग्राहकांना चांगल्या सेवा मिळतात.
एखादी महिला उद्योजक यशस्वी होते, तेव्हा इतर महिलांसाठी प्रेरणास्थान बनते. यामुळे अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा मिळते. महिला उद्योजक सहकारी, कर्मचारी घेताना महिलांना प्राधान्य देतात. यामुळे महिलांच्या रोजगाराला चालना मिळते आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते. याशिवाय, अनेक महिला उद्योजक सामाजिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणासारख्या क्षेत्रांमध्येही योगदान देतात. यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होतो. यापुढील काळात पूर्वी निरक्षरांना मदतीसाठी लागायचे तसे लेखनिक डिजिटल मदतनीसाच्या रूपात सर्वत्र (अगदी शहरी भागातही) हजारोंच्या संख्येने लागणार आहेत. हे एक अर्थार्जनाचे साधन तसेच सामाजिक कटिबद्धतेचे सामूहिक उदाहरण असू शकते. कोणत्याही व्यवहारामध्ये देणारा आणि घेणारा यांच्यामध्ये सरळ व्यवहार होत नाही.
हा व्यवहार दोघांच्याही मनाप्रमाणे व्हावा यासाठी विविध नियम आणि पायंडे माहीत असणारा मध्यस्थ गरजेचा असतो. असा मध्यस्थ पैसे कमावतो; परंतु त्याच्यामुळे व्यवहारातल्या दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना समाधान प्राप्त होत असते. विशेष म्हणजे मध्यस्थी करण्याचा असा व्यवसाय हा बिनभांडवली असतो. त्या व्यवहाराची डिजिटल माहिती हेच त्याचे भांडवल असते.
डिजिटल मध्यस्थ ही एक संकल्पना आहे, ज्याला स्मार्टफोन आणि इंटरनेट या आयुधांचा वापर करणे जमले आहे. सुशिक्षित पदवीधरांबरोबरच घरकामात गढलेल्या गृहिणीलाही हे शक्य आहे. गेल्या पिढीपर्यंत गृहिणीला दुसरे काही करणे शक्यच नसायचे कारण घरातली कामेच आवरताना तिचा दिवस संपत असे; परंतु सध्या नवतंत्रज्ञान हाताशी असल्याने, विभक्त कुटुंबांमुळे आणि बऱ्याचशा सुशिक्षित घरांनी स्वीकारलेल्या सामाजिक बदलांमुळे स्त्रीच्या मागचा घरकामाचा एकंदर रामरगाडा कमी झाला आहे आणि नवा विचार स्वीकारून अमलात आणणे शक्य झाले आहे. महिला उद्योजकांना भांडवलाची उपलब्धता, बाजारपेठेतील स्पर्धा, कुटुंबाची जबाबदारी आणि सामाजिक पूर्वग्रह यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र, सरकार आणि विविध संस्था महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आणि कार्यक्रम राबवत आहेत. मुद्रा योजना, स्टँड-अप इंडिया आणि महिला उद्योजकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यांसारख्या उपक्रमांमुळे महिलांना व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळते. ‘डिजिटल इंडिया’सारख्या योजनांमुळे महिलांना नवीन तंत्रज्ञान वापरून व्यवसाय वाढवण्याची संधी मिळत आहे. थोडक्यात, भारतीय महिला उद्योजक केवळ आर्थिक विकासालाच नव्हे, तर सामाजिक परिवर्तनालाही हातभार लावत आहेत. त्यांचे योगदान देशाच्या प्रगतीसाठी आणि राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तंत्रक्रांतीमुळे भविष्यात हे योगदान आणखी वाढेल, यात शंका नाही.
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)