Saturday, August 23, 2025

मराठी अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया, वॉकरसोबत चालण्याची वेळ; काय झाले?

मराठी अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया, वॉकरसोबत चालण्याची वेळ; काय झाले?

मुंबई: लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना सुखदा खांडेकर सध्या एका मोठ्या शारीरिक त्रासातून जात आहेत. त्यांच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सुखदाने स्वतः सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली.

सुखदा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्या वॉकरच्या मदतीने चालताना दिसत आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "कहा knee में ट्विस्ट #last2months आराम कोणाला आवडत नाही? पण कंपल्सरी आराम- नको रे बाबा..." नाचताना त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि २९ एप्रिल २०२५ रोजी त्यांना ऑपरेशन करावे लागले. लिगामेंट टेअरच्या ऑपरेशननंतर साधारणपणे ३ महिने आराम आणि फिजिओथेरपी अपेक्षित असते. मात्र, सुखदाने २ महिन्यांनंतरच युरोपियन मराठी संमेलनात, लेस्टर येथे नृत्य सादर करण्याचा कार्यक्रम निश्चित केला होता.

या आव्हानात्मक काळात सकारात्मक राहण्यासाठी त्यांनी योग्य आहार, फिजिओथेरपी आणि मानसिक दृढनिश्चयावर भर दिला. "One day at a time म्हणत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानत मी जिद्दीने माझे प्रयत्न सुरू ठेवले," असे त्यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रवासात त्यांना त्यांची आई चित्रा देशपांडे, पती अभिजीत खांडेकर, देवेंद्र पेम, दिनेश लाड सर, डॉक्टर चिंतन हेगडे, फिजिओथेरपिस्ट डॉ. साक्षी, ट्रेनर संजीत, मित्र-मैत्रिणी आणि त्यांचा "नवीन मित्र" असलेला वॉकर यांची खूप मदत झाली. कार्यक्रमाचे आयोजक अमोल भगत यांचेही त्यांनी विशेष आभार मानले, कारण त्यांनी सुखदावर विश्वास ठेवून त्यांना कोरिओग्राफीमध्ये पूर्ण स्वातंत्र्य दिले. अतुल कुलकर्णी यांनीही सोप्या स्टेप्स बसवून काम सुलभ केले, असे सुखदा म्हणाल्या. लेस्टर येथील स्थानिक कलाकारांनीही त्यांना मोलाची साथ दिली.

अखेरीस, २ महिन्यांच्या विश्रांतीनंतर सुखदाने पुन्हा रंगभूमीवर दमदार पाऊल ठेवले. या सविस्तर माहितीमागे त्यांचे कौतुक नसून इतरांना प्रेरणा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. "तुम्ही मनात आणला तर तुम्हाला काहीही, कोणीही रोखू शकत नाही. मग शारीरिक आजार असो किंवा मानसिक, फक्त मनात ठरवता आले पाहिजे मग... sky is the limit!" असा संदेश त्यांनी या पोस्टद्वारे दिला आहे.

Comments
Add Comment