
लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर
शिष्टाचार समाजामध्ये आपले आचरण कसे असावे यासंबंधी जे सामाजिक संकेत, नियम असतात त्यांना शिष्टाचार असे म्हणतात. प्रत्येक देशामध्ये वागण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तरीसुद्धा मूलभूत शिष्टाचार सर्व ठिकाणी जवळजवळ एकसारखे असतात. जो मनुष्य शिष्टाचार पाळतो त्याच्याविषयी इतरांचे मत चांगले होते. शिष्टाचार, सर्व चांगुलपणा याची सुरुवात घरापासूनच झाली पाहिजे.
charity begins at home
ऑफिसमध्ये जाताना, वर्गात जाताना परवानगी घेऊनच जावे, कोणाच्याही घरात जाताना दारावरील बेलचे बटन दाबावे किंवा दारावर टकटक करावे. अगदी स्वतःच्या घरातही तीन-चार खोल्या असतील, तर भावंडांच्या, आई-वडिलांच्या खोलीत जाताना दारावर टकटक करावे. वर्गात किंवा समूहात आपल्याला विचारल्याशिवाय आपले मत देऊ नये. आपण ऑफिसमध्ये गेल्यास समोरच्या व्यक्तीने सांगितल्याशिवाय खुर्चीवर बसू नये, बसल्यावर वेडेवाकडे बसू नये. समोरच्या माणसाबरोबर बोलताना गॉगल घालून बोलू नये, जांभई आल्यास तोंडावर हात ठेवावा, खोकताना तोंडावर रुमाल धरावा. दुसऱ्यांच्या वस्तूला न विचारता हात लावू नये, दुसऱ्याची पुस्तके, मासिके न विचारता घेऊ नयेत. दुसऱ्याची डायरी उघडून पाहू नये, वाचू नये.
जेवण झाल्यावर समूहामध्ये ढेकर देऊ नये. कोणासमोर बसून आळस देऊ नये. दाढी वाढलेल्या अवस्थेत कुठल्याही महत्त्वाच्या कामास जाऊ नये. आपल्या घरी भेटण्यास लोक आल्यानंतर टीव्ही बंद करावा. पाहुण्यांकडे दुर्लक्ष करून टीव्हीकडे लक्ष ही अपमानास्पद वागणूक आहे. याची जाणीव असावी. फार जवळ जाऊन बोललेले लोकांना आवडत नाही. बोलताना किमान दोन-तीन फुटांचे अंतर ठेवावे आणि आपल्या तोंडाचा वास त्याला येणार नाही किंवा उडालेली थुंकी त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी.
कोणाच्याही खांद्यावर पटकन हात ठेवू नये. हॉटेलला जाऊन काय खायचे याचा विचार अगोदरच करावा. वेटरला उगाचच थांबवून घेऊ नये. खाताना मचमच आवाज करू नये. इंग्रजी लिहिणे, बोलणे अनिवार्य असले तरी चुकीचे बोलू नये. मराठीतून सुद्धा चांगला संवाद साधता येतो.
सभासमारंभात बूट, चप्पल, पादत्राणे ओळीत ठेवावीत. जीवनामध्ये आलेल्या संकटांशी हसतमुखाने सामना करावा. सार्वजनिक जीवनामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी भ्रष्टाचार करू नये. स्वतःच्या फायद्यासाठी गरिबांचे शोषण करू नये, लबाडी करू नये. न्यायाची चाड व अन्यायाची चीड असली पाहिजे, ही आदर्श शिष्टाचाराची उदाहरणे आहेत.
शिष्टाचार म्हणजे केवळ सभ्य बोलणे नव्हे, तर इतरांच्या प्रति सन्मान आणि आपुलकीने वागण्याची कला आहे. समाजात एकत्र राहताना परस्पर संबंध सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी शिष्टाचार अत्यंत आवश्यक ठरतो. तो आपल्या संस्कारांची आणि व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतो. आजच्या युगात ज्ञान, कौशल्ये, पदवी यांच्याबरोबरच शिष्टाचारही तितकाच महत्त्वाचा झाला आहे. ऑफिसमध्ये, शाळेत, घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी - कुठेही आपण योग्य रीतीने वागलो, बोललो, तर लोक आपल्याला आपोआप आदराने पाहू लागतात. म्हणूनच शिष्टाचार हा केवळ बाह्य दिखावा नसून, अंतःकरणातून उमटणारी सुसंस्कृत वागणूक आहे.
शिष्टाचाराचे काही महत्त्वाचे पैलू :
- विनम्र भाषा वापरणे : “कृपया”, “धन्यवाद”, “माफ करा” यांसारखे शब्द संवादात सौंदर्य आणतात.
- ऐकण्याची सवय : इतरांचे विचार शांतपणे ऐकणे हा चांगल्या शिष्टाचाराचा
भाग आहे. - स्वच्छता आणि नीटनेटकेपणा : स्वतःचे व सभोवतालचे वातावरण स्वच्छ ठेवणे हे आपल्या शिस्तप्रियतेचे लक्षण आहे.
- वेळेची पावती : वेळेचे भान ठेवणे आणि ठरलेल्या वेळेला उपस्थित राहणे हे एक महत्त्वाचे शिष्टाचाराचे अंग आहे.
- मुलांना शिस्त आणि नम्रता शिकवणे : लहान वयात शिष्टाचार शिकवले, तर ते त्यांच्या स्वभावाचा भाग बनतो.
शिष्टाचाराचे फायदे :
- चांगले संबंध निर्माण होतात.
- सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळवण्यासाठी मदत होते.
- व्यक्तिमत्त्व प्रभावी दिसते.
- इतरांमध्ये आदर निर्माण होतो.
शेवटी, शिष्टाचार म्हणजे एक सामाजिक पूंजी आहे. ती जितकी मनापासून खर्च केली जाते, तितकी ती परत सन्मान, प्रेम आणि सहकार्याच्या रूपाने मिळते.
“संस्कृती ही केवळ ग्रंथातून नव्हे, तर आपल्या वागणुकीतून दिसते आणि त्याला शिष्टाचार म्हणतात!”