Friday, August 15, 2025

रोज नव्याने जगा...

रोज नव्याने जगा...

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे


“जगा आणि जगू द्या” ऐकलंच असेल संतांची उक्ती. आपण आपल्या मानवी जगात काय करतो? या चंदनी देहाला झिजवितो! कधी कष्टाने तर कधी विचारांनी.


विचार म्हणजे चिंता. ज्याचा अनुस्वार काढला की होते चिता. माझं असं तिचं कसं? मुळात ही तुलना मनातून काढून टाका! जीवनाचा आनंद घ्या. जगा रोज नव्याने. नवी पालवी फुटते तशी नाही पल्लवीत करा, अंकुर फुटू द्या, निसर्गाचा नियम लक्षात आणा. रोज नव्याने फुलावे, उमलावे, पुन्हा रुजावे, पुन्हा उमलावे, निसर्ग आपल्याला गुरू म्हणून लाभला आहे. खूप काही शिकवून जातो. आपण काय करतो? प्रत्येकवेळी द्वेष, मत्सर, घृणा, निंदा, हेवा, असंतोष, वाद, नकारात्मकता वाढवत असतो. विसरा आता तुलना करणे. या नकारात्मक भावनांचे सकारात्मकतेमध्ये बदल करूया. यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे आपली प्रतिकारशक्ती. नकारात्मक विचारांमुळे प्रतिकारशक्तीचा ऱ्हास होतो. सकारात्मक जगणे हे आयुष्याचे टॉनिक आहे. आजच्या स्पर्धा युगात कानावर पडते ते सगळं विक्षिप्त, विलक्षण किती अघटीत घटना. साद पडसाद उमटतात. आपण स्वतःपासून सुरू करूया. यासाठी आत्मविश्वास पाया भक्कम असला तर कुणीही आपल्या आडवा आला तरी आपला तोल ढासळू द्यायचा नाही. परिस्थिती कोणतीही असो त्यावर मात करून पुढे गेल्यावर माणूस जिंकतो. तो केवळ आत्मविश्वासामुळेच. यामुळे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, भविष्य घडते. जर आत्मविश्वासच कमकुवत असेल तर तो माणूस कोलमडतो. त्याने सृजनभान जपावे. नवनव्या पालवी फुटणाऱ्या सजग, सक्षम जीवनासाठी मनाचे आरोग्य संतुलन राखावे. मानसिक आरोग्याबाबत डॉक्टरांच्या सल्ल्यापेक्षा आपण स्वतःबरोबर कम्फर्ट आहोत का? आपण स्वतःची कंपनी स्वतः कशी देऊ शकतो हे पाहा. आपली स्वप्रतिमा, स्वओळख, स्वविकास आणि स्वतःची ताकद ओळखा. आपण स्वतःशीच प्रामाणिक, निष्ठावंत राहिलो की आपल्या हातून चांगले कर्म घडतात. या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे रोज सकाळी व्यायाम करा, निरभ्र आकाशात पाहून कृतज्ञता व्यक्त करा, त्या वैश्विक ऊर्जेला प्रार्थना करा, स्वतःच्या विकासासाठी ध्येय, धोरणे आखा, कामाचे नियोजन करून झपाट्याने कामाला लागा. आपल्याला जे जे काही करायचे आहे ते कागद, पेन घेऊन लिहून काढा. व्यक्त व्हा. मनातल्या वेदना कागदावर लिहा, पुन्हा वाचा. एखादा सकारात्मक विषय घ्या आणि नकारात्मक विषय आयुष्यातून काढून टाका.


सजू द्या मनात जगण्याचं गाणं
सजू द्या मनाला सुंदर विचारानं
गाजू द्या आभाळ स्वकर्तृत्ववान
वाजू द्या डंका यशकीर्तीनं.
असं हवंय परिवर्तन. तेव्हा या मनाला जपा. त्याचं मानसिक आरोग्य आणि संतुलन जपा. आपोआप शरीर साथ देईल आणि शारीरिक थकवा दूर होईल. शारीरिक क्षमता वाढेल, मनासारखं जगण्यासाठी मनासारखं वागा! गुंफू द्या सर्जनशीलतेचा धागा! नात्यांना द्या सन्मानाची जागा! चला! तर मग बघताय काय कामाला लागा. आशावादी व्हा. आव्हाने पेला. चालत राहा, रोज नव्याने जगत राहा.

Comments
Add Comment