
स्नेहधारा : पूनम राणे
सकाळच्या वेळेस सोनेरी कोवळे ऊन पडले होते. पक्षांचा किलबिलाट चालू होता. शाळेच्या मैदानात खारूताई आणि चिऊताई मोठ्या आनंदाने एकमेकींसोबत खेळत होत्या. दोन्ही पाय एकदम वर उचलून टुणूक-टुणूक उड्या मारत चिऊताई खारूताईचा पाठलाग करत होती. खारूताई मात्र चपळाईने पुढे पुढे जात होती.
आज दोघींचा पाठशिवणीचा खेळ चालू होता. चिऊताई खारूताईला म्हणाली, ‘‘अगं तुला आवाज कुठून येतोय?” आजूबाजूलाच कुठेतरी संगीताचा आवाज मला ऐकू येत आहे. आपण दोघीही जाऊन पाहायचं का?” यावर खारूताई म्हणाली, ‘‘हो, हो, चल जाऊया आपण.” असे म्हणत खारूताई चिऊताईच्या जवळ आली.
दोघीही मग रमतगमत ज्या बाजूने आवाज ऐकू येत होता, त्या ठिकाणी निघाल्या.
चैत्र महिन्यातील रामनवमीचा तो दिवस होता. शाळेच्या बाजूलाच असलेल्या मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता. मंदिर छान फुलांनी सजवलेले होते. लक्ष्मण सीतेसह श्रीरामांची देखणी मूर्ती लक्ष वेधून घेत होती. नुकतीच आरती झाली होती. ‘‘श्रीराम जय राम जय जय राम” हा जयघोष भक्तगण करत होते. त्यानंतर रामायण या विषयावर प्रवचनकार प्रवचन देत होते. समुद्रावर सेतू बांधण्याच्या वेळेस श्रीरामांना कोणी कशी मदत केली, याचे रसभरीत वर्णन प्रवचनकार करत होते. खारूताई आणि चिऊताई नेमक्या खारीचा वाटा याविषयी प्रवचन देत असताना उपस्थित झाल्या. प्रवचनकार सांगत होते, ‘सारे भक्तगण कान देऊन ऐकत होते. छोटीशी खारूताई आपलं अंग पाण्यात भिजवून वाळूत लोळून ज्या ठिकाणी सेतू बांधत होते. त्या ठिकाणी आपले अंग झाडत होती. आपल्या अंगी असलेलं सामर्थ्य जाणूनही परमेश्वरी कार्यामध्ये आपला खारीचा वाटा ती देत होती.
श्रीराम हे सर्व दुरूनच पाहत होते. जवळ जाऊन श्रीरामांनी खारूताईला मायेने आपल्याजवळ घेतले. आपला प्रेमळ हात खारूताईच्या पाठीवरून फिरवला. भक्तगण हो, आपण जर खारूताईला पाहिलं तर आजही श्रीरामाने फिरवलेल्या हाताच्या खुणा तिच्या पाठीवर आपल्याला दिसतात. बरेच दिवस मनात असलेल्या प्रश्नाचे उत्तर आज चिऊताईला मिळालं होतं. आपल्या मैत्रिणीचे कार्य-कर्तृत्व ऐकून चिऊताईला खूप आनंद झाला. तिने खारूताईला प्रेमाने मिठी मारली आणि आपली चोच अलगद खारूताईच्या पाठीवरून फिरवली. जणू काही श्रीरामांचा स्पर्श चिऊताईला सुद्धा हवाहवासा वाटत असावा. खारूताईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. दोघीजणी देवळाभोवती प्रदक्षिणा मारून श्रीरामांना वंदन करून पुन्हा शाळेच्या दिशेने निघाल्या.
तात्पर्य : ताकतीपेक्षा युक्ती महत्त्वाची आणि युक्तीसोबत निष्ठाही महत्त्वाची असते. म्हणूनच कोणत्याही सत्कार्यामध्ये खारीचा वाटा आपणही विद्यार्थी मित्रांनो उचलायलाच हवा.