तेहरान : इस्रायल विरुद्धच्या युद्धानंतर इराणमधील परिस्थिती सुधारताना दिसत आहे. इराण युद्धात झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आता इराणने अफगाणी नागरिकांवर कठोर कारवाई केल्याचे समोर आले आहे. गेल्या १६ दिवसांमध्ये ५ लाखांहून अधिक अफगाणी नागरिकांना इराणमधून हाकलून देण्यात आले आहे. हे या दशकातील जबरदस्तीने केलेले सर्वात मोठे विस्थापन मानले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, इराणने २४ जून ते ९ जुलै या कालावधीत ५ लाख ८ हजारांहून अधिक अफगाण नागरिकांना देशाबाहेर काढले आहे. काही दिवसांपूर्वी इराणमधून एका दिवसात 51 हजार अफगाणी लोकांना हाकलून लावण्यात आले होते. इराणने कागदपत्रे नसलेल्या अफगाण नागरिकांनी देश सोडावा असे आवाहनही केले होते.
इराणने याआधीही देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या अफगाण नागिकांना देश सोडण्यास सांगितले होते. हे अफगाणी लोक इराणमध्ये कमी वेतनावर कामगार म्हणून काम करतात. अफगाणी लोक तेहरान, मशहाद आणि इस्फहान या शहरांमध्ये बांधकाम कामगार, साफसफाई कामगार म्हणून आणि शेतात काम करतात. मात्र आता या कामगारांना मायदेशात परतावे लागले आहे. अफगाणिस्तानमध्ये आधीच बेराजगारी आहे, त्यामुळे आता या नागरिकांना पोट भरण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.