नवी दिल्ली : रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी सोनाली मिश्रा यांची रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या निर्णयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सोनाली मिश्रा ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत म्हणजेच सेवानिवृत्त होईपर्यंत रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी कार्यरत राहणार आहेत.
रेल्वेची संपत्ती आणि रेल्वे प्रवाशांचे संरक्षण यासाठी रेल्वे सुरक्षा दल कार्यरत आहे. या दलाचे नेतृत्व वरिष्ठ आयपीएस अधिकारी सोनाली मिश्रा करणार आहेत.
केंद्र सरकारने १९५७ मध्ये एक अधिसूचना जारी करुन रेल्वे सुरक्षा दलाची स्थापना केली. या दलाला १९६६ मध्ये रेल्वेच्या आणि प्रवाशांच्या संपत्तीची नासधूस तसेच चोरी करणाऱ्यांना अटक करण्याचे तसेच त्यांची चौकशी करण्याचे आणि त्यांच्या विरोधात कोर्टात खटले चालवण्याचे अधिकार मिळाले. पुढे २० सप्टेंबर १९८५ रोजी रेल्वे सुरक्षा दलाला केंद्रीय सशस्त्र दलाचे स्वरुप देण्यात आले.
सोनाली मिश्रा या १९९३ च्या मध्य प्रदेश कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची २०२१ मध्ये पंजाबमध्ये भारत - पाकिस्तान सीमेवर नियुक्त केलेल्या महिला जवानांच्या कमांडर या पदावर नियुक्ती झाली. याआधी सोनाली मिश्रा यांनी काश्मीरमध्ये पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी काही काळ सीमा सुरक्षा दलाच्या गुप्तचर यंत्रणेचेही नेतृत्व केले होते. तसेच सीमा सुरक्षा दलाच्या अतिरिक्त महासंचालपदाचीही जबाबदारी हाताळली आहे.
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींनी सोनाली मिश्रा यांना पोलीस पदकाने गौरविले आहे. तसेच सोनाली मिश्रा यांना सागरी क्षेत्रातील पोलीस सेवेसाठीही पदक देऊन गौरविण्यात आले आहे. अनेक महत्त्वाची पदे समर्थपणे हाताळलेल्या सोनाली मिश्रांचा वेगवेगळी पदके देऊन वेळोवेळी गौरव करण्यात आला आहे.