
मल्याळम भाषेत भाषण; व्हिडीओ व्हायरल
कल्याण : डोंबिवलीत मराठी भाषेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठमोळ्या डोंबिवली शहरात गोव्याच्या राज्यपालांनी चक्क मल्याळम भाषेत भाषण केले आहे. या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केरळ समाजम मॉडेल कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटन आणि उत्सव समारंभास गोव्याचे राज्यपाल डॉ. पी. एस. श्रीधरन पिल्लई आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. याबाबत मनसे नेते, माजी आमदार राजू पाटील यांनी केलेली 'एक्स' समाजमाध्यमावर पोस्ट व्हायरल होत असून, मराठी भाषेचा द्वेष करणाऱ्यांचे मनसे नेते राजू पाटील यांनी कान टोचले आहेत.
'' प्रत्येकाने आपापली भाषा व संस्कृती जपावी पण सोबतच ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यातील राजभाषेचा मानही ठेवावा हीच अपेक्षा असते. यात कोणत्या भाषेचा व लोकांचा द्वेष करण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा प्रश्न मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.