नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड
“ताईला सांगून येते.”
“आणि ती नाही म्हणाली तर?”
“ती कशाला नाही म्हणेल? अरे तू तिला नक्की आवडशील.”
“नो नकार ना?”
“ताई आपल्या संसारात सुखी आहे.” ती आनंदाने म्हणाली. आनंदाने निरोप घेतलान् ईश्वाकूचा.
पण ताईच्या घरी वेगळेच ताट वाढून ठेवले होते. मचकापुरी ! सगळाच मचका!
ताई भाजली होती. उभी भाजली होती.
“ये शकू.”
“ताई, काय झालं गं हे?” ती हुंदके देत म्हणाली.
“प्राक्तन माझं. पदर पेटला.’’
“अगं पण...”
“माझं बाळ... नि माझा ईशान आता तुझे सांभाळ.
ईशानची बेटर हाफ हो ! माझी शेवटची इच्छा !”
आणि ताईने जीव सोडला. ती दुसऱ्या जगात गेली. जे जिवंतपणी माणसाला अनभिज्ञ असते. ईशान रडला. धाय मोकलून रडला.
पण ती अश्रू आटून स्थित प्रज्ञ झाली.
“मी फार एकटा पडलो गं शकू.”
“तो भितींवर डोके आपटू लागला.
“ मी आहे ना !” ती दु:ख आवरुन म्हणाली ताईच्या नवऱ्याला तिने जवळ घेतले. थोपटले.
“तू नाही ना आम्हाला सोडून जाणार?” त्याने दीनवाणे होत शकूला विचारले.
“नको गं सोडून जाऊस आम्हांला ! मी फार एकटा पडेन.”
“नाही जाणार” ती अचानक समंजस झाली.
दुसरे काहीच दिसत नव्हते समोर. ताईचा निष्प्राण देह.
त्याची व्यवस्था करायला हवी होती. तिने मग उठत शेजार गाठला.
“मिस्टर बर्वे, ताई माझी भाजून गेली.”
“गेली? अहो अजून धुगधुगी असेल तर आशा आहे भाजणे काही फेटल राहिले नाही. चला, बघू.”
“बर्वे आले. बर्वीण तर घाबरूनच गेली समोरचे दृश्य बघून मृत्यू इतका जवळून तिने पाहिला नव्हता. रडायलाच लागली ते पाहून.
“हे बघा, पुढली व्यवस्था करायला हवी.” बर्वे म्हणाले. नवरा एकटक तिच्या निश्चेष्ट देहाकडे बघत होता अजून मरण त्याच्या पचनी पडले नव्हते.
“बे बघा, मी मजल्यावरच्या लोकांना बोलावतो पैसे घरात आहेत का?”
“दहा एक हजार असतील.”
“मजजवळ द्या.”
“कशाला?”
“मर्तिकाचे सामान आणायला.”
“देतो.”
“तो जागचा उठला. कपाट उघडले. पैसे मोजले.
न ताईच्या बहिणीला दिले.
“मी काय करु घेऊन. तुम्हीच सामान आणा. ताटी वगैरे. एक पांढरा कपडा पण आणा.” ती म्हणाली.
अर्ध्या तासात सारी तयारी झाली.
“अँब्युलन्स बोलावली आहे.” शेजारी म्हणाले.
ताईची बहीण आता ताईची आई झाली. सौभाग्यवतीचा साज तिने मोठ्या बहिणीला चढवला.
“लवकर उचला तिला.” तिने बाळाला सावरत म्हटले बाळ घाबरले होते. रडत होते. त्याला ती दुसऱ्या खोलीत घेऊन गेली. शांत केले थोपटून थोपटून, काळच माणसाला शहाणं करतो.
ताईचा नवरा उत्तरक्रियेसाठी बाहेर पडला. शेजारी पाजारी होतेच
“मी आहे. काळजी करू नका. बाळाची !” ती म्हणाली.
प्रेतयात्रा वळणावर पोहोचली.
ईश्वाकू आलाच घरी पोहोचलाच.
“संपलं सगळं.”
“काय संपल?”
“जे घडले ते सारे संपल्यात जमा आहे.”
“म्हणजे?”
“म्हणजे म्हणजे... म्हणजे...
संपलं सारं... बाळ आणि बाळाचा बाबा हेच माझं भविष्य आहे. विसर सर्व घडलेले. विसर तू मलाही !” डोळे कोरडे करीत ती म्हणाली. तो बघतच राहिला.