
मुंबई : मुंबई महापालिकेने यापूर्वी नेमलेल्या क्लीन अप मार्शल योजना मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आणल्यानंतरही काही संस्थांनी आकारण्यात येणाऱ्या शुल्कांच्या पावती पुस्तके महापालिकेला परत केलेली नाहीत. महापालिकेच्या गोरेगाव पी दक्षिण विभागात अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने पावती पुस्तकच जमा न केल्याने महापालिकेचे तब्बल पावणे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार गोरेगावमध्ये घडला असला तरी मुंबईतील सर्वच प्रभागांमध्ये अशाप्रकारे पुस्तके जमा न केल्याने महापालिकेला लाखो रुपयांचा चुना लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या क्लीन अप मार्शलला दिलेल्या पावती पुस्तकांचा हिशोब लागत नसल्याने या प्रकरणाची वासलात कशी लावणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने क्लीन अप मार्शल नियुक्त करण्यासाठी संस्थांच्या नेमणूक केल्या. यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येक संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये महापालिकेच्या पी दक्षिण विभागाच्यावतीने सुपर प्रोटेक्शन सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नेमणूक केली होती. परंतु या क्लीन अप मार्शलचे कंत्राट ३१ मार्च २०२२मध्ये संपुष्टात आल्यानंतरही संबंधित संस्थेने त्यांना दिलेली पावती पुस्तके परत केलेली नाही. या संस्थेला २५ पावत्या असलेली ४५ पावती पुस्तके व ५० पावत्या असलेली २५ पावती पुस्तके वितरीत करण्यात आली. परंतु, ही पावती पुस्तके कंत्राटदाराने ३० जून २०२३ पर्यंत तरी परत केली नव्हती असे मुख्य लेखापरिक्षकांच्या अहवालातून नमुद करण्यात आले आहे.