Sunday, August 3, 2025

मुलांची भाषा आणि आपण

मुलांची भाषा आणि आपण

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू


पूर्वी मुलं मोठी झाली तरी वर्गात एखाददुसरा मुलगा अपशब्द, शिवी वापरायचा. असं बोलणाऱ्या मुलाकडे इतर मुलं थक्क होऊन पाहायची की याची हिंमत कशी होते असं बोलण्याची. मध्यमवर्गीय मुलं तर आपण असे अपशब्द, अशी भाषा ऐकूही शकत नाही आणि बोलण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही पण आजकाल मुलांच्या तोंडी असणारी भाषा मोठ्या प्रमाणात अभद्र, शिवीगाळ, कुत्सित, टोमणे, मारणारी, व्यंगात्मक, फजिती करून, त्यावर मजा वाटून घेणारी अशी होतेय. खरं म्हणजे घरात अशी भाषा बोलली जात नाही.


पण बाहेर आल्यावर मुलं जर अशा संगतीत असतील तर अनुकरण केलं जातं. मुलांकडे शारीरिक बलाऐवजी अशा भाषेने आपली ताकद दाखवण्याचा एक पर्याय असतो आणि शाब्दिक ताकदीचा वापर करणं मुलांना सोपं वाटतं.


मुलांना हे सांगा की, जर तुम्हाला अशा पद्धतीने गुंडगिरीची भाषा शिवीगाळ करणाऱ्या मुलांबरोबर राहण्यात धन्यता मानत असाल तर हे लक्षात ठेवा की, अशा मुलांना कोणी फार काळ आठवणीत ठेवत नाही. त्यांना कोणी स्वतःच्या आयुष्यात ‘आदर्श’ मानत नाही. तुमचं नाव अशा मुलांबरोबर जोडल्याने समाजात तुम्हाला प्रतिष्ठा मिळत नाही. हे पाण्याच्या बुडबुड्यांसारखे असतात.


अशा पद्धतीने बोललात तर काही वेळ लोक तुमचे फॉलोअर्स होतीलही पण अशा मित्रांना फॉलो करून तुम्हाला वाटणारी मजा ही खालच्या दर्जाची असेल. तुम्हाला या सगळ्यांतून कधीही नेम, फेम मिळत नाही. कोणत्या वडिलांना आपला मुलगा किंवा मुलगी अशी बनावी असं वाटत असेल का? अशा भाषेने लोक तुम्हाला ॲडमायर करणार नाहीत. तुम्हाला वाटत असेल की, शिव्या देऊन, अपशब्द वापरून तुम्ही लोकांना घाबरवाल, तर हे करिअर नव्हे. फार काळ तुम्ही या पद्धतीने टिकत नाही. ८ आठवी ते १२ वी या काळात तुमच्या आयुष्यात दोन-चार मित्रच असले तरी हरकत नाही. पण चांगली भाषा बोलणारेच मित्र असू देत. स्वतःच्या आयुष्यातल्या छोट्या-छोट्या गोष्टींवर काम करण्याचं हे वय आहे.


‘भाषा’ ही तुमच्या माणूस असण्याचं लक्षण आहे. तुम्ही श्रीमंत - गरीब असा किंवा सुंदर - सामान्य असा, तुम्ही तोंड उघडून काय बोलता? त्या शब्दांवर तुमची किंमत ठरते. तुमच्या घराण्याचा वारसा लक्षात येतो. तुमच्यावरचे संस्कार जाणवतात. कोणत्या संस्कृतीने तुमचं पोषण झालं आहे हे ठरतं. ‘वदन’ हे इतकं महत्त्वाचं आहे की, सरस्वती साक्षात तुमच्या जिभेवर वसत असते. तिचा वापर जबाबदारीने करणं हे तुमचं कर्तव्यच आहे हे मुलांना जरूर सांगा.


मुलांचा भाषिक विकास खूप महत्त्वाचा आहे पालकांनो. काहीजण बोलतात तेव्हा त्यांचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं आणि काही जणांचं कंटाळवाणं वाटतं. असं का? कारण मनातील विचार स्पष्ट असले की बोलण्यात आत्मविश्वास आणि अचूकता येते. बोलण्याला अभ्यासाची जोड असली की अस्सलपण जाणवते आणि मग मुलांच्या बोलण्याने इतर जण प्रभावित होतात.


मुलांची भाषा सशक्त व्हायची असेल तर मुलांना वाचण्याची, ऐकण्याची संधी देऊ या. मुलं जेव्हा त्यांच्या आवडीची पुस्तकं वाचतात तेव्हा त्याच्याबरोबर कविता, चरित्र, प्रवासवर्णन, गोष्टी, प्रेरणादायक किस्से हे सगळं त्यांना ऐकवाच. त्यातून नवनवीन शब्द कानावर पडतील. सगळ्यांचा अर्थ समजेल असं नाही पण आपण त्यांना अर्थ माहीत करून घेण्यासाठी मदत नक्कीच करू शकतो. ‘चांगलं ऐकणं’ हे त्यांच्या चांगल्या बोलण्यासाठी आवश्यक आहे. मुलांच्या कानावर काय पडते हे फार महत्त्वाचे आहे. मुलांची भाषा समृद्ध होण्यासाठी हे खूप उपयोगाचे आहे.


पालक म्हणून आपणही आपली भाषा कशी समृद्ध करतोय? आपलं वाचन, श्रवण हे वर्तमानपत्र, टीव्ही, मोबाईल यापलीकडे जातंय का? आपण मोठ्या मुलांना नाटक, व्याख्यानं, साहित्यिक कार्यक्रम, कवी संमेलन, शेरोशायरी कार्यक्रमाला जाणीवपूर्वक घेऊन जातोय का? मुलांसाठी आपण नक्कीच खूप काही करतोय. फक्त आत्मपरीक्षण करू या पालकांनो.


मुलांच्या भाषेवर परिणाम होतो तो वातावरणाचा. त्यांच्या आजूबाजूला असणारे लोक, त्यांचे मित्र, तुम्ही राहता तेथील लोकवस्ती आणि त्यांची भाषा या वातावरणानुसार मुलांची भाषा विकसित होते. मुलांना सांगा की भाषा ही दागिन्यासारखीच आहे. दागिना घातला की, आपण सुंदर दिसतो. आपण काही आजच्या काळात डोक्यापासून पायापर्यंत दागिन्यांनी मढलेले नसतो फक्त सणावाराला, लग्न, मुंजीत आपण हे करतो का बरं? कारण लोकांनी आपल्याकडे पाहावं, कौतुक करावं. आजच्या काळात आपलं बोलणं हाच दागिना आहे.


भाषा मुलांची पर्सनॅलिटी कशी आहे ते सांगते, ती एक सवय आहे. ‘ओव्या गायच्या की शिव्या द्यायच्या’ हे मुलांना सांगाच. चांगलं बोलायचं असेल तर ते मनातून येतं. ते ठरवायला लागत नाही. आयुष्यात नाव कमवायचं असेल तर आधी मुलांची भाषा चांगली हवी. मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत शिकवायचं हा आणखी वेगळाच मुद्दा आहे. पण एवढं नक्कीच की मराठी माध्यमातील मुलांना शाळेतील विषय समजून घेण्यात कमी अडचणी येतात. आठवीनंतर इंग्रजी अभ्यासाबरोबरच त्या विषयाबाबत ऐकणं, चांगलं वाचणं याचा सराव नक्कीच वाढवायला हवा.


इंग्रजी बोलताना काळ चुकेल, व्याकरणाच्या चुका होतील, नवी भाषा आत्मसात करताना मुलं चुकतील पण हळूहळू सरावाने नक्कीच जमू शकेल.
मुलांना अशा माणसांचं बोलणं ऐकवा ज्यांनी आयुष्यात काही चांगलं प्राप्त केलंय. मुलं हे ऐकतील, विचार करतील, भारावून जातील. खरंच मुलं प्रेरणा घेतील. कारण या यशोगाथा त्या व्यक्तींच्या बोलण्यातून मुलांपुढे आदर्श ठेवतील. मुलांना ते शब्द आकर्षित करतील. त्यांच्या कामाचा, शब्दांचा, बोलण्याचा तो प्रभाव आहे. हे आहे मुलांच्या आयुष्यात भाषेचं महत्त्व. यशस्वी लोकांच्या अनुभवाबद्दल बोलताना मुलांना त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला शिकवा. त्यातून मुलं ऐकण्याची कला आत्मसात करतील. म्हणूनच हे आपण सारे मुलांच्या मनावर बिंबवायला हवे.
Language is the road map of a culture. It tells you where its people come from and where they are going.

Comments
Add Comment