
चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली
दुबई: बिग बॉस फेम आणि ताजिकिस्तानी गायक आणि सोशल मीडिया स्टार अब्दु रोजिकला शनिवारी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. अब्दु मॉन्टेनेग्रोहून दुबईला पोहोचताच त्याला अटक करण्यात आली. अब्दूच्या अटकेचे कारण अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही.
दुबई अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. दरम्यान, अब्दू रोजिकच्या व्यवस्थापन कंपनीने त्याला चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने या प्रकरणात अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अब्दु रोजिकच्या टीमने स्पष्ट केले की त्याला फक्त ताब्यात घेण्यात आले होते, अटक करण्यात आली नव्हती आणि नंतर त्याला सोडण्यात आले. एस-लाइन प्रोजेक्टने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "सर्वप्रथम, त्याला अटक करण्यात आलेली नाही, त्याला फक्त पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अब्दु रोजिकने त्याचे स्पष्टीकरण दिले आणि त्याला सोडण्यात आले. आज तो दुबईमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होईल."
निवेदनात प्रसारित होणाऱ्या वृत्तांचे खंडन केले आहे, "प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेली माहिती हि चुकीची आहे. अब्दु रोजिक आणि त्यांची प्रतिमा जपण्यासाठी आम्ही सर्व कायदेशीर कारवाई करू." असे त्याच्या टीमने सांगितले. तसेच याबद्दल अधिक तपशीलांचे संकेत देत म्हटले की, "आमच्यावर विश्वास ठेवा, या विषयावर आम्हाला बरेच काही सांगायचे आहे."
दरम्यान, अब्दूने स्वतः काही तासांनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून त्याच्या सुटकेची पुष्टी केली, ज्यामध्ये तो एका कार्यक्रमात उपस्थित असल्याचे दाखवण्यात आले होते.
कोण आहे अब्दु रोजिक?
अब्दु रोजिक हा एक प्रसिद्ध ताजिकिस्तानी गायक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. त्याची गाणी, व्हायरल व्हिडिओ आणि रिअॅलिटी शोमुळे त्याची लोकप्रियता वाढली. बिग बॉस १६ नंतर तो भारतात खूप लोकप्रिय झाला होता.
ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेमुळे अब्दू आपल्या लहान उंचीसाठी ओळखला जाऊ लागला. अब्दूने बिग बॉस १६ मध्ये भाग घेतला होता, या सीजनमध्ये त्याने आपल्या विनोदी आणि आकर्षक शैलीने लाखो मने जिंकली, त्यानंतर तो मनोरंजन, क्रीडा आणि व्यवसायात चांगलाच प्रसिद्ध झाला.
दुबईमध्ये दीर्घकाळ राहणारा आणि युएई गोल्डन व्हिसा प्राप्त करणारा, रोजिक यांनी जागतिक स्तरावर कामगिरी केली आहे. २०२४ मध्ये कोका-कोला अरेना येथे पदार्पण करून त्याने बॉक्सिंग क्षेत्रातही प्रवेश केला आहे. त्याने युनायटेड किंग्डममध्ये हॉटेल व्यवसायात पदार्पण केले होते. तथापि, या अटकेमुळे त्याच्या वादांच्या वाढत्या यादीत आणखीन एक भर पडली आहे. यापूर्वी २०२४ मध्येही ईडीने भारतात अब्दू रोजिकचीही चौकशी केली होती. हा खटला एका हॉस्पिटॅलिटी कंपनीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित होता. त्यावेळी अब्दूला या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले नव्हते तर त्याची फक्त चौकशी करण्यात आली होती.