Friday, August 15, 2025

राँग साईडने ओव्हरटेक करणा-यांना तुडवा! अजितदादा भडकले!

राँग साईडने ओव्हरटेक करणा-यांना तुडवा! अजितदादा भडकले!

बारामतीकरांना अजित पवारांचा इशारा: बेशिस्त वागणाऱ्यांना टायरात घालून झोडायला सांगेन!

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना शिस्त लावण्याचा कठोर निर्धार व्यक्त केला आहे. बारामती येथील सावित्री हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी बोलताना, बेशिस्तपणे वागणाऱ्यांना पोलिसांकडून 'टायरात घालून मारा' असे थेट निर्देश देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या सडेतोड बोलण्याने बारामतीत एकच चर्चा सुरू झाली आहे.

"जनावरं कोंडवाड्यात, मालकांवर केसेस!"

अजित पवार म्हणाले, "काही जण चुका करत आहेत, रस्त्यावर कचरा टाकत आहेत, जनावरं चरायला सोडत आहेत. मी त्यांना कृपा करून सांगतो, आता ती जनावरं कोंडवाड्यात घातली तर ठीक, नाही ऐकलं तर त्यांना बाजार दाखवतो. आता जे मालक लोक आहेत, त्यांना निर्वाणीचा इशारा देतो. ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर मालकांवर केसेस होतील."

"राँग साईडवाल्यांना दहा पिढ्या आठवतील!"

अजित पवारांनी बाईकस्वारांनाही खडसावले. "कधी कधी मोटरसायकलवाले इकडे तिकडे बघतात आणि हळूच राँग साईडने ओव्हरटेक करतात. असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजेत."

ते पुढे म्हणाले, "अजिबात नियम कोणीही तोडू नका, मग तो अजित पवार असो किंवा अजित पवाराचा कोणी नातेवाईक असेल. सर्वांना नियम सारखे आहेत. मी जे करतो ते बारामतीकरांसाठी, सर्वांसाठी करतो."

झाडे लावल्यानंतर त्यांची राखण न करणाऱ्यांनाही त्यांनी फटकारले. "मी अनेक ठिकाणी झाडे लावली आहेत, मात्र आता तिथे कोणी पण येत आहे, जनावरं खात आहेत, पण तसं चालणार नाही." एका घटनेचा उल्लेख करत ते म्हणाले, "जिथे माणसांना बसायला जागा केली आहे, तिथं एकजण मोटरसायकल घालून निवांत मांडी घालून लोकांसोबत गप्पा मारत बसला होता. गाडी वळवली आणि पोलिसांना सांगितले की, याची गाडी ताब्यात घे आणि याला चांगला टायरमध्ये घाल. मग तो म्हणतोय दादा चुकलं."

अजित पवारांच्या या इशाऱ्यामुळे बारामतीमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment