Friday, July 11, 2025

ग्रामीण भाग विकासाच्या प्रतीक्षेत

ग्रामीण भाग विकासाच्या प्रतीक्षेत

रवींद्र तांबे


आपल्या महाराष्ट्र राज्यातील शहरी भागांच्या तुलनेने राज्यातील ग्रामीण भागांचा विचार करता फारसा विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागांचा विकास होणे गरजेचे आहे. तेव्हा ग्रामीण भागांकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. जर ग्रामीण भागांचा विकास झाला तरच नागरिकांचे जीवनमान
उंचावू शकते.


शहरी भागांच्या तुलनेने ग्रामीण भागांमध्ये कमी लोकसंख्या आणि निसर्गरम्य वातावरण असले तरी ग्रामीण लघू उद्योगांचा ऱ्हास होत आहे. देशाच्या विकासासाठी ग्रामीण भागांचा विकास होणे अत्यंत महत्त्वाचे असते. सध्या ग्रामीण भागांमध्ये फारशी शेती केली जात नाही. जंगलांची सुद्धा विकासाच्या नावाखाली कत्तल होताना दिसत आहे. तसेच उद्योग व्यवसायातील दूषित पाणी व वस्तीतील सांडपाणी नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नद्यांच्या पाण्याचा रंग सुद्धा लालसर किंवा निळसर दिसू लागला आहे.


याचा परिणाम हे पाणी पिण्यालायक किंवा शेती व्यवसायाला पोषक नाही. बऱ्याच ठिकाणी वाहत्या नदीचे पाणी ग्रामीण भागात पिण्यासाठी वापरतात. म्हणजे ग्रामीण भागातील नागरिक आजही स्वच्छ पाण्यापासून वंचित आहेत. तसेच पुरेसे पाणी सुद्धा मिळत नाही. जलजीवन मिशन कार्यक्रम राबविला असला तरी अनेक गावांमध्ये पाइपलाइन टाकल्या असून टेकडीवर पाण्याची प्लास्टिकची मोठी टाकी ठेवण्यात आलेली आहे.


मात्र तीन-चार वर्षे होऊन सुद्धा पाइप जोडले गेले नाहीत. मग ही योजना काय कामाची? काही ठिकाणी अशा ठेकेदाराला काळ्या यादीत सामाविष्ट करण्यात आलेले आहे; परंतु शासकीय अनुदानाचे काय? त्यासाठी शासकीय पातळीवर ठोस उपाय सुचवून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली गेली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास होऊन देशाचा विकास होईल. यासाठी दलालांचे उच्चाटन होणे महत्त्वाचे आहे. राज्यातील ग्रामीण भाग आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. हे ग्रामीण भागात गेल्यावर समजेल. त्यासाठी ग्रामीण भागात गेले पाहिजे. तेव्हा आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किती तालुके आहेत. त्या तालुक्यातील ग्रामीण भागांचा नि:पक्षपातीपणे सर्व्हे केला पाहिजे. म्हणजे समजेल की, अजूनही ग्रामीण भागात सोयीसुविधा नाहीत.


त्यामुळे ग्रामीण भागाचा फारसा विकास झालेला दिसून येत नाही. आतापर्यंत राजकीय पुढारी आपल्यापरीने व शासन प्रयत्न करीत असतात. मात्र आजही शासकीय सोयीपासून ग्रामीण भाग वंचित आहेत. याचा परिणाम लोक ग्रामीण भागातून शहरी भागात येऊ लागले आहेत. हे थांबविण्यासाठी ग्रामीण भागात विकासाभिमुख कामे करावी लागतील. शिक्षणाबरोबर त्यांना रोजगार सुद्धा देता आला पाहिजे. आजही ग्रामीण भागात स्वच्छ पाणी नागरिकांना मिळत नाही. बरीच कुटुंबे रेशनिंगवर मिळणाऱ्या धान्यावर कसेबसे पोट भरतात. कधी कधी अर्धपोटी सुद्धा राहावे लागते. इतकी गरिबी आहे. हल्ली तर मोलमजुरी सुद्धा करायला मिळत नाही. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. याचा फटका मोलमजुरी करणाऱ्यांवर झाला. यामुळे पुरेसे शिक्षण घेता येत नाही.


काही वेळा शिक्षण घेण्याची आवड असून सुद्धा घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील किंवा उच्चशिक्षण घेऊ शकत नाही. यामुळे मोठ्या पगाराची नोकरी मिळणे कठीण असते. तसेच, आवश्यक ज्ञान आणि कौशल्य ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना मिळत नाही. हल्ली तर इंग्रजी माध्यमामुळे मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत. आपल्या राज्यातील ग्रामीण भागांचा विचार केल्यास आजही काही प्रमुख समस्या भेडसावत आहेत. त्यावर योग्य तोडगा काढून योग्य उपाय सुचविणे आवश्यक आहे.


ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अजूनही साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. बऱ्याचवेळा प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण गावात नसल्यामुळे इच्छा असून सुद्धा शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यात घरची गरिबी, मग कौशल्य शिक्षण कसे घेणार हा प्रश्न? त्यात मूलभूत गरजांचा अभाव दिसून येतो. मग चांगले जीवनमान कसे जगता येणार. जरी शिक्षण घेतले तरी रोजगाराची संधी नाही. मोलमजुरी करून किती दिवस जीवन जगणार? नागरिकांच्या आरोग्याचा विचार केल्यास अजूनही योग्य उपचार किंवा सुविधा मिळत नाही. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास कोण आजारी पडल्यास पणजी किंवा मुंबईला आजारी व्यक्तीला घेऊन जावे लागते.


गावात जायला रस्ते असले तरी गावातील वाड्यांमध्ये जायला रस्ते नाहीत. त्यामुळे काही वाड्यांमध्ये पावसाळ्यात रिक्षा सुद्धा जात नाही. तेव्हा एखादी आजारी व्यक्ती पडल्यास त्याला डोलीने घेऊन जावे लागते. त्यात विजेचा तर नेहमीच लपंडाव दिसून येतो. असे असले तरी भरमसाट वीजबिल येते. बिल जास्त येते म्हणून काही नागरिकांनी विजेचा मीटर बदलला, तर आधीपेक्षा जास्त बिल येत असल्याचे नागरिक सांगतात.


रात्री आकाशात गडगडले की, लाईट गायब, नंतर मग सकाळपर्यंत लाईटचा पत्ताच नसतो. मग नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा कशी होणार याचा विचार होणे गरजेचे आहे. वाढत्या प्रदूषणामुळे ग्रामीण भागातील पर्यावरणाची हानी होत आहे. पोटापुरती नोकरी अथवा धंदा नसल्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेलेली दिसत आहे. तरुणांप्रमाणे महिलांनाही संघर्ष करावा लागत आहे. त्यात अधूनमधून रात्रीचे सोडा दिवसा ढवळ्यासुद्धा घरफोड्या होत आहेत.


तेव्हा ग्रामीण भागात ज्या विविध समस्या निर्माण होत आहेत त्या सोडविण्यासाठी योग्य शिक्षण, आरोग्य सुविधा, आणि विविध पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा कराव्या लागतील. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या सोयी उपलब्ध करून द्याव्या लागतील. तसेच ग्रामीण भागातील पर्यावरणाचे संवर्धन करावे लागेल तरच ग्रामीण भागांचा विकास होऊन देशाचा विकास होईल. तेव्हा विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्रामीण भागांचा विकास साधावा लागेल.

Comments
Add Comment