लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिला डाव भारतीय फलंदाजांनी गाजवला. भारतीय फलंदाज के. एल राहुलने ऐतिहासिक अशा लॉर्ड्स मैदानावर झुंझार शतकी खेळी खेळत फलंदाजी पुन्हा सिद्ध केली. त्याला यष्टीरक्षक रिषभ पंतनेही चांगली साथ देत अर्धशतकी खेळी केली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवसाचा डाव सुरु झाला. भारताने आपला पहिला डाव तीन बाद १४५ धावांवर पुन्हा सुरू केला. के. एल राहुल आणि ऋषभ पंत मैदानावर होते. हळूहळू धावसंख्या पुढे नेत ऋषभ पंत आणि के.एल राहुल यांच्यातील चौथ्या विकेटसाठीची भागिदारी ७० हून अधिक धावांवर पोहोचली होती. पहिल्या डावात भारताची धावसंख्या १७० धावांच्या पुढे गेली होती. त्यानंतर भारताने २०० धावांचा टप्पा पार केला.
लंडन: इंग्लंडमध्ये ऐतिहासिक टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ आता पाचव्या आणि शेवटच्या सामन्यातही आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी ...
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. पंत आणि के.एल राहुल यांनी १०९ धावांची भागीदारी केली आणि पहिल्या डावात भारताची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. मात्र ऋषभ पंत अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. धावा चोरण्याचा प्रयत्न करताना पंत धावबाद झाला आणि त्याची विकेट गेली. पंतने ११२ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह ७४ धावा कुटल्या. पंत आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी १४१ धावांची महत्वाची भागीदारी केली. उपहारापर्यंत भारताची धावसंख्या २४८-४ अशी होती. पहिल्या सत्रात भारताने १०३ धावा केल्या आणि फक्त एक विकेट गमावली. सुरुवातीच्या सत्रात भारताने ४.५८ च्या धावगतीने फलंदाजी केली. केएल राहुल ९८ धावांसह मैदानावर खेळत होता आणि शतकाच्या जवळ पोहोचला होता.
पंत बाद झाल्यावर राहुलला साथ देण्यासाठी अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा मैदानावर आला होता. जडेजाच्या साथीने राहुलने १७६ चेंडू खेळत आपले शतक साजरे केले. लॉर्ड्स मैदानावरील राहुलचे हे दुसरे शतक होते.
पहिल्या डावात भारताची धावसंख्या चार बाद २५४ वर पोचली होत. भारत अजूनही इंग्लंडपेक्षा १३३ धावांनी मागे होता. शतकी खेळी केल्यावर राहुल बाद झाला. २५४ धावसंख्यवर भारताने पाचवा गडी गमावला. शोएब बशीरने त्याला बाद केले. राहुल बाद झाल्यानंतर, नितीश रेड्डीसह जडेजाने संघाची सूत्रे हाती घेतली. जडेजा शानदार फलंदाजी करत होता, त्यामुळे भारताचा पहिला डाव २८० धावांच्या पुढे गेला होता. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाने ३०० धावा पूर्ण केल्या होत्या. जडेजा आणि नितीश रेड्डी यांच्यात चांगली भागीदारी निर्माण झाली होती. ते दोघेही मैदानावर स्थिरावले होते. भारताला इंग्लंडची धावसंख्या पार करण्यासाठी अजूनही ८७ धावांनी गरज होती.
चौकट
इंग्लंडच्या भूमीवर पंतने रचला महारेकॉर्ड
पंत हा कसोटी क्रिकेटमध्येही आपल्या शैलीतच खेळत असतो. पंत गोलंदाजांना आपल्यावर दबाव टाकायला देत नाही. पंतने या सामन्यातही आपल्या शैलीतच जोरदार फटकेबाजी केली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पंत ४९ धावांवर होता, तेव्हाही त्याने इंग्लंडच्या गोलंदाजीचे दडपण आपल्यावर घेतले नाही. कारण त्यावेळी पंतने धडाकेबाज फटकेबाजी करत षटकार मारला आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने या पहिल्या डावात संयतपणे फलंदाजी केली. पण या डावात भारताच्या एकाही फलंदाजाला षटकार मारता आला नाही. पण पंतने मात्र या सामन्यात दोन षटकार लगावले. भारताकडून षटकार लगावणारा तो एकमेव खेळाडू ठरला. त्याचबरोबर पंतने या सामन्यात ८८ कसोटी षटकार पूर्ण करत रोहित शर्माशी बरोबरी केली आहे. पंतने रोहितपेक्षा फार कमी सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
वेंगसरकरांच्या क्लबमध्ये राहुलची एन्ट्री
के.एल राहुलने ठोकलेले शतक हे लॉर्ड्सच्या मैदानातील त्याचे दुसरे शतक होते. या मैदानात सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकरसारख्या महान फलंदाजांना एकदाही शतक झळकावता आले नाही. पण राहुलने या लॉर्ड्सच्या मैदानात दुसरे शतक झळकावले आणि तो दिलीप वेंगसरकर यांच्या क्लबमध्ये जाऊन बसला. गेल्या २९ वर्षांत सचिन तेंडुलकरपासून ते थेट विराट कोहलीपर्यंत बरेच नामांकित खेळाडू खेळले. पण जे गेल्या २९ वर्षांत भारताच्या कोणत्याही खेळाडूला जमले नाही ते राहुलने केले आहे.