Friday, August 15, 2025

ख्रिस्ती धर्मियांकडून आमदार पडळकरांचा निषेध

ख्रिस्ती धर्मियांकडून आमदार पडळकरांचा निषेध

अकोला: सांगलीत १५ जून रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना मारहाण करण्याचे व जिवे मारण्याचे खुले आवाहन करीत ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याच्या निषेधार्थ ख्रिस्ती धर्मियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा निषेध करीत, काल शुक्रवारी अकोला जिल्ह्यातील समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मियांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांना अटक करून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ख्रिस्ती समाज शांततेचा पुरस्कार करणारा असून, संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे पालन करणारा आहे. मात्र आमदार पडळकर यांच्या द्वेषमूलक वक्तव्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरुंच्या जीविताला आणि प्रार्थनास्थळांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, अशी चिंता ख्रिस्ती शिष्टमंडळाने प्रसार माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केली.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून, संविधानाच्या कलम १४, १५, २५, २६ नुसार प्रत्येक नागरिकाला समानता व धर्मस्वातंत्र्याचे हक्क आहेत. मात्र पडळकर यांचे विधान संविधानाची पायमल्ली करणारे असून, ते समाजात तेढ व हिंसाचाराला चिथावणी देणारे आहे. त्यामुळे आमदार पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, तसेच त्यांची आमदारकीही रद्द करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांंमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, विधानसभा अध्यक्ष, पोलीस अधीक्षक अकोला खासदार, आमदार आदींना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

Comments
Add Comment