वैमानिकांमधील 'ते' शेवटचे संभाषण... एअर इंडिया विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालात धक्कादायक खुलासे

  106

नवी दिल्ली: १२ जून रोजी, अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ विमान (फ्लाइट एआय १७१) टेकऑफनंतर लगेचच एका मेडिकल हॉस्टेल कॉम्प्लेक्सवर जाऊन धडकले. या भीषण अपघातात २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह २६० लोकांचा मृत्यू झाला. या अपघातात फक्त एक प्रवासी वाचला. हा अपघात नेमका कसा झाला, याला जबाबदार कोणकोणत्या गोष्टी आहेत, याबद्दल प्राथमिक अहवाल सादर झाला आहे. त्यामध्ये अपघाताबाबत अनेक धक्कादायक् खुलासे करण्यात आले आहेत. 


भारतीय विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) ने १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबतचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात असे म्हंटले आहे की, टेकऑफनंतर काही सेकंदातच विमानाचे दोन्ही इंजिन अचानकच बंद पडले, ज्यामुळे विमान कोसळले असे उघड झाले आहे.


AAIB च्या १५ पानांच्या अहवालानुसार, विमानाने सकाळी ०८:०८ वाजता १८० नॉट्सचा कमाल निर्देशित एअरस्पीड (IAS) गाठला. त्यानंतर लगेचच, इंजिन-१ आणि इंजिन-२ चे इंधन कट-ऑफ स्विच (जे इंजिनला इंधन पाठवतात) 'RUN' वरून 'CUTOFF' स्थितीत हलवले आणि तेही फक्त १ सेकंदाच्या अंतराने, ज्यामुळे इंधन इंजिनमध्ये येणे बंद झाले आणि दोन्ही इंजिनचा N1 आणि N2 रोटेशन स्पीड वेगाने कमी होऊ लागला.



वैमानिकांमधील आश्चर्यकारक संभाषण


अहवालात असेही उघड झाले की कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एका पायलटला दुसऱ्याला विचारताना ऐकू आले, 'तुम्ही इंजिन का बंद केले?' प्रत्युत्तरात, दुसऱ्या पायलटने म्हटले, 'मी काहीही केले नाही.' हे संभाषण या अपघाताचे स्वरूप आणखी गंभीर करते, कारण दोन्ही पायलटांनी आपण इंजिन बंद केल्याचे नाकारले आहे.  अशा परिस्थितीत, ही संभाव्य तांत्रिक त्रुटी असू शकते.  



इंजिन रिलाईट करण्याचा प्रयत्न, परंतु अपयश


अहवालानुसार, दोन्ही इंजिनमध्ये रिलाईट प्रक्रिया सुरू झाली. इंजिन-१ काही प्रमाणात रिकव्हर होऊ लागले, परंतु इंजिन-२ पूर्णपणे वेग परत मिळवू शकले नाही. या दरम्यान, एपीयू (ऑक्झिलरी पॉवर युनिट) देखील ऑटोस्टार्ट मोडमध्ये सक्रिय झाले, परंतु ते देखील विमानाला स्थिर करू शकले नाही. विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर असे दिसून आले की रॅम एअर टर्बाइन (RAT) म्हणजेच विमानाचा आपत्कालीन पंखा टेकऑफनंतर लगेच बाहेर आला. सहसा, विमानाच्या वीज पुरवठ्यात समस्या आल्यावरच RAT बाहेर येतो. याचा अर्थ असा की इंजिन बंद पडल्यामुळे विमानाचा मुख्य वीज पुरवठा देखील प्रभावित झाला होता. रॅम एअर टर्बाइन हे एक लहान प्रोपेलरसारखे उपकरण आहे जे दोन्ही इंजिन बंद झाल्यावर किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यावर तसेच हायड्रॉलिक बिघाड झाल्यास स्वयंचलितपणे तैनात होते. ते विमानाला उंची राखण्यास मदत करते. RAT आपत्कालीन शक्ती निर्माण करण्यासाठी हवेचा वेग वापरते.



अपघातापूर्वी 'मेडे' कॉल, नंतर क्रॅश


अहवालात म्हटले आहे की EAFR रेकॉर्डिंग ०८:०९:११ वाजता थांबले. त्याआधी, सुमारे ०८:०९:०५ वाजता, एका पायलटने 'मेडे मेडे मेडे' कॉल पाठवला. एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATCO) ने याला प्रतिसाद दिला परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ATCO ने धावपट्टी ओलांडण्यापूर्वीच विमान खाली पडताना पाहिले आणि आपत्कालीन सेवा सुरू केल्या. ०८:१४:४४ वाजता, अग्निशमन दल विमानतळावरून निघून गेले, त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या पथकांनीही बचावकार्य सुरू केले.



अपघात धावपट्टीजवळ झाला, पक्षी धडकण्याची शक्यता नाकारली


अहवालात असेही म्हटले आहे की विमानतळाच्या परिमिती भिंती ओलांडण्यापूर्वीच विमानाने उंची कमी करण्यास सुरुवात केली होती. विमानाच्या मार्गात कोणतेही पक्षी असल्याचे संकेत तपासात आढळलेले नाहीत. यावरून हे स्पष्ट होते की पक्षी धडकणे हे या अपघाताचे कारण नव्हते. AAIB नुसार, अपघातस्थळी ड्रोन फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे आणि पुढील तांत्रिक तपास करता यावा म्हणून मलबा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला आहे.


तसेच, अहवालात असेही म्हटले आहे की आतापर्यंतच्या तपासात असे काहीही आढळले नाही की बोईंग 787-8 विमान किंवा त्याच्या इंजिन उत्पादक कंपनीसाठी कोणताही इशारा द्यावा लागेल.



प्राथमिक तपासाबाबत एअर इंडियाचे निवेदन


विमान अपघाताच्या प्राथमिक तपासाबाबत एअर इंडियाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. पोस्टमध्ये एअर इंडियाने लिहिले आहे की, 'एअर इंडिया AI171 अपघातामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबे आणि व्यक्तींच्या दुःखात आम्ही सहभागी आहे. त्यांच्या झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो, आणि या कठीण काळात त्यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही 12 जुलै 2025 रोजी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने जारी केलेला प्राथमिक अहवाल स्वीकारतो. एअर इंडिया नियामकांसह सर्व भागधारकांसोबत जवळून काम करत आहे. तपास पुढे जात असताना आम्ही AAIB आणि इतर अधिकाऱ्यांशी पूर्ण सहकार्य करत राहू. तपासाचे सक्रिय स्वरूप पाहता, आम्ही कोणत्याही विशिष्ट तपशीलांवर भाष्य करण्यास असमर्थ आहोत आणि अशा सर्व चौकशीसाठी AAIB शी संपर्क साधण्याची शिफारस करतो.'



विमान अपघातात २६० लोकांचा मृत्यू


१२ जून रोजी अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ विमान (फ्लाइट एआय १७१) टेकऑफनंतर काही वेळातच एका मेडिकल हॉस्टेल कॉम्प्लेक्सशी धडकले. या भीषण अपघातात २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह २६० लोकांचा मृत्यू झाला. या अपघातात फक्त एक प्रवासी वाचला. बोईंगच्या सर्वात लोकप्रिय वाइड-बॉडी विमान ड्रीमलाइनर (बोईंग ७८७) च्या अपघातात इतक्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची ही पहिलीच वेळ होती. इतकेच नव्हे तर विमान देखील पूर्णपणे नष्ट झाले (हल लॉस). २६ जून रोजी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या अपघाताचा स्थिती अहवाल देखील जारी केला.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला