
परभणी : पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण (बु) शिवारात आज सकाळी (शुक्रवार) एक हृदयद्रावक घटना घडली. कापसाच्या आंतरमशागतीचे काम करत असताना, लोखंडी औताला विद्युत खांबावरील तारेचा स्पर्श झाल्याने एका शेतकऱ्यासह त्याच्या दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद गोपाळराव घाडगे (वय ४०) हे त्यांचे भाऊ विकास घाडगे यांच्यासोबत त्यांच्या शेतात कापसाच्या पिकाची आंतरमशागत करत होते. बैलजोडीच्या सहाय्याने बैल पाळीचे काम सुरू असताना, शेतातील विद्युत खांबाला आधार देणाऱ्या तारेला लोखंडी औताचा स्पर्श झाला. त्या तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने प्रल्हाद घाडगे आणि त्यांच्या दोन्ही बैलांना जोरदार धक्का बसला. विद्युत प्रवाहाची तीव्रता अधिक असल्याने क्षणार्धातच तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
प्रल्हाद यांच्या पाठीमागे खताची पेरणी करत असलेले त्यांचे भाऊ विकास घाडगे यांना मात्र करंट लागला नाही. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा भाऊ आणि बैल मृत्यूमुखी पडल्याचे पाहून त्यांनी आरडाओरड केली. ग्रामस्थांच्या मदतीने प्रल्हाद घाडगे यांना तातडीने पाथरी येथील खासगी रुग्णालयातून शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रल्हाद घाडगे हे शांत आणि मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
या घटनेमुळे महावितरणच्या गलथान कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब आडवे झाले आहेत किंवा तारा लोंबकळत आहेत, तरीही महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याने नाहक नागरिकांना आणि प्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.