
प्रत्येक प्रभागात एक खिडकी कक्ष स्थापन
विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका क्षेत्रात सार्वजनिक दहीहंडी उत्सव, गणेश उत्सव व नवरात्रोत्सव परवानगीबाबत एक खिडकी कक्ष योजना राबविण्यात येत आहे. मंडळांना सर्व विभागांच्या परवानगीसाठी वेगवेगळया कार्यालयात जाऊन स्वतंत्र अर्ज करण्याऐवजी महापालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षामध्ये अर्ज करता येईल.
त्यामुळे मंडळांना कमीतकमी वेळेत सर्व परवानग्या एका छताखाली मिळतील. सदर परवानगीसाठी मागील वर्षापासून ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व मंडळांनी https://vvcmcpan-dalpermission.com/ या लिंकद्वारे अथवा क्यूआरद्वारे लॉगिन केल्यानंतर सदर पोर्टलवर मंडळांच्या अर्जाची नोंदणी केली जाईल. त्यानंतर सदर अर्जाची पालिकेमार्फत प्राथमिक तपासणी करून पोलीस विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व अग्निशमन विभाग यांच्याकडे पोर्टलद्वारे पाठविला जाईल.
संबंधित विभागाकडून या बाबत आवश्यक ती तपासणी करुन त्यांच्याकडील परवानगी ना हरकत प्रमाणपत्र पोर्टलवर सादर केले जाईल. सर्व विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर पालिकेमार्फत संबंधित अर्जदार मंडळांना ऑनलाइन पोर्टल द्वारे परवानगी दिली जाईल. याकरीता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. परवानगी प्रक्रियेसाठी संबंधित एक खिडकी कक्षामध्ये मंडळांना सदरचा अर्ज भरताना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यालयीन अधिक्षक व संगणक ऑपरेटर कार्यालयीन वेळेत उपस्थित असतील. प्रत्येक प्रभाग समिती मध्ये एक खिडकी कक्ष तयार करण्यात आलेले आहेत.
मंजुरीसाठीची प्रक्रिया सुलभ
"एक खिड़की कक्ष योजना" ही विविध सरकारी परवानग्या आणि मंजुरीसाठी तयार केलेले एकच ठिकाण असून याचा उद्देश व्यवसाय, उद्योग आणि इतर कामासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांसाठी लोकांची गैरसोय टाळणे आणि प्रक्रिया सुलभकरणे आहे.
एक खिडकी कक्ष योजनेचे फायदे
वेळेची बचत
प्रक्रियेतील सुलभता
सर्व प्रक्रियेत पारदर्शकता
व्यवसाय अधिक सुलभ
खर्च कमी
तरी सर्व मंडळांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.