मुंबई: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३५२ अपमानित करणे, ११५(२), मारहाण करणे , ३(५), संगनमत करून मारणे या कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली जाणार आहे. समाज माध्यमांमधील व्हिडीओ आणि स्थानिकांकडे केलेल्या चौकशीच्या आधारे अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
"मी कुठलाही मोठा गुन्हा केलेला नाही"- आमदार संजय गायकवाड
आपल्याला शिळं अन्न दिलं म्हणून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास कँन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्या संबंधी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी जर गुन्हा दाखल झाला तर त्याला सामोरं जाणार असल्याची प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली होती. यादरम्यान त्यांनी मी मी कुठलाही मोठा गुन्हा केलेला नाही, मी चांगल्या गोष्टीसाठी सौम्य मारहाण केली होती, आणि चांगल्या गोष्टीसाठी कितीही माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी 'आय डोन्ट केअर' असं आमदार संजय गायकवाड म्हणाले होते.
दरम्यान संजय गायकवाड यांच्याविरोधात कोण तक्रार करणार याची वाट पाहण्याची पोलिसांना गरज नाही, पोलिस स्वत: चौकशी करू शकतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.