
मुंबई: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबईने 'नाट्य परिषद करंडक' या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाची घोषणा केली आहे. शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेल्या 'नाट्यकलेचा जागर' या उपक्रमाचा हा एक भाग असून, यंदापासून दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील कलावंत आणि नाट्यकर्मींसाठी हा स्पर्धात्मक महोत्सव आयोजित करण्यात आला असून, यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेचे उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.
स्पर्धेचे स्वरूप आणि नियम
ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे: प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी.
प्राथमिक फेरी : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ आणि रविवार, २४ ऑगस्ट २०२५ पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर प्राथमिक फेरी सुरू होईल. ज्या जिल्ह्यातून किमान १० प्रवेशिका येतील, त्या ठिकाणी स्पर्धेचे केंद्र देण्यात येणार आहे.
अंतिम फेरी : प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या २५ सर्वोत्तम कलाकृतींची अंतिम फेरी मुंबई येथे १५, १६, १७ आणि १८ सप्टेंबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा-माहीम, मुंबई येथे पार पडेल.
अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते आणि अभिनेत्रींद्वारे नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे
आकर्षक बक्षिसे आणि मानधन
'नाट्य परिषद करंडक' स्पर्धेतील विजेत्यांना खालीलप्रमाणे रोख पारितोषिके दिली जातील:
एकांकिका स्पर्धा :
- सर्वोत्कृष्ट प्रथम : रु. १,००,०००/-
- उत्कृष्ट द्वितीय : रु. ७५,०००/-
- उत्तम तृतीय : रु. ५०,०००/-
- दोन उत्तेजनार्थ पारितोषिके : प्रत्येकी रु. १५,०००/-
- वैयक्तिक पारितोषिके (प्रत्येकी) : लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा व वेशभूषा, स्त्री अभिनय आणि पुरुष अभिनय यांसाठी रु. ७,०००/-, रु. ५,०००/-, रु. ३,०००/- अशी रोख बक्षिसे देण्यात येतील.
- याव्यतिरिक्त, स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी होणाऱ्या संस्थांना सादरीकरण मानधन म्हणून रु. २०००/- दिले जाईल. तसेच, सर्व सहभागी कलावंत आणि तंत्रज्ञांना सहभागपत्र देण्यात येईल. एकांकिकेसाठी प्रवेश शुल्क रु. १०००/- ठेवण्यात आले आहे.
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
- स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. स्पर्धेची सविस्तर माहिती आणि नियमावली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ: १० ऑगस्ट २०२५ सायंकाळी ०७:०० वाजेपर्यंत.
- अधिक माहितीसाठी, इच्छुक स्पर्धकांनी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थी, कलावंत, महाविद्यालयीन आणि हौशी संस्था, तसेच विद्यापीठांच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन नाट्य परिषदेने केले आहे. महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.