
अनैतिक मार्गाने कृत्रिम नफा कमावल्याबद्दल भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाने यापूर्वी जेन स्ट्रीट आणि त्यांच्याशी संबंधित तीन संस्थांना भारतीय बाजारपेठेत भाग घेण्यास बंदी घातली होती तसेच त्यांना ४८४३.५ कोटी रुपयांचे कथित बेकायदेशीर नफा जमा करण्याचे निर्देश दिले होते. सेबीने या कंपनीवर निफ्टी ५० आणि बँक निफ्टी सारख्या बेंचमार्क निर्देशांकांमध्ये एक्सपायरी डेजवर फेरफार केल्याचा आरोप केला आणि त्यांच्या बँक खात्यांवर कारवाई केली होती. याच पार्श्वभूमीवर आता, बीएसई निर्देशांकांत काही फेरफार केली आहे का याची तपासणी सेबीने सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सेबी अध्यक्ष तुहीन कांता पांडे यांनी कुठल्याही गैरव्यवहारांना खपवून घेणार नाही त्यावर कडक कारवाई केलीच जाईल असे कडक संकेत दिले होते. त्यानुसार सेबीतील सुत्रे हालत असल्याची चर्चा आहे.
ताज्या अहवालानुसार, सेबीची चौकशी आता एनएसई निर्देशांकांच्या पलीकडे जाईल आणि बीएसईच्या निर्देशांक व्यतिरिक्त ज्यांनी गेल्या दोन आर्थिक वर्षांत डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग क्रियाकलापांमध्ये तीव्र वाढ पाहिली आहे अशा सगळ्या व्यापार क्रियांचा तपास सेबी करू शकते.जेन स्ट्रीटचा अनैतिक मार्गाने कमावलेला ३६,६७१ कोटी रुपयांचा नफा पूर्णपणे सेबीचा रडारवर होता. सेबीने यापूर्वी म्हटले होते की जेन स्ट्रीटने जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ दरम्यान भारताच्या डेरिव्हेटिव्ह्ज बाजारपेठेत फेरफार करून ३६,६७१ कोटी रुपयांचा नफा कथितपणे कमावला आहे. तथापि, जेन स्ट्रीटने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
सेबीने आपल्या अंतरिम आदेशात संशयित उल्लंघनांचे 'अभूतपूर्व प्रमाण आणि गुंतागुंत' अशा शब्दांत या घोटाळ्याचा उल्लेख केला होता. याशिवाय सखोल चौकशीसाठी आणखी काही काळ जाऊ शकतो. बाजाराच्या अखंडतेला कधीही भरून न येणारे नुकसान टाळण्यासाठी अंतरिम उपाययोजना आवश्यक आहेत असे सेबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये नेमके म्हटले आहे की, 'जर आता अंतरिम निर्देश दिले गेले नाहीत आणि सखोल चौकशीनंतर असे दिसून आले की प्रत्यक्षात बेकायदेशीर नफा झाला होता जो वळवण्यात आला होता, तर बाजाराच्या अखंडतेला, गुंतवणूकदारांच्या संरक्षणाला, गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा गेल्याने यावर भविष्यात असे गैरप्रकार रोखण्यासाठी अंतरिम योजना बनवणे आवश्यक आहे.' असे सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे.