
लॉर्ड्स: भारत आणि इंग्ंलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. यात दुसऱ्या दिवसअखेर भारताने पहिल्या डावात तीन विकेट गमावताना १४५ धावा केल्या आहेत. भारत अद्याप २४२ धावांनी पिछाडीवर आहे. याआधी इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३८७ धावा केल्या होत्या. भारताकडून केएल राहुल ५३ आणि ऋषभ पंत १९ धावांवर खेळत आहेत.
भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरूवात काही खास राहिली नाही. यशस्वी जायसवाल दुसऱ्याच षटकांत १३ धावांवर खेळताना बाद झाला. त्याला जोफ्रा आर्चरने बाद केले. जोफ्रा ४ वर्षांनी कसोटीत खेळत आहे. त्यानंतर केएल राहुल आणि करूण नायर यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी झाली. करून नायरला बेन स्टोक्सने जो रूटच्या हाती कॅच देत बाद केले. करूण नायरने ६२ बॉलमध्ये ४० धावा केल्या.
असा होता इंग्लंडचा पहिला डाव
पहिल्या डावात इंग्लंडला बेन डकेट आणि जॅक क्राऊली यांनी सावध सुरूवात करून दिली. त्यांनी ४३ धावा केल्या. नितीश कुमार रेड्डीने एकाच षटकात डकेट आणि क्राऊलीली बाद केले. येथून ओली पोप आणि ज्यो रूट यांच्यात १०९ धावांची भागीदारी झाली. जडेजाने पोपला बाद करत ही भागीदारी तोडली. त्यानंतर बुमराहने हॅरी ब्रूकला बोल्ड केले. ब्रूक बाद झाल्यानंतर ज्यो रूट आणि बेन स्टोक्स यांच्यात पाचव्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी झाली. दुसऱ्या दिवशी ज्यो रूटने आपले ३७वे शतक पूर्ण केले.
काही वेळाने बुमराहने बेन स्टोक्सला ४४ धावांवर बाद केले. शतक ठोकल्यावर रूटही बाद झाला. यानंतर पुढच्याच बॉलवर क्रिस वोक्स बाद झाला. यानंतर जेमी स्मिथ आणि ब्रायडन यांच्यात आठव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीदरम्यान जेमी स्मिथने ५२ बॉलवर आपले अर्धशतक पूर्ण केले. सिराजने स्मिथला बाद केले. यानंतर बुमराहने जोफ्रा आर्चरला बाद करत आपल्या ५ विकेट पूर्ण केल्या. ९ विकेट गेल्यानंतर कार्सने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. कार्सने सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७७ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. कार्सला सिराजने बोल्ड केले आणि इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला.