
रत्नागिरी (वार्ताहर): महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्त व पर्यटकांना भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव करून देवदर्शन घेता यावे, याकरिता लवकरच ड्रेसकोड लागू करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर यांनी दिली आहे.
तसेच सध्या ड्रेसकोडबाबत भक्त पर्यटकांमध्ये प्रबोधन व्हावे याकरिता मंदिर परिसरात देवस्थान समितीकडून प्रबोधनपर माहिती फलक लावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी सध्या भक्त व पर्यटकांना मंदिरात दर्शन घेण्याच्या दृष्टीने भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव करून दर्शन घेता यावे यासाठी ड्रेस कोड लागू केले आहेत.
आई एकविरा मंदिरात भाविकांना सात जुलैपासून ड्रेस कोड
याआधी कोळी बांधवांची आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा मंदिरात भाविकांना ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे. ७ जुलैपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. स्थानिक दुकानदारांना आणि भाविकांना हा नियम लागू असणार आहे. मंदिराचं पावित्र राखण्यासाठी संस्थाकडून निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तोडके आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून आल्यास भाविकांना प्रवेश नाकारण्यात येईल अशी माहिती संस्थांकडून देण्यात आली. महिलांना मंदिरात प्रवेश करायचा असल्यास त्यांनी साडी, सलवार, कुर्ता, किंवा इतर भारतीय कपडे प्रधान करावेत. महिला आणि तरुणींनी पूर्ण अंग झाकलेले असावेत. तरुण युवक वर्ग आणि पुरुष यांच्यासाठी धोतर, पायजमा, कुर्ता, पॅन्ट, टी-शर्ट, शर्ट, किंवा इतर भारतीय कपडे परिधान केलेले असावेत. असा उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे.