Thursday, July 10, 2025

पावसाच्या पॅटर्नमधील बदल चिंताजनक!

पावसाच्या पॅटर्नमधील बदल चिंताजनक!

मिलिंद बेंडाळे: वन्य प्राणी आणि पर्यावरण अभ्यासक


भारतात पूर्वी मुसळधार पावसामुळे अनेक दिवस जनजीवन विस्कळीत होत असे. सूर्य दिसत नसे. काम थांबत असे. वाहतुकीवर मोठा परिणाम होत असे; परंतु गेल्या तीन दशकांत मॉन्सूनचा पॅटर्न इतका बदलला आहे की, पाऊस सतत पडत नाही. काही ठिकाणी काही तासांमध्ये इतका मुसळधार पाऊस पडतो की पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. हे चित्र का बदलले आहे, याचा विचार करायला हवा.


भारतात १९५० ते १९८०च्या दशकापर्यंत अनेक भागांत, विशेषतः पश्चिम घाट (जसे की महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ), ईशान्य भारत (आसाम, मेघालय) आणि गंगेच्या मैदानात जून ते सप्टेंबर या काळात पाच ते दहा दिवस सतत हलका ते मध्यम पाऊस पडणे सामान्य होते. काही ठिकाणी हा कालावधी आणखी जास्त, १५-२० दिवस असू शकतो. पूर्वी मॉन्सूनचा पॅटर्न अधिक स्थिर आणि समान रीतीने वितरित केला जात असे. सतत ढग असायचे. पाऊस अनेक दिवस अधूनमधून किंवा हलक्या रिमझिम पावसाच्या स्वरूपात सुरू असायचा. हा तो काळ होता, जेव्हा लोक म्हणायचे की इतका पाऊस पडत होता की, बरेच दिवस सूर्य दिसत नव्हता. महात्मा गांधींनी त्यांच्या आत्मचरित्रात आईच्या उपवासाबद्दल लिहिले आहे. महात्मा गांधींच्या आई पुतळीबाई चातुर्मासात सूर्यदर्शन उपवास करत असत. या उपवासात त्या सूर्याला पाहिल्याशिवाय जेवत नव्हत्या. गांधीजींनी त्यांच्या ‘सत्याच्या प्रयोगांची कहाणी’ या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की पावसाळ्यात बरेच दिवस ढग राहतात आणि सूर्य दिसत नव्हता, तेव्हा त्यांची आई दोन-तीन दिवस जेवत नव्हती. त्या काळात तरुण मोहनदास (गांधी) सकाळपासूनच आकाशाकडे लक्ष ठेवत; जेणेकरून सूर्य दिसताच ते आईला कळवू शकतील आणि ती उपवास सोडू शकेल. गांधीजींच्या आत्मचरित्रात लिहिलेली ही बाब १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला गुजरातमधील पोरबंदरसारख्या भागांशी संबंधित आहे. तिथे पावसाळ्यात सहा-सात दिवस सतत ढग आणि पाऊस पडणे सामान्य होते.


त्या काळात साधारणपणे पावसाळ्याच्या शिखरकाळात अशी परिस्थिती वारंवार दिसून येत असे. भारतातील ग्रामीण भागात ‘आठवडाभर पाऊस’ किंवा ‘सतत मुसळधार पाऊस’ पडत असे. त्याचा शेती आणि जीवनशैलीवर परिणाम होत असे. भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) जुन्या रेकॉर्डनुसार (१९०१-१९८०) सामान्य पावसाळ्यात भारतातील अनेक भागात ५०-१०० पावसाळी दिवसांची नोंद होते. त्यापैकी बऱ्याच वेळा पाच-दहा दिवस सतत पाऊस पडत असे. पश्चिम घाट (महाराष्ट्र, गोवा, केरळ) भागात जून-जुलैमध्ये ७-१५ दिवस सतत पाऊस पडल्याच्या नोंदी आढळतात. ईशान्य भारत-मेघालयसारख्या भागात २०-३० दिवस अधूनमधून पाऊस पडणे सामान्य होते. उत्तर भारतात (उत्तर प्रदेश, बिहार) पाच-दहा दिवस वारंवार पावसाचा कालावधी येत असे. पूर्वीच्या तुलनेत आता हवामान बदलामुळे पावसाचा पॅटर्न बदलला आहे. आता दीर्घकालीन हलका पाऊस कमी पडतो. त्याऐवजी थोड्याच वेळात मुसळधार पाऊस पडतो. गेल्या तीन ते चार दशकांमध्ये पावसाच्या पद्धतीत बदल होण्यामागे अनेक कारणे आहेत. तथापि, हा बदल केवळ भारतासाठी नाही तर, संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. गेल्या काही दशकांमध्ये भारतासह जगभरात सरासरी तापमान वाढले. त्यामुळे हवामानामध्ये असामान्यता निर्माण झाली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे वातावरणातील आर्द्रता क्षमता वाढते. त्यामुळे कधीकधी काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडतो. पॅसिफिक महासागरात होणाऱ्या ‘एल निनो’सारख्या घटनांमुळे भारतात मॉन्सून कमकुवत होऊ शकतो. परिणामी, पावसाचा कालावधी आणि प्रमाणही कमी होते. पूर्वी हे प्रमाण कमी होते; परंतु आता त्यांचा परिणाम अधिक दिसून येतो. आता अवघ्या काही तासांमध्ये इतका मुसळधार पाऊस पडतो की, पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.


अलीकडच्या काही वर्षांमध्ये मॉन्सून कधी लवकर येतो, कधी उशिरा येतो. कधी कधी मॉन्सून एकाच दिवसात अनेक राज्यांमध्ये पोहोचतो. त्यामुळे पावसाचे वितरण असमान होते. शहरीकरण आणि नैसर्गिक संसाधनांचे शोषण यांचा स्थानिक हवामान आणि पावसाच्या चक्रावरही परिणाम होतो. भारतात रिमझिम किंवा हलका पाऊस कमी होत आहे. मॉन्सूनचे वारे आता पूर्वीसारखे सतत ओलावा आणत नाहीत. त्यामुळे रिमझिम पावसाचा कालावधी कमी झाला. ‘आयएमडी’च्या (१९५१-२०१५) अभ्यासानुसार भारतात हलक्या पावसासह दिवसांच्या संख्येत १०-१५ टक्के घट झाली, तर मुसळधार पाऊस २०-३० टक्के वाढला. पश्चिम घाट आणि ईशान्य भारतात अजूनही हलका पाऊस पडतो; परंतु त्याचा कालावधी आणि नियमितता पूर्वीपेक्षा कमी आहे. मेघालयसारख्या भागात अजूनही रिमझिम पाऊस पडतो; परंतु एकूणच कमी कालावधीत पडतो. मध्य आणि उत्तर भारतात हलका पाऊस लक्षणीयरीत्या कमी झाला. त्याऐवजी पूर किंवा दुष्काळासारख्या हवामान घटनांमध्ये वाढ झाली. तामिळनाडू आणि केरळमध्ये अजूनही मॉन्सून आणि ईशान्य मॉन्सूनदरम्यान हलका पाऊस पडतो; परंतु सातत्याचा अभाव आहे. या वर्षी मुसळधार पावसामुळे मे महिन्यात हवामान थंड झाले. फेब्रुवारीमध्ये अचानक हिवाळ्याची जागा वसंत ऋतूने घेतली. जूनमध्ये पावसानंतर उष्णतेची लाट आली. मे महिन्यात उष्णतेच्या लाटांऐवजी अनेकांनी थंड वाऱ्याचा आनंद घेतला. काही भागांमध्ये उष्णतेऐवजी वेगळ्या पावसाचा अनुभव आला. नंतर मान्सूनची प्रगती थांबली. यासाठी जबाबदार असलेल्या पश्चिमी विक्षोभां(वेस्टर्न डिस्टर्बन्स)ची वारंवारता कमी झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेशचा काही भाग आणि पूर्व राजस्थान, दक्षिण उत्तर प्रदेश आणि वायव्य मध्य प्रदेश या भागांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’ने जून २०२३ मध्ये जाहीर केले होते की, सरासरी जागतिक तापमान अनेक दिवस औद्योगिकपूर्व पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसने जास्त होते. २०२४ मध्ये जागतिक तापमानवाढीने लक्ष्मणरेखा १.५ अंश ओलांडली असल्याचे पुन्हा एकदा सांगितले गेले. ‘शिफ्टिंग झोन ऑफ ऑक्युरन्स ऑफ एक्सट्रीम वेदर इव्हेंट्स-हीट वेव्हज’च्या अलीकडील अभ्यासानुसार उष्णतेच्या लाटा आता राजस्थान किंवा विदर्भापुरत्या मर्यादित नाहीत. अरुणाचल प्रदेश, केरळ आणि जम्मू आणि काश्मीरसारख्या पारंपरिकपणे थंड मानल्या जाणाऱ्या राज्यांमध्येही गेल्या दोन दशकांमध्ये उष्णतेच्या लाटा आल्या आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेचा अहवालदेखील याची पुष्टी करतो. अलीकडच्या एका मूल्यांकनानुसार उत्तराखंडच्या पर्वतरांगांमध्ये २७ टक्के अन्नधान्य आणि तेलबिया पिकांचे नुकसान होऊन उत्पादन १५ टक्क्यांनी कमी झाले. पाच वर्षांमध्ये बटाट्याचे उत्पादन ७० टक्क्यांनी कमी झाले. त्यात अल्मोडा आणि रुद्रप्रयागमध्ये सर्वात मोठी घट झाली.


भारतीय हवामान विभागाचे माजी महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांच्या मते, हवामानबदलामुळे आग्नेय वातावरणातील आर्द्रतेची पातळी वाढली आहे. तापमानात प्रत्येक एक अंश वाढीमुळे हवेची पाण्याची वाफ धरून ठेवण्याची क्षमता सात टक्क्यांनी वाढली. सर्व डोंगराळ राज्यांमध्ये तापमानात दोन ते चार अंश वाढ झाली. ‘आयपीसीसी’ अहवालात वेट-बल्ब तापमानाचा उल्लेख आहे. ते तापमान मोजताना मुळात उष्णता आणि आर्द्रता जोडते. सामान्य माणसासाठी, ३१ अंश सेल्सिअसचे वेट-बल्ब तापमान अत्यंत धोकादायक असते. ३५ अंश सेल्सिअस तापमानात सावलीत विश्रांती घेणाऱ्या निरोगी प्रौढ व्यक्तीलादेखील सुमारे सहा तासांपेक्षा जास्त काळ जगणे कठीण होते. नवीन संशोधनातून दिसून आले आहे की, दक्षिण भारतातील जोरदार वारे आर्द्रता चांगल्या प्रकारे पसरवत आहेत. हे हवेतील मोठ्या प्रमाणात बदलांचे लक्षण आहे, जे मॉन्सून प्रणालींच्या हालचालीवरदेखील परिणाम करू शकतात. मॉन्सूनमधील हे घातक बदल रोखण्यासाठी आता पर्यावरण संरक्षणावर अधिक भर दिला पाहिजे.

Comments
Add Comment