Saturday, August 2, 2025

"गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, उत्सव जोरदार साजरा करू": कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

महानगरपालिकेच्या डी वॉर्ड कार्यालयात गणपती मंडळांसोबत समन्वय बैठक संपन्न


मुंबई:  महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ सण नाही तर तो एक मोठा सोहळा म्हणूनच साजरा केला जातो. हा सण महाराष्ट्राची ओळख बनला आहे.  शिवाय अलिकडेच गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला असल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव खास असणार आहे. यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे,  राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या वर्षीच्या गणेशोत्सवात मंडळांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचे जाहीर केले असून, यंदा उत्सव जोरदार साजरा करू असे म्हंटले आहे.


त्याबद्दल बोलताना मंत्री लोढा म्हणाले की, "मुंबईत साजरा होणारा गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध असून, यावर्षी हा उत्सव अविस्मरणीय असा साजरा करणार आहोत. यादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळ आणि भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेऊ"


मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका डी विभाग कार्यालयात गणेश मंडळांसोबत समन्वय बैठक संपन्न झाली. या बैठकीला महापालिकेचे उपायुक्त मनीष वळंजू, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव  गिरीश वालावलकर तसेच गणेश उत्सव मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



वन विंडो प्रणालीचा वापर करणार 


मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या समस्यांचे निवारण करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. गणेश मूर्तींचे आगमन आणि विसर्जन यादरम्यान होणारी वाहतूक कोंडी तसेच रस्त्यावरील बेवारस वाहने पार्किंग केलेल्या वाहनांना त्वरित हटवून रस्ते मोकळे करण्याच्या सूचनाही त्यांनी वाहतूक पोलिसांना केल्या. दरवर्षीप्रमाणे वन विंडो प्रणालीच्या माध्यमातून मंडळांना विविध प्रकारच्या ऑनलाइन परवानग्या देण्यास विलंब होऊ नये याची काळजी महापालिका अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, बसण्याची जागा, या सर्वच आवश्यक सोयींची पूर्तता करण्यासाठी प्रशासन तत्पर आहे असे ही त्यांनी सांगितले.



दक्षिण मुंबईत अविस्मरणीय होणार गणेशोत्सव


मुंबई महापालिका, बेस्ट प्रशासन आणि पोलीस विभागाच्या सहकार्याने दक्षिण मुंबईत ताडदेव, गिरगाव, वाळकेश्र्वर, खेतवाडी आणि लमिग्टन रोड परिसरात वैविध्यपूर्ण सजावट करण्याचे सुद्धा नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात स्थानिक पातळीवर समितीही स्थापन करण्यात येत आहे. न्यायालयाने दिलेले निर्देश आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करून हा उत्सव सर्वांनी मिळून जोरदार साजरा करावा असे आवाहनही यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा