
महाराष्ट्रातील ११ तसेच तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा
महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाला जागतिक पटलावर मानाचे स्थान मिळणे हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण
मुंबई: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामरिक इतिहासात मानाचे स्थान असणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 'स्वराज्य' संकल्पपूर्तीतील अलौकिक दुर्गसंपदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकूण १२ किल्ल्यांना जागतिक पटलावर मानाचे स्थान बहाल करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात 'युनेस्को'ने - रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदूर्ग, सुवर्णदूर्ग, विजयदुर्ग, खांदेरी असे महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी हा एक अशा एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला आहे. या माध्यमातून महाराष्ट्राचा समृद्ध वारसा कायमस्वरुपी जागतिक पटलावर नोंदवला जाणे, हा महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली.
महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये गड-किल्ल्यांचे महत्त्व अभेद्य आहे. स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोककल्याणासाठी गडकोटांचा आधार घेऊन निर्मिलेले 'स्वराज्य' हा गाभा पकडून, सांस्कृतिक वारसा या श्रेणीत मोडणारे, स्वराज्याचे रक्षण करणारे १२ किल्ले जागतिक वारसा नामांकनामध्ये समाविष्ट व्हावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत असणाऱ्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने प्रस्ताव तयार केला होता. यामध्ये, महाराष्ट्रातील ११ किल्ले - रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदूर्ग, सुवर्णदूर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला यांचा समावेश करण्यात आला होता. तर दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवरायांनी जिंकलेला, मराठ्यांच्या सामर्थ्याचे प्रतीक असलेला तामिळनाडूतील जिंजी हा एक किल्ला देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आला होता. या सर्व १२ किल्ल्यांना 'युनेस्को' ने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे.
View this post on Instagram
“अद्वितीय वैश्विक मूल्य” (Outstanding Universal Value) हा निकष यामध्ये अतिशय महत्वाचा ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्मितीसाठी व रक्षणासाठी भौगोलिक स्थितीचा सर्वोत्तम उपयोग करुन अनेक किल्ल्यांची उभारणी केली. अस्तित्वात असलेल्या अनेक किल्ल्यांची पुनर्बांधणी करुन त्यांचा युक्तीने वापर केला. महाराष्ट्रातील किल्ले हे भव्य स्थापत्यकलेसाठी ओळखले जातात. राजकीय, लष्करी व सांस्कृतिक दृष्टिकोनातून देखील हे गड-किल्ले अत्यंत महत्त्वाचे राहीले आहेत.
नैसर्गिक दुर्गमतेचा अतिशय उत्तम वापर या किल्ल्यांच्या उभारणीमध्ये केलेला आढळतो. सह्याद्रीचा अत्यंत कुशलतेने आणि रणनीतीपूर्वक वापर करून किल्ल्यांची उभारणी केली गेली. राजकीय आणि लष्करी नियंत्रण प्रस्थापित ठेवण्यासाठी किल्ल्यांचे मजबूत असे संरक्षण जाळे तयार केले. हे किल्ले उंचावर, दुर्गमस्थानी असल्यामुळे शत्रूला ते सहज गाठता येत नसत. सह्याद्री पर्वत माळांमधील दाट अरण्य, दऱ्या आणि घाट यांचा उपयोग करित मराठ्यांनी गनिमी कावा युद्धतंत्र वापरुन शत्रूला जेरीस आणले. सह्याद्रीची उंची आणि गुंतागुंतीच्या भौगोलिक रचनेमुळे शत्रू सैन्याला या भागात चढाई करणे अत्यंत अवघड जाई.
शत्रूच्या नजरेस थेट न पडणाऱ्या दरवाज्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य (Machis or Machi Architecture) हा मराठा दुर्ग स्थापत्य शास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या या किल्ल्यांवर आढळणारे माची स्थापत्य जगभरातील अन्य कोणत्याही किल्ल्यांच्या रचनेमध्ये दिसून येत नाही. माची रचनेस अनेक वेळा तटबंदी, बुरुज, दरवाजे आणि खंदकांनी सुरक्षित केलेले असते. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दी नीतीने रचलेला भाग आहे. या वैशिष्ट्यपूर्ण, अद्वितीय वैश्विक मूल्यांमुळे सदर किल्ल्यांना 'जागतिक वारसा' म्हणून स्वीकारण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त, पंतप्रधानांचे आभार
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे.
हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले. सर्वप्रथम मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली. मी स्वत: विविध राजदुतांशी संपर्क केला. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही वेळोवेळी साथ दिली. माझे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनी स्वत: जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली. तेथे तांत्रिक सादरीकरण केले. माझ्या कार्यालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते. अनेकांचे हातभार लागले आणि त्यातून देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे. मी पुन:श्च महाराष्ट्रातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.