पोलादपूर : कशेडी घाटात मृतदेह फेकणाऱ्या महिलेसह तीघांना अटक करण्यात आली. पोलादपूर पोलीसांनी ३० एप्रिल रोजी आढळलेल्या बेवारस अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाबाबत शोध घेताना एका महिलेसह तीन आरोपी गजाआड केल्याची माहिती सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.
पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० एप्रिल रोजी जुन्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दरीभागात एका अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. याबाबत भोगावच्या पोलीस पाटील शुभांगी उतेकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या घटनेनंतर पोलादपूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवत तातडीने तपास सुरु केला. अक्षय जाधव या तरुणाला पोलादपूर पोलीसांनी तपासाअंती ताब्यात घेत त्याने दिलेल्या माहितीनुसार मयत व्यक्तीचे नाव सुनील हसे असे होते. सुनील हसे याची वंदना पुणेकर हिच्यासोबत ओळख झाली. सुनील श्रीमंत वाटल्याने वंदनाने त्याला जाळ्यात ओढले.
मात्र सत्य कळल्यानंतर तिने अक्षय जाधवसोबत त्याला संपविण्याचा घाट घातला. यामुळे तिने तिचा नवरा मोहन सोनार याची मदत घेतली. मोहनच्या मदतीने वंदनाने सुनीलला गुंगीचे औषध दिले आणि गाडीतच गळा आवळून ठार मारले. कशेडी घाटातील जुन्या महामार्गालगत काँक्रीटच्या संरक्षक कठड्यालगत दरीमध्ये टाकले. यानंतर हे दोघे आरोपी कर्नाटकमधील सीमाभागात लपून होते.
याबाबत रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि रायगड अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्यो मार्गदर्शनखाली आणि महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या नेतृत्वाने पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्यासमवेत पथकातील पो.हवा.तुषार सुतार, पो.ना. अनुजित शिंदे, महिला पोलीस शिपाई बनसोडे यांनी या दोन्ही प्रमुख आरोपींना महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातून आरोपी वंदना, मोहन या दोघांना ताब्यात घेण्यात आले.