मराठवाडा वार्तापत्र : अभयकुमार दांडगे
उद्धव आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले असले तरीही हे ‘बंधुप्रेम’ एक राजकीय नाट्य असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज आणि उद्धव एकत्र यावेत म्हणून अनेकांचे प्रयत्न सुरू होते. त्यात आता मराठी माणूस मराठीसाठी जागा झाला आहे. अर्थात मराठी मुद्दा तत्त्वाचा असला तरी या दोन्ही बंधूंनी एकत्र येण्यासाठी याचा उपयोग करून घेतला हे देखील तितकेच खरे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी सत्तेसाठी केलेली मलमपट्टी किती दिवस टिकेल याची शाश्वती मराठवाड्यातील
जनतेलाही नाही.
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाचे राजकीय वारसदार कोण? असा प्रश्न मराठवाड्यात उपस्थित होत आहे. त्यामुळे ‘बंधुप्रेम’ जुळले असले तरी मराठवाड्यातून त्याचा काय राजकीय परिणाम दिसेल यावर वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते शरद पवार यांनी घेतलेले पडद्यामागचे परिश्रम हे मुंबईतील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीवरून लक्षात आले. काँग्रेसने मुंबईतील त्या मेळाव्याकडे पाठ फिरवली होती. काही डाव्या पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मात्र त्या ठिकाणी उपस्थित होते. माकपचे राज्य सचिव तसेच लाल निशाण पक्षाचे, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेतेही त्यावेळी हजर होते. याव्यतिरिक्त अन्य कोणीही बडे नेते त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने मराठवाड्यात या दोन्ही भावांच्या मनोमिलनामुळे जास्त काही फरक पडेल, असे चित्र आजच्या घडीला तरी दिसत नाही.
महाराष्ट्राचा सातबारा हा आपल्याच पक्षाचा आहे अशा तोऱ्यामध्ये नेहमीच राजकीय पक्षांचे नेते वावरतात. प्रत्येक राजकीय पक्षाला सत्ता हवीशी वाटते; तसेच सत्तालोभी नेते पक्षाच्या निष्ठा बाळगत नाहीत. ज्या ठिकाणी सत्ता असेल त्या ठिकाणी ते पक्षप्रवेश करून आपले दिवस काढत असतात. अलीकडच्या काळात असे राजकीय गणित सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. मराठवाड्यातदेखील कोणता नेता कोणत्या पक्षाच्या मागे धावत आहे, हे सर्वसामान्य लोकांना कळून चुकले आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे अठरा वर्षांनंतर पुन्हा एकत्र आल्याने राजकीय सत्तेचे समीकरणे बदलतील, असाच प्रचार सुरू आहे. ग्रामीण भागात दोन भावांमध्ये भांडण होणे नेहमीचेच असते. ते दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे गावात किंवा घरात खूप काही बदल होतो, असे कोणालाच वाटत नाही. त्यामुळे किमान मराठवाड्यात तरी उद्धव व राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले तरी त्याचा थेट मतदारांवर काहीही परिणाम होणार नाही, हे देखील तेवढेच खरे आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र येत असल्याचे मराठवाड्यात बोलले जात आहे. त्यामुळे केवळ सत्तेसाठी एकत्र येणारे भाऊ जनतेचे कधीच होऊ शकणार नाहीत हा संदेशही गावागावात रुजविला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग कधीही विखुरला जाणार नाही. त्यामुळे जे बाळासाहेबांचे मावळे आहेत, ते त्यांच्या विचारांना मानतात. त्यामुळे नेते कोण हा विषय गौण असला तरी बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणाऱ्या पक्षालाच मराठवाड्यातून यापुढेही संधी मिळेल व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाव मिळेल, हे खरे आहे.
'विठ्ठलावर माझा राग नाही, पण माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे’, असे म्हणून राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच 'पक्षावर वर्चस्व कोणाचे' या लढाईतून उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात फूट पडली होती. पक्षातून बाहेर पडत असताना राज ठाकरे यांना जो प्रश्न सतावत होता, त्या प्रश्नाचे उत्तर अद्यापही सापडलेले नाही. मराठवाड्यातील मतदार सुजाण आहे. त्यामुळे त्यांना या सर्व बाबींची कल्पना आहे.
उद्धव व राज एकत्र येत असले तरी या दोघांनाही मुंबई महानगरपालिकेवर सत्ता हवी आहे, म्हणूनच हे दोघेही भाऊ मराठी भाषेचे निमित्त करून एकत्र आले, असे मराठवाड्यातील राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शिवसेनेचे राजकारण पाहिले, तर उद्धव ठाकरे यांना पूर्वीही राज ठाकरे यांचे नेतृत्व मान्य नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत उद्धव व राज ठाकरे यांचे एकत्रच; परंतु वेगळे राजकारण चालायचे. आता हे दोन्ही नेते आपापल्या पक्षांच्या माध्यमातून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मराठवाड्यातील मराठी माणसाच्या लक्षात आले आहे. हे दोघेही एकत्र आले असले तरी त्यामधील श्रेष्ठ कोण हा प्रश्न आजही मराठवाड्यातील उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांना तसेच समर्थकांना आहे. राज ठाकरे यांच्या बाबतीतही नेमके हेच म्हणावे लागेल.
राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी होते; परंतु त्यांच्या पक्षातून खासदार किंवा आमदार निवडून येत नाही, असे शरद पवार या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यांवर प्रतिक्रियेत म्हणाले होते. राज ठाकरे यांचे नेतृत्व ‘मातोश्री’ला पूर्वीही मान्य नव्हते. आज उद्धव व राज ठाकरे यांचे खरोखरच कौटुंबिक मीलन झाले असले तरी राजकीय मीलन शक्य नाही, अशी मुंबईतच नव्हे तर मराठवाड्यातूनही प्रतिक्रिया उमटत आहे. केवळ मराठी व हिंदी हा मुद्दा पुढे करून दोन्हीही नेते एकत्र येत असले तरी ते केवळ राजकीय गरजेपोटी एकत्र येत आहेत. हे मराठवाड्यातील जनतेला नव्याने सांगण्याची गरज नाही. एकनाथ शिंदे हे आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.
मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षात उद्धव व राज ठाकरे यांच्या मराठवाड्यातील अनेक निकटवर्तीयांनी मोकळा श्वास घेऊन प्रवेश केला. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडण्याचे कारण त्यांनी स्वतःच उघड केलेले आहे. राज ठाकरे यांच्या अवतीभोवती कोण आहेत, याबाबत वेगळे काही सांगण्याची गरज नाही. राज ठाकरे यांनी महायुतीत येण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; परंतु भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना सत्तेत वाटा असल्याने चौथा पक्ष म्हणून राज ठाकरे यांना किती वाटा द्यायचा हे सत्तेचे गणित कदाचित एकनाथ शिंदे व अजित पवार यांना नकोसे वाटले असेल, त्यामुळे महायुतीत राज ठाकरे यांना एंट्री मिळाली नाही, असे मराठवाड्यातील राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आले तरी दोन्ही पक्ष व त्यांचे कार्यकर्ते हे खरोखरच त्यांच्यासोबत असतील का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. मराठी सक्तीची आहेच पण हिंदीचा आणि सगळ्याच भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहे. भाजपला मुंबईत सत्ता हवी आहे. त्यामुळे मराठीभाषिक दुखावणार नाही, हिंदीभाषिक दूर जाणार नाहीत, या दोन्हीचा समतोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखावा लागणार आहे.
२००६ मध्ये वर्चस्वाच्या लढाईतून शिवसेनेतून बाहेर पडलेले राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत गेले असले तरी त्यांना मानणारा वर्ग उद्धव यांचे नेतृत्व स्वीकारू शकणार नाही, असे मराठवाड्यातील अनेक मनसे कार्यकर्त्यांना वाटते. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच काही लोकांनी घेरलेले आहे. त्यांच्या पक्षात नेते कोण उरलेत, याचाही विचार मराठवाड्यातील मराठी मतदार नक्कीच करणार आहेत. शेवटी मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून एकत्र येणारे उद्धव व राज ठाकरे यांच्या कोणत्या पक्षाला आणि कोणत्या निशाणीवर मतदान करावे, हा मुद्दाही कळीचा ठरणार आहे.
शेवटी मराठी मुद्दा तत्त्वाचा असला तरी ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’ ही हिंदीची म्हण सर्वच राजकीय पक्षांना दिशा देणारी असेल. उद्धव व राज ठाकरे एकत्र आले असले तरी या दोन्ही नेत्यांनी सत्तेसाठी केलेली मलमपट्टी किती दिवस टिकेल याची शाश्वती मराठवाड्यातील जनतेला नाही.