
बांधकाम कामगारांचा मोर्चा
पालघर : महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना (आयटक) आणि बांधकाम कामगार हक्क संघर्ष समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार निदर्शने करीत 'दक्षता पथक' आणि तपासणीच्या नावाखाली बांधकाम कामगारांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ थांबवण्याची मागणी मोर्चेकरांकडून करण्यात आली.
कायदेशीर कार्यवाहीच्या नावाखाली कामगारांना अपमानित करणे, अपात्र ठरवणे किंवा दोषी ठरवण्यात येत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. गेल्या १५ वर्षांपासून संघटनेनेच कामगारांमध्ये जागृती निर्माण केली आणि मालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी प्रवृत्त केले. आता कामगारांना प्रमाणपत्र देणाऱ्या कंत्राटदारांनाच वेठीस धरून त्यांच्यावर कारवाईची भीती दाखवली जात आहे, ज्यामुळे कामगारांचे भविष्य अंधकारमय होत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. नोंदणी मंजूर करण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकार अधिकारी वर्गाकडे असल्यामुळे, त्यात कामगारांचा कोणताही दोष नाही. दक्षता पथकांकडून कामगारांचा छळ थांबवणे, सामान्य कामगारांना गुन्हेगार न ठरवणे, केंद्रीय कामगार संघटनांचे प्रमाणपत्र नोंदणीसाठी मान्य करणे, मंडळावर आयटक प्रतिनिधीची नेमणूक करणे, उपकर जमा होणाऱ्या कामांवर कामगारांची अनिवार्य नोंदणी करणे, वस्तूंऐवजी थेट बँक खात्यात लाभ जमा करणे, प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करणे, मृत कामगारांच्या वारसांना लाभ व पेन्शन देणे, तसेच तालुका सुविधा केंद्रांमधील समस्या सोडवणे आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.